पलूस (जि. सांगली) ः कॉंग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या नगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी विरोधक अटोकाट प्रयत्न करणार असल्याचे चित्र आहे. मात्र, सत्ता मिळवण्यासाठी ते एकत्र येणार का ? यावरच त्यांचे यशापयश अवलंबून आहे.
पालिका स्थापन झाल्यानंतर कॉंग्रेसने पहिली निवडणूक एकीने लढवली. दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती सत्ता काबीज केली. उलट सर्व विरोधक स्वतंत्र लढले. त्याचा फायदा कॉंग्रेस पक्षाला झाला. पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. कॉंग्रेस पक्षाला नगराध्यक्षपदी व 12 प्रभागांत यश मिळाले. पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीला 4, भाजपला एक ठिकाणी यश मिळाले.
निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात विविध विकासकामांचे आश्वासन दिले होते. जनतेला दिलेली आश्वासने किती प्रमाणात पूर्ण केली. पालिका प्रशासनाने लोकांची कामे सहजासहजी केली का, नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शहराच्या विकासासाठी, जनतेच्या सार्वजनिक व व्यक्तिगत कामासाठी किती वेळ दिला, कोणत्या योजना राबवल्या, कारभार पारदर्शी केला का, याचे मूल्यमापन आगामी निवडणुकीत निश्चितच होणार आहे. विरोधक पालिकेच्या कामकाजात किती आक्रमक राहिले. त्याचेही मूल्यमापन होणार आहे.
पालिकेची निवडणूक सात ते आठ महिन्यांवर आली आहे. गेल्या निवडणुकीत एकीने लढलेल्या कॉंग्रेस पक्षाचा सामना कसा करायचा. त्याची व्यूहरचना कॉंग्रेस विरोधक आखत आहेत. मात्र, राज्यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्याने हा प्रयोग पलूस पालिका निवडणुकीत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी कोणाबरोबर युती करणार का हेही महत्त्वाचे आहे. \
पलूसमध्ये सध्या इतर पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसची स्थिती भक्कम आहे. पलूसमध्ये कॉंग्रेस एकसंध ठेवण्यात राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे यशस्वी ठरले आहेत. कॉंग्रेसला पालिका निवडणुकीत रोखायचे असेल, तर सर्व विरोधकांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, सर्व विरोधक एकत्र येणार की, स्वतंत्र लढणार की विरोधकांपैकी एखादा पक्ष कॉंग्रेस बरोबर युती करणार यावरच पालिका निवडणुकीतील चुरस अवलंबून आहे.
काहींचा आत्तापासूनच तयारी....
पलूस पालिकेचे नगराध्यक्षपद राखीव होते. तसेच नगराध्यक्ष जनतेतून निवडून दिला होता. मात्र, आता यावेळी, निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवड होणार आहे. तसेच नगराध्यक्ष पद खुले होईल. असा अंदाज असल्याने काही जणांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.