जामखेड : माजी मंत्री राम शिंदे यांच्या एकहाती सत्तेची सूत्रे असलेल्या जामखेड पंचायत समिती सभापतिपदासाठी मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती. या पदासाठी इच्छुक असलेल्या दौघांपैकी एकानेही अखेरपर्यंत उमेदवारीअर्जच दाखल केला नाही. त्यामुळे आजची पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रियाच होऊ शकली नाही. भाजपला येथे एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी असतानाही, माजी मंत्री शिंदे काहीच करू शकले नाहीत. परिणामी, येथील निवडणूक प्रक्रिया एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ निवडणूक पीठासीन अधिकाऱ्यांवर आली.
जामखेड पंचायत समितीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असा राजकीय प्रकार समोर आला आहे. हाती पूर्ण संख्याबळ असतानाही पदाधिकाऱ्यांची निवड होऊ शकली नाही. पंचायत समितीत चार सदस्य असून, सर्व भाजपचेच आहेत. त्यापैकी तीन सदस्य शिंदे यांच्या गटाचे, तर भाजपच्या विद्यमान उपसभापती राजश्री मोरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार रोहित पवार यांना सहकार्य केले.
सध्या पंचायत समितीत तीन विरुद्ध एक, असे संख्या बळ निर्माण झाले आहे. भाजपसाठी ही निवड प्रक्रिया सरळ, सोपी समजली जात होती. मात्र, तसे राहिले नाही. ठरलेल्या वेळेत ही निवडच झाली नाही. त्यामुळे या निवडीकरिता दुसऱ्यांदा कार्यक्रम जाहीर करावा लागला.
सभापतिपद मागास प्रवर्गासाठी आरक्षित
नगर येथे झालेल्या सोडतीत जामखेड पंचायत समितीचे सभापती अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झाले; मात्र या प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने फेरआरक्षण काढण्यात आले. त्यानंतर हे पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले. चार पैकी दोन सदस्य या प्रवर्गातील असून, दोघांनीही सभापतिपदावर दावा केला आहे.
अवश्य वाचा- एसटीचा "बस फॉर गर्ल्स' व्हॉटसऍप ग्रुप
माजी सभापती-उपसभापतींमध्ये चुरस
पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरूमकर व विद्यमान उपसभापती राजश्री मोरे यांच्यात या पदासाठी चुरस निर्माण झाली. त्यामुळे दोघांत सरळ लढत होणार, असे वाटत होते. त्यानुसार दोघांनीही मंगळवारी (ता. 7) सकाळी सभापतिपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज घेतले; मात्र दोघांनीही अर्ज दाखल काही केले नाहीत. यासंदर्भात दोघांनीही कसलीच प्रतिक्रिया माध्यमांना दिली नाही. त्यामुळे दोघांचे अर्ज का दाखल झाले नाहीत, या मागचे राजकारण समजू शकले नाही.
निवडणूक प्रक्रिया पुन्हा
अर्जच दाखल न झाल्याने जामखेड पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नाही, असे निवडणूक पीठासीन अधिकारी जयश्री माळी यांनी जाहीर केले. आता नियोजित वेळेनुसार बुधवारी (ता. 8) ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा होणार आहे. तसे सर्व सदस्यांना नोटिसीद्वारे सूचित केल्याचे माळी यांनी सांगितले.
पोलिस छावणीचे स्वरुप
जामखेड पंचायत समिती परिसरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, याकरिता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.