राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाने विमानतळास तत्त्वतः मान्यता देत जागा विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करा, असे आदेश दिले. परंतू, पुढे हालचाल झाली नाही.
सांगली : निर्यातक्षम शेती उत्पादनांची मोठी बाजारपेठ असलेल्या सांगलीला जगाच्या बाजारपेठेशी कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी कवलापूरचे विमानतळ (Kavalapur Airport) अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतू, कुणीतरी त्यात खोडा घालत आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी हे विमानतळ महत्त्वाचे असून, त्याला लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी संसदेत केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Parliament Budget Session) खासदार विशाल यांनी एक मिनिटाचा वेळ मिळाला होता. त्यांनी १ मिनीट ९ सेकंदाचा वेळ घेत सांगलीच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला घात घातला. विमानतळाची गरज का आहे, हे थोडक्यात विषद करतानाच विमानतळाच्या जागेवर डोळा असणाऱ्यांनाही त्यांनी ‘कौन रोडा डाल रहा है’, असा टोला हाणला.
विशाल पाटील म्हणाले, ‘‘खूप काळापासून प्रलंबित असलेल्या आमच्या कवलापूर विमानतळाच्या मुद्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आमची सांगली हळद नगरी म्हणून ओळखली जाते. साखर, हळद, डाळिंब, मका, कापड उत्पादनात आमचा भाग आघाडीवर आहे. या भागात देश-विदेशातील अनेक व्यापारी येऊ इच्छितात. कारण, आमची बाजारपेठ खूप मोठी आहे. पण, अडचण अशी आहे की आम्हाला हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी नाही. विमानसेवा नसल्याने अनेक व्यापारी इच्छा असून येथे येऊ शकत नाहीत.’’
ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे निर्यातक्षम उत्पादने आहेत. हळद निर्यातीत आम्ही नेहमीच आघाडीवर आहोत. यावर्षी २८८ बिलियन यूएस डॉलरच्या हळदीची निर्यात आम्ही केली आहे. हे योगदान महत्त्वाचे आहे. विमानतळ झाल्यास आणखी निर्यात वाढेल, मात्र विमानतळ होऊ नये यासाठी या प्रयत्नात कुणीतरी खीळ घालतो आहे. आमची जागतिक बाजाराशी, देशाशी कनेक्टिव्हिटी वाढवणे गरजेचे आहे. इथे अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. देशभरातून मुले येथे शिकायला येतात. पालकांना येथे येणे सोयीचे व्हावे, यासाठी विमानतळ गरजेचे आहे.’’
विमानतळासाठी जी जागा कमी पडते ती शेतकऱ्यांशी चर्चेतून मिळवण्यासाठी मी पुढाकार घेईन. सांगलीचा विकास व्हायचा असेल, उद्योग आणि व्यापार वाढायचा असेल तर विमानतळ हवेच. भले छोट्या विमानांसाठी येथे सुविधा होईल, मात्र आपले चित्र बदलू शकेल.
-खासदार विशाल पाटील
कवलापूर विमानतळाच्या १६५ एकर जागेचा सौदा करण्यात आला होता. मुंबईतील एका कंपनीला कवडीमोल भावाने जागा विकण्यात आली होती. हे प्रकरण ‘सकाळ’ने उजेडात आणले. येथे विमानतळच झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. विमानतळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून निमंत्रक पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर यांनी आंदोलन उभे केले. सांगलीतून दबाव निर्माण झाला आणि तो व्यवहार रद्द करण्यात आला.
राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाने विमानतळास तत्त्वतः मान्यता देत जागा विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करा, असे आदेश दिले. परंतू, पुढे हालचाल झाली नाही. कुणीतरी यात अडथळा आणत असल्याची चर्चा सुरू झाली. आता त्यावर थेट संसदेत चर्चा झाली. खासदार विशाल पाटील यांनी मिनीटभराच्या भाषणातून विमानतळाच्या स्वप्नांना नवे पंख देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.