बेळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवारांनी आता प्रचाराला प्राधान्य दिले आहे. मात्र, प्रचारावरही कोरोनाचा इफेक्ट पडला असून मतदार व समर्थकांची बडदास्त ठेवण्यासाठी उमेदवारांनी ढाबे व हॉटेलऐवजी घरातच जेवणावळी आयोजित करण्यावर भर दिला आहे.
मटणाऐवजी चिकनला प्राधान्य दिले जात असून गोवा बनावटीच्या मद्याची चलती आहे. त्यामुळे, बेळगावात गोवा बनावटीच्या मद्याला चांगला दर मिळू लागला आहे. दरवेळी निवडणूक काळात प्रचारात भाग घेणाऱ्या समर्थकांची शेत किंवा ढाब्यावर बडदास्त ठेवली जाते. टोकन पद्धतीवर समर्थकांच्या जेवणाची सोय केली जाते. पण, समर्थकांबरोबर त्यांचे मित्रही ढाब्यांवर जात असल्याने जेवणावळींवरील खर्च वाढतो. शेतातील जेवणावळही खर्चिक होते. भलत्याच प्रभागातील ओळखीचे लोकही जेवणावळीला उपस्थित राहतात.
यंदा लॉकडाउन काळात अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. पण, तरीही ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने अनेकांनी कर्जे काढून तयारी केली आहे. त्यामुळे, खर्चावर मर्यादा येऊ लागली आहे. प्रचार करणाऱ्यांना सायंकाळी पोहे आणि उप्पीट तर रात्री जेवणासाठी अंडी आणि चिकन देण्याचे अनेकांचे नियोजन आहे. घरातच स्वयंपाक करून घराचे आवार किंवा शेजाऱ्यांच्या घरात जेवणाची व्यवस्था केली जात आहे. यासह मतदारांना खूष करण्यासाठी निवडणुकीनंतर बकऱ्याचे जेवण अशी दवंडी उमेदवारच देऊ लागले आहेत.
या सर्व गोष्टींना फाटा देत कमी खर्चात निवडणूक भागविण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पैशांचा पूर वाहिला. ज्यांनी पैसे वाटले तेच समर्थक आता ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्याकडून पैसे मिळतील म्हणून मतदारही आशावादी आहेत. मात्र यंदा खर्चावर नियंत्रण ठेवत पक्षाच्या नावावरच निवडणूक लढण्यावर उमेदवारांचा भर राहिला आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.