नेवाशाच्या नगराध्यक्षपदी पिंपळे

Pimple becomes the president of the city of Nevasha
Pimple becomes the president of the city of Nevasha
Updated on

नेवासे : नेवाशाच्या नगराध्यक्षपदी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या योगिता सतीश पिंपळे आणि उपनगराध्यक्षपदी नंदकुमार पाटील यांची आज निवड झाली. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्तेतून भाजप पूर्णपणे हद्दपार झाला असून, आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली "क्रांतिकारी'चे वर्चस्व निर्माण झाले आहे. 

नगराध्यक्षपद प्रथम अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव होते. नगरपंचायत निवडणुकीत "क्रांतिकारी'ला बहुमत मिळूनही या राखीव जागेवर भाजप उमेदवार निवडून आल्याने प्रथम नगराध्यक्षपद भाजपकडे गेले होते. नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले. 

नेवासे नगरपंचायतीत "क्रांतिकारी'ची सत्ता येणार असतानाच या पक्षाच्या प्रभाग तेरामधील नगरसेविका फिरोजबी पठाण यांचे पद अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून रद्द करण्यात भाजपला यश आले. यामुळे क्रांतिकारी व भाजप यांचे आठ असे समान पक्षीय बलाबल निर्माण होऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी अनुक्रमे "क्रांतिकारी'कडून योगिता पिंपळे व नंदकुमार पाटील आणि भाजप आघाडीकडून शालिनी सुखधान व रणजित सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

निवडीच्या प्रक्रियेस आज सकाळी दहा वाजता सुरवात झाली. या वेळी "क्रांतिकारी'चे सर्व नऊ नगरसेवक उपस्थित होते. भाजपच्या नगरसेवकांचे संख्याबळ आठ असताना या वेळी केवळ सातच नगरसेवक उपस्थित होते. प्रभाग चारमधील भाजप नगरसेविका अनिता डोकडे अनुपस्थित होत्या. हात उंचावून मतदान घेण्यात आले. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे पिंपळे व पाटील यांना प्रत्येकी नऊ, तर भाजप-कॉंग्रेसच्या सुखधान व सोनवणे यांना सात मते मिळाली. 
पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी समीर शेख यांनी मदत केली. नूतन नगराध्यक्ष योगिता पिंपळे व उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

"क्रांतिकारी'ला मोठा दिलासा 

अपात्र ठरविल्या गेलेल्या नगरसेविका फिरोजबी पठाण यांच्या पुनर्विचार याचिकेवर मंत्रालयात मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सुनावणी होऊन राज्य शासनाचा (26 जुलै 2019) व नगर जिल्हाधिकाऱ्यांचा (23 जानेवारी 2019) अपात्र ठरविण्याबाबतचा आदेश रद्द ठरवल्याने पठाण यांच्यासह "क्रांतिकारी'ला मोठा दिलासा मिळाला. 

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांचे तालुक्‍याच्या विविध प्रश्नांसाठी विशेष सहकार्य मिळत असून, नेवाशाच्या विविध प्रश्नांसाठी एक शिष्टमंडळ लवकरच त्यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार आहे. नगरपंचायतीत मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. "क्रांतिकारी'च्या नगरसेवकांनी सामान्य लोकांत जाऊन जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. 
- आमदार शंकरराव गडाख 

"पीए-राज'चा आता अंत 
पाहुण्या ठेकेदाराला मोकळे रान सोडल्याने गेल्या अडीच वर्षांत शहरातील जनतेला गढूळ पाणी मिळाले. शहराची पाणीयोजना, घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वांना अंधारात ठेवून घेतलेली जागा, यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. नगरपंचायतीतील भ्रष्टाचारी राजवट व "पीए-राज'चा आता अंत झाला आहे. 
- नंदकुमार पाटील, नूतन उपनगराध्यक्ष, नेवासे 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.