सोलापूर : राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली
आज पुण्यात उजनीच्या नियोजनासाठी बैठक झाली. उजनीतून कालव्यात व सीना बोगद्यात रब्बीसाठी एक व उन्हाळ्यासाठी पाण्याच्या दोन पाळ्या सोडण्याचा निर्णय झाला आहे. जानेवारीत रब्बीसाठी सिना नदी व कालव्याद्वारे पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही आवश्य वाचाच...कसे जगायचे...पतसंस्थांमध्ये अडकल्या 957 कोटींच्या ठेवी
महापालिकेच्या मागणीनुसार दोन पाळ्या
नियोजनाच्या बैठकीला आमदार बबनदादा शिंदे, आमदार भारत भालके, आमदार संजयमामा शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, आमदार यशवंत माने, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उजनीचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते. सोलापूरकरांना पिण्याच्या महापालिकेच्या मागणीनुसार दोन पाळ्या देण्याचेही या बैठकीत ठरले आहे. सीना नदीमध्ये उन्हाळ्यासाठी 10 मार्च ते 10 एप्रिल या कालावधीत पहिली पाळी दिली जाणार आहे. दुसरी पाळी 20एप्रिल ते 20 मे या कालावधीत दिली जाणार आहे. उजव्या व डाव्या कालव्यातून 20 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान पहिली पाळी दिली जाणार आहे. 1 मे ते 5 जून या कालावधीत दुसरी पाळी दिली जाणार आहे.
हेही आवश्य वाचाच...अवघड झाले महाराष्ट्र एक्स्प्रेसचा स्लिपर कोच रद्द
अजितदादांनी शब्दपूर्ती केली
युतीच्या सरकारने उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने कालवा व सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांची दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची पिके पाण्याअभावी जळून जात होते. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत आल्यास आम्ही उन्हाळ्यात दोन पाळ्या देऊ असा शब्द दिला होता. आजच्या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही शब्दपुर्ती केली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात कालवा व नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांची पिके जगवता येणार आहेत.
- राजन पाटील, माजी आमदार
|