सोलापूर : वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील सावळेश्वर व वरवडे टोल नाक्यांवर रविवारी (ता. 15) वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. फास्ट टॅगमध्ये किमान 50 रुपयांचा बॅलन्स असावा लागतो मात्र, काही वाहनधारकांना त्याची माहिती नसल्याने तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, टोल नाक्यांवरील संघर्ष टाळण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचाच... ठरलं...कर्जमाफीची कट ऑफ डेट 31 ऑगस्ट !
टोल नाक्यांवरुन प्रवास करताना रविवारपासून (ता. 15) प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील 55 टक्के वाहनधारकांकडे फास्ट टॅग नसल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही वाहनांकडे टॅग असतानाही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पैसे भरावे लागल्याचेही पहायला मिळाले. टोल कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करीत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. आगामी 10 दिवस पोलिस बंदोबस्त जैसे थेच असणार आहे. दरम्यान, दुप्पट रक्कम भरायला लागू नये म्हणून वाहनधारकांनी फास्ट टॅगचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक संजय कदम यांनी केले आहे.
हेही वाचाच...'जीपीएस'द्वारे धावणार सोलापुरची परिवहन बस
ठळक बाबी...
- सोलापूर जिल्ह्यातील 45 टक्के वाहनधारकांनी घेतले फास्ट टॅग
- सावळेश्वर व वरवडे टोल नाक्यांवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात
- फास्ट टॅगमध्ये किमान 50 रुपयांचा बॅलन्स शिल्लक असणे आवश्यकच
- तांत्रिक अडचणी आल्या तरीही वाहनधारकाला भरावा लागणार दुप्पट रक्कम
- टोल कर्मचारी अन् वाहनचालकांमध्ये शाब्दीक चकमकी : पोलिसांनी केली मध्यस्थी
- वाहनांच्या रांगा कमी करण्याच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या बंद
हेही वाचाच...सोलापूर जिल्हा बॅंकेला मिळणार 879 कोटी !
परिस्थिती सुधारेपर्यंत पोलिस बंदोबस्त राहणार
फास्ट टॅग काळाची गरज असून आतापर्यंत सुमारे 45 टक्के वाहनचालकांनी त्याचा वापर सुरु केला आहे. ज्यांच्याकडे फास्ट टॅग नाही, त्यांना दुप्पट रक्कम भरावीच लागेल. फास्ट टॅगमध्ये किमान 50 रुपयांचा बॅलन्स असणे आवश्यक आहे मात्र, बहूतांश वाहनचालकांना त्याबद्दल माहितीच नाही. 10 दिवसांत परिस्थिती सुधारुन प्रत्येक वाहनाला फास्ट टॅग असेल, असा विश्वास आहे. तोवर टोल नाक्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- संजय कदम, संचालक, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र
|