कोल्हापूर आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरील या वास्तूवर काही नेत्यांचा डोळा आहे.
कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीचे (Sheti Utpanna Bazar Samiti) शाहू सांस्कृतिक सभागृह कुलूप बंद आहे. तेथे मॉल, बझार किंवा इतर वस्तू खरेदी-विक्रीचे केंद्र तयार करण्याचे नियोजन असले तरीही प्रशस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सांस्कृतिक भवनच्या जागेवर बड्या नेत्यांचा डोळा असल्याचे चित्र आहे. ९९ वर्षांचा करार करून ही जागा बाजार समितीऐवजी कोणत्यातरी नेत्याच्या घशात जाऊ नये, असा मतप्रवाह तयार होत आहे.
शाहू सांस्कृतिक भवन (Shahu Sanskrutik Bhavan) कालबाह्य झाल्यामुळे त्याची डागडुजी व्हावी, बाजार समितीला यातून उत्पन्न मिळावे, हा बाजार समितीच्या फायद्याचा हेतू समोर आणला जात आहे. मात्र, कोल्हापूर आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरील या वास्तूवर काही नेत्यांचा डोळा आहे. आम्ही बाजार समितीचाच फायदा करून घेणार देणार असे सांगून घाट घातला आहे.
सांस्कृतिक भवनामध्ये आतापर्यंत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, कृषी उपयोगीसह राजकीय कार्यक्रम होत राहिले. भवन बाजार समितीच्याच मालकीचे ठेवून ठेका पध्दतीने चालविण्यास दिले होते. बाजार समितीत सध्या प्रशासक आल्यानंतर पुढचा करारच झाला नाही. त्यामुळे येथील कार्यक्रम बंद झाले. बाजार समितीचा महसूल बुडाला. येथे लावणीचे फडही होत होते. अशामधून बाजार समितीला महिन्याला दीड-दोन लाख रुपयांचे भाडे मिळत होते. वर्षाला २० ते २५ लाख रुपये उत्पन्न होते. प्रशस्त भवन बाजार समितीकडेच राहिले पाहिजे.
शेतकरी, व्यापारी, माथाडी, अडत्यांसह सर्वसामान्यांना शहरात कोणताही कार्यक्रम घेता यावा, यासाठी मोठे सभागृह बांधले. त्याला ५० वर्षे उलटून गेली आहेत. १९८० ते १९९० दरम्यान सभागृह धूळखात पडले होते. त्यानंतर बाजार समितीने २००५ मध्ये याची डागडुजी आणि नूतनीकरण केले. एकाच वेळी दीड हजारांहून अधिक प्रेक्षक बसतील, एवढी क्षमता आहे. आता पुन्हा हे सभागृह बंद आहे. कालबाह्य झाले आहे.
याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्यानंतर मॉल किंवा इतर कामासाठी याचा वापर केला जाणार आहे. हे करत असताना ९९ वर्षाच्या कराराने सभागृह कोणाच्या तरी घशात जाऊ नये, सभागृहाचा शंभर टक्के फायदा बाजार समितीलाच व्हावा, यासाठी विद्यमान संचालकांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
शाहू सांस्कृतिक भवनची इमारत कालबाह्य झाली आहे. याचे स्ट्रक्चरल ऑडिट होईल. त्यानंतर इमारतीचे बांधकाम केले जाईल. यामध्ये मॉल, सुसज्ज नवीन सभागृह आदी सुविधा देण्याबाबत चर्चा झाली आहे. यामुळे बाजार समितीचा फायदा होणार आहे.
-जयवंत पाटील, सचिव, बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.