कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे.
चिपळूण : कोयना धरणातून (Koyna Dam) पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे (Power Generation Station) पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्यातील गळती काढण्याचे काम महिन्याभरात सुरू होणार आहे. यासाठी १९ नोव्हेंबरपासून कोयनेच्या टप्पा १, २ ची वीजनिर्मिती बंद केली जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या वीजनिर्मिती क्षमतेत ५०० मेगावॉटची घट होणार आहे.
पोफळी परिसरातील ४ गावांचा पाणीपुरवठाही दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे. गेली पाच वर्षे ही गळती सुरू आहे. त्यामुळे दिवसा हजारो लिटर पाणी वाया जाते. कोयना प्रकल्पाच्या (Koyna Project) पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक सर्जवेल बांधलेली आहे.
या विहिरीपासून पुढे दाबाने बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० मध्ये बांधून पूर्ण झाली आहे. डोंगरातील कातळ फोडून ही विहीर बांधलेली असून, ती कातळात १०० मीटर खोल खोदलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रूंदीचे काँक्रिटचे अस्तरीकरण केलेले आहे. साठ वर्षे या भिंतीने भूकंपाचे अनेक धक्के पचवलेले आहेत. आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्हटनेल किंवा आपत्कालीन झडपेद्वारे भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते. ही गळती काढण्यासाठी सुमारे २२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
सर्जवेलची जागा अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यामुळे तिथे मशिनरी नेऊन दुरुस्ती करणे सोपे नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लाणार आहे आणि दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच शक्य आहे. या सर्व कारणांमुळे गेली चार-पाच वर्षे दुरुस्तीचे काम रेंगाळलेले होते. गळती काढणे आणि त्या वेळी वीजनिर्मिती बंद ठेवणे यासाठी ऊर्जा आणि जलसंपदा खात्याची मंजुरी आवश्यक होती. हे दोन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. मंजुरीनंतर गळती काढण्याच्या कामाला वेग आला आहे. १९ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा बंद करून गळती काढण्याच्या कामाची प्राथमिक तयारी सुरू केली जाणार आहे.
पोफळी येथील ईव्हीटीच्या पाण्यावर पोफळीसह कोंडफणसवणे, शिरगाव, मुंढे गावच्या पाणीयोजना अवलंबून आहेत. टप्पा एक आणि दोनमधील वीजनिर्मिती बंद झाल्यानंतर या गावच्या पाणीयोजना बंद होणार आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यांसाठी या गावांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.
पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्यातील गळती काढण्याचे काम काही दिवसांत सुरू होणार आहे. त्याचे नियोजन जलसंपदा खात्याकडून सुरू आहे. कोयनेच्या टप्पा १ आणि २ ची वीजनिर्मिती बंद ठेवावी लागणार आहे. चार गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत नियोजन सुरू आहे.
-महेश जाधव, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.