सोलापूर : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 13 ते 28 सप्टेंबर या काळात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, काही जिल्ह्यांत लोकसंख्येचे सर्व्हेक्षण कमी झाल्याने ही मोहीम 5 ऑक्टोबरपर्यंत चालली. राज्यातील 35 जिल्ह्यांत राबविलेल्या या मोहिमेत सोलापुरात 106 तर राज्यात सात हजार 118 नवे कुष्ठरुग्ण आढळले असून कुष्ठरोगमुक्तीसाठी दरवर्षी एक हजार 230 कोटींचा खर्च केला जाणार आहे. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोफत उपचाराची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचाच...अरे वा....सर्वात कमी वयात न्यायाधीश बनण्याचा मान तोळणूरच्या आयेशाला
राज्यातील आठ कोटी 56 लाख 13 हजार 281 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण होणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी सात कोटी 90 लाख सहा हजार 123 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण झाले. त्यामध्ये किमान सात हजार कुष्ठरोगी सापडतील असा अंदाज असतानाही त्यापेक्षा अधिक कुष्ठरुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग जागा झाला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा, सांगोला या तालुक्यांत सर्वाधिक 70 तर उर्वरित तालुक्यांमध्ये 36 रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. नाशिक, अकोला, बुलढाणा, नागपूर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोगी वाढत असल्याचे चित्र आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. नियमित उपचार तथा वेळेत उपचार घेतल्यास कुष्ठरोग बरा होतो, असे आरोग्य विभागाने सांगितले. आजाराची लक्षणे दिसू लागल्यास संबंधितांनी शासकीय रुग्णालयातून खात्री करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
-
ठळक बाबी...
- राज्यात ऑक्टोबरमधील मोहिमेत आढळले नवे सात हजार 118 कुष्ठरोगी
- सोलापूर, नाशिक, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, कोल्हापूर, पुणे ग्रामीण अव्वल
- कुष्ठरुग्णांवरील मोफत उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधसाठा
- 2024 पर्यंत महाराष्ट्र कुष्ठरोगमुक्त करण्याची विशेष मोहीम : दरवर्षी बाराशे कोटींचा खर्च अपेक्षित
हेही आवश्य वाचाच...अरेच्चा...27 वर्षांनंतर आलेलाही मुहूर्त हुकलाच
उपचारातून बरा होईल कुष्ठरोग
ऑक्टोबरमधील कुष्ठरोगी शोध मोहिमेअंतर्गत सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यात 537 तर राज्यात सुमारे सात हजार कुष्ठरोगी आढळले आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे. पुरेशा प्रमाणात औषधसाठाही उपलब्ध आहे मात्र, रुग्णांनी स्वत:चा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी दवाखान्यांमध्ये जाणे गरजेचे आहे.
- शीतलकुमार जाधव, सहसंचालक, कुष्ठरोग, पुणे |
|