नेर्ले - येथील पुणे-बंगळूर महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) येथे घरात साठा करून ठेवलेले रक्तचंदन लाकडाचे ओंडके कासेगाव पोलिसांनी हस्तगत केले. बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे एक कोटी आहे. विजय बाळासाहेब तांबवे (रा. केदारवाडी, ता. वाळवा जि. सांगली) याला ताब्यात घेतले आहे. अजून काही संशयित असून, त्यांचा शोध सुरू आहे.
रक्तचंदनाचे एकूण २० ओंडके असून, वजन ७५८.४०० किलोग्रॅम आहे. त्याची बाजारभावानुसार किंमत ९१ लाख ८०० रुपये आहे. कासेगाव पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.
कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, केदारवाडी (ता. वाळवा) येथील विजय बाळासाहेब तांबवे व युनूस भय्या (पूर्ण नाव माहीत नाही) याने जयकर तुकाराम पाटील यांच्या घरात ९१ लाखांचे रक्तचंदनाचे ओंडके लपवून ठेवल्याची माहिती कासेगाव पोलिसांना गुप्तहेरांच्या माध्यमातून कळाली.
पोलिसांनी सापळा रचत संदर्भीय माहिती घेऊन माहितीची सखोल चौकशी करत मुद्देमाल असल्याची खात्री केली. याबाबत सांगली जिल्हा पोलिसप्रमुख बसवराज तेली व वरिष्ठांना कळवून सापळा रचला. आज दुपारी कासेगाव पोलिसांनी सापळा रचत केदारवाडी येथील तुकाराम पाटील याच्या घरावर छापा टाकत चंदनाचे ओंडके ताब्यात घेतले.
दोघांनी दोन दिवसांपूर्वी रक्तचंदन बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने आणले आहे, अशी गोपनीय बातमी कासेगाव पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अनिल पाटील, दीपक हांडे, दीपक घस्ते, आनंद देसाई यांना मिळाली होती. वनरक्षक एस. टी. वाघमारे, व्ही. व्ही. डुबल यांनी कारवाईत सहभाग घेतला.
रक्तचंदन सापडल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. एवढे रक्तचंदन आले कुठून? कोणी आणले? कसे आणले? याबाबत पोलिसांना कसे माहीत नाही? अजून काहीजण पडद्याआड आहेत. त्यांची नावे लवकरच कळतील. कासेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव तपास करीत आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव, आर. पाटील, माणिक मोरे, कुमार शेणेकर, अनिल पाटील, दीपक हांडे, विजय पाटील, सचिन चव्हाण, सुरेंद्र पाटील, संग्राम कुंभार, जयकर सुतार, अविनाश लोहार, सचिन पाटील, संदीप सावंत, शरद कुंभार, तुषार जाधव, संजय गलगुडे, दीपक पवार, दीपक शिंदे, विशाल भोसले, वैशाली मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
एकच ‘पुष्पा’ जाळ्यात
पुष्पा चित्रपटाला साजेसा असा रक्तचंदनाचा खजिना कासेगाव पोलिसांना मिळाला; पण कोट्यवधीचे रक्तचंदन हस्तगत करत असताना पोलिसांना एकच संशयित आरोपी सापडला. त्यामुळे यात अजून किती ‘पुष्पा’ आहेत, याकडे पोलिसांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.