महाडिक बंधुंनी भाजपचा पर्याय का निवडला ?

Rahul And Samrat Mahadik Enters In BJP Sangli Marathi News
Rahul And Samrat Mahadik Enters In BJP Sangli Marathi News
Updated on

इस्लामपूर ( सांगली ) - शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात निर्णायक ताकद असलेल्या राहुल महाडिक व सम्राट महाडिक या दोघा बंधूंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांचे चुलत बंधू माजी खासदार धनंजय महाडिक, गोपीचंद पडळकर, माजी आमदार शिवाजीराव नाईक हे महाडिक बंधूंच्या भाजप प्रवेशावेळी प्रमुख उपस्थित होते. महाडिक यांच्या भाजप प्रवेशामुळे शिराळा व वाळवा तालुक्यात भाजपला बळकटी मिळेल. 

आज सकाळी नऊच्या सुमारास कोल्हापूर येथे या दोघा बंधूंचा भाजप प्रवेश झाला. या प्रवेशामुळे दोन्ही तालुक्यातील राजकीय गणिते आता बदलणार आहेत. शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राहुल महाडिक या दोघा बंधूंनी गत विधानसभा निवडणूकीत भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र भाजपने या दोघांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सम्राट महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात बंडखोरी करत मोठे आव्हान निर्माण केले. सम्राट महाडिक यांना 47 हजार मतदान मिळाल्यामुळे शिवाजीराव नाईक यांचा पराभव होऊन राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक निवडून आले.

भाजपमध्ये जाण्याचा पर्याय यासाठीच निवडला

निवडणूकीनंतर महाडिक गट काय भुमिका घेणार या बाबत उत्सुकता होती. राहुल व सम्राट महाडिक यांनी पेठ नाका येथे व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेच्या आवारात विधानसभा निवडणूकीनंतर आभार मेळावा घेऊन लवकरच राजकीय भुमिका स्पष्ट करु असे संकेत दिले होेते. त्यानंतर महाडिक बंधू कोणत्या पक्षात जाणार या बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार सक्षम असल्याने राष्ट्रवादीत महाडिकांना ‘ राजकीय स्पेस ’ मिळणार नाही, त्यामुळे ते शिवसेना, काँग्रेसचा किंवा भाजपचा पर्याय निवडतील असे बोलले जात होते. मात्र या पुर्वी शिवसेनेने त्यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी डावलली होती. तर काँग्रेसने आजपर्यंत त्यांचा वापरच करुन घेतला असे महाडिक गटातील कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. याबरोबरच महाडिक कुटुंबातील जेष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याने या दोघा बंधूंचाही भाजपमध्ये प्रवेश होईल असे तर्क बांधले जात होते.

इस्लामपुरात लवकरच मोठा कार्यक्रम

येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत कार्यकर्त्यांना मानाची पदे अथवा स्थान मिळण्यासाठी एकमेव भाजप हाच महाडिक बंधूंना सुरक्षित पक्ष वाटल्याने त्यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन भाजपमध्ये प्रवेश केला. जानेवारीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत इस्लामपुरात मोठा कार्यक्रम घेऊन महाडिक बंधू भाजपच्या ध्येयधोरणानुसार वाटचाल सुरु करणार आहेत. या बरोबरच दोन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचाही या कार्यक्रमात पक्षप्रवेश होईल.

कोणतीही अट न घालता भाजप प्रवेश

आज वाळवा तालुक्यातील जेष्ठ नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार बैठकीत राहुल महाडिक म्हणाले, “ महाडिक गट हा दोन्ही तालुक्यात निर्णायक गट म्हणून काम करतो. या पुढे गटाला पक्षशिस्त असावी व कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांत संधी मिळावी म्हणून कोणतीही अट न घालता आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.”

भाजप हाच सक्षम पर्याय

सम्राट महाडिक म्हणाले, “ आम्ही विधानसभा निवडणूकीनंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव चांगला पक्ष निवडण्यासाठी चर्चा करत होतो. भविष्यातील वाटचालीला भाजप हाच सक्षम पर्याय दिसल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. या पुढे भाजपचा पक्षादेश मानून पक्षशिस्त पाळत संघटन पातळीवर काम करु.”

आजचा निर्णय अतिशय योग्य

सी. बी. पाटील म्हणाले, “ भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. महाडिक गटाने यापुर्वी इस्लामपूर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत भाजपला मदत केली आहे. त्यामुळे आजचा निर्णय हा अतिशय योग्य आहे. सम्राट व राहुल महाडिक यांच्या पाठीशी ताकद उभी करु.” 

विकास आघाडीचे भवितव्य अंधारात 

इस्लामपूर नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत महाडिक गटाने या पुर्वी जयंत पाटील यांच्या पारंपारिक विरोधकांना एकत्रित करत विकास आघाडीची स्थापना करुन मोठी लढत दिली आहे. स्व. नानासाहेब महाडिक यांचे या विकास आघाडीसाठी मोठे योगदान होते, त्यामुळे विकास आघाडीची मोळी घट्ट बांधलेली होती. मात्र आता महाडिक यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने व शिवसेना राज्य पातळीवर भाजपच्या विरोधात असल्याने विकास आघाडीचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.