बावची - विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्णांबद्दल बऱ्याचदा चीड संताप व्यक्त होत असते, तर कधी थोडी हळहळ वाटते आणि जगण्याच्या रहाटगाडग्यात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे निघून जात असतो, मात्र येथील तरुणांनी संवदेना दाखवत सुमारे सात वर्षे रस्तो रस्ती भटकणाऱ्या एका तरुणाला पुन्हा माणसात आणले. त्याला पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या हवाली केले. भाषा, प्रांत, जात, धर्म अशा भेदभावात समाज विभागला जात असताना ही घटना समाजजीवनासाठी ही एक रुपेरी किनारच आहे.
राजू चव्हाण या तरुणाच्या आयुष्याचा हा पट. आई-वडिलांच्या निधनाचा आघात सहन न झाल्याने सात वर्षे तो विमनस्क स्थितीत भटकत होता. विजापूरजवळील दरदगी त्याचे गाव. पंचविशीत त्याचे लग्न ठरले. साखरपुडा झाला. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत असताना अचानक आई-वडिलांचे लागोपाठ कृपाछत्र हरवले. प्रचंड मानसिक धक्यातच तो घरापासून परागंदा झाला. गावोगाव भटकत राहिला. त्याची ही मन:स्थिती ढासळतच गेली.
या काळात तो कुठे कुठे फिरला असेल हे त्या परमेश्वरालाच माहीत. गेल्या वर्षी तो पहिल्यांदा या परिसरात दिसला. आष्टा येथील शिंदे मळा ते इस्लामपूरजवळील प्रकाश हॉस्पिटल या रस्त्यावर तो अस्ताव्यस्त स्थितीत फिरत होता. मळलेले कपडे, वाढलेल्या जटा-दाढी अशा ओंगळवाण्या स्थितीतील राजूकडे सारे दुर्लक्ष करीत पुढे निघून जायचे. मात्र येथील तरुण कार्यकर्ते वैभव मोरे, अमरदीप काटे, अभिजित कांबळे त्याला पुन्हा माणसात आणण्यासाठी खटपट सुरू केली. त्याचे असे मोकाट फिरणेच जीवाशी खेळ होता. त्यामुळे त्याला आधी गावात आणले. त्यानंतर अशा रुग्णांवर होणाऱ्या उपचारांबद्दल माहिती घेतली. त्यातून त्यांना रत्नागिरीच्या माहेर संस्थेचा पत्ता मिळाला. त्यांनी त्याला तिथे स्वतःच्या चारचाकीतून तिथे नेले.
सहा महिन्यांच्या उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला. या काळात या तरुणांनी त्याच्या खर्चाची जबाबदारी उचलली. एखाद्या नातेवाईकाप्रमाणे त्यांनी संस्थेशी संपर्क ठेवून काळजी घेतली. त्यानंतर राजूने सांगितलेल्या माहितीच्या आधारे संस्थेने त्याच्या नातलगांशी संपर्क साधला. त्याचे चुलते व आतेभाऊ यांनी येऊन त्याला घरी नेले. जाताना त्यांनी बावची येथे येऊन तरुणांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. जणू राजूला जीवदान दिल्याबद्दलची भावनाच त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होती. आजच्या अस्वस्थ वर्तमानात अशा घटना मनाला नक्की उभारी देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.