जयसिंगपूर, (कोल्हापूर) : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि प्रादेशिक आर्थिक भागिदारी करार रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील अंकली टोल नाक्यावर बुधवारी चक्का जाम आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते आणि वाहनधारकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने टोल नाका परिसर दणाणून गेला. तर, देशव्यापी आंदोलन हा ट्रेलर असून सरसकट कर्जमाफी आणि आरसीईपी रद्द ने केल्यास देशभर शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याचा इशारा, स्वाभिमानीचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
हे पण वाचा - आला रेऽऽऽ आला..कोल्हा आला !
शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीच्या या आंदोलनात सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दिला. हा आमचा सत्याग्रह आहे. आमच्या भावना मुर्दाड केंद्र आणि राज्य सरकारला कळविण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कृषीप्रधान देशात दुर्दैव आहे. हे चित्र आपोआप निर्माण झाले नाही. याला अनेक कारणे आहेत. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबविले आहे. त्याचेच हे परिणाम आहेत. गेल्या सहा सात वर्षात शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतीमालाच्या आयात निर्यातीचे धोरण राबविले. गरज नसताना शत्रू राष्ट्रातून कांदा आयात केला. साखर आयात केली.
नुकतेच तुर्कस्तानसारख्या देशातून कांदा आयात केला. ज्यावेळी पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतात त्यावेळी मात्र केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेते. गेल्या सहा सात वर्षात पेट्रोल, डिझेलचे भाव चढे राहिले. त्यासाठी सरकारने काही कारवाई केली नाही. पण शेतीमालाचे थोडे जरी भाव वाढले तर लगेच भाव पाडण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत कृषी भवनमध्ये बसणारे दलाल, ठेकेदारांना पोसण्याचे धोरण राबविल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली.
हे पण वाचा - कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर
देशाच्या एकूण उत्पन्नापैकी कृषी क्षेत्राचा हिस्सा घटत आहे. गेल्या सहा वर्षातील आजवरचा निच्चांकी आहे. हे कमी म्हणून की काय सरकारने आरसीईपी करार देशावर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात सोळा देश सहभागी होणार आहेत. पैकी जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, भारत यासारखे मोठे देश आहेत. पण खरा धोका चीन, जपान, सिंगापूर, न्युझीलंड, ऑस्ट्रेलियाचा आहे. ज्यांनी मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ, पामतेल, कापूस, कापड आयात होण्याचा धोका आहे. यामुळे देशातील वस्त्रोद्योग मोडकळीस येणार आहे.
हे पण वाचा - खेळाडूंसाठी खुषखबर ; टबाडा ठरणार वरदान
कापूस, तांदूळ, दूध, भाजीपाला उध्दवस्त होणार आहेत. यामुळे या कराराची गरज नाही. यातून रोजगाराची संधी हुकणार आहे. नवे राहूदेत आहे तेही उद्योग बंद पडत आहेत. औद्योगिक वसाहती आज अडचणीतून वाटचाल करत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. मायक्रो फायनान्सकडून घेतलेल्या कर्जासाठी शेतमजूर महिलांचा छळ मांडला आहे. याकडेही सरकारने लक्ष दिले नाही. विधानसभेच्या निवडणूकीत सहभागी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीनही पक्षाच्या बड्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचे आश्वासन दिले होते. आज राज्यावर साडेसहा लाख कोटीचे कर्ज असल्याचे सांगून आपणच दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरविण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे पण वाचा - अखेर `त्या ` यादीला ब्रेक; महाविकास आघाडीचा पहिला दणका
डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने घाईगडबडीने कर्जमाफी जाहीर केली. याचा कुणालाही फायदा झाला नाही. अर्थमंत्री जयंत पाटील सांगत होते कर्जमाफीमुळे 31 हजार कोटी खर्ची पडणार आहेत. जयंत पाटलांनी हे सिध्द करुन दाखविले पाहिजे. अजित पवारांनीही हे सिध्द करुन दाखविले पाहिजले की सध्याच्या कर्जमाफीमुळे 31 हजार कोटी कसे खर्ची पडणार आहेत. ही धुळफेक आहे. सहा ते सात हजार कोटींवर खर्ची पडणार नाहीत. अवकाळी व महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज होती. ज्या पिकावर शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे ते पिकच अस्तित्वात नाही तर कर्ज भरणार कसे? थकबाकीदारांना कर्ज माफ केले त्याऐवजी 30 सप्टेंबरला ज्याच्या ज्याच्या नावे कर्ज होते त्या सर्वांचेच कर्ज माफ व्हायला हवे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आह.े यापुढे तीव्र आंदोलन करुन प्रश्न सोडवू असा इशारा शेट्टी यांनी दिला.
यावेळी भरत बॅंकेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके, सुवर्णा अपराज यांनी मनोगत व्यक्त केले. स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभुशेटे, सचिन शिंदे, सुभाष शेट्टी, ऋतुराज सावंत-देसाई, सागर मादनाईक यांच्यासह शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधिक्षक किशोर काळे, जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त राखण्यात आला.
हे पण वाचा - चंद्रकांतदादा म्हणाले, येथे आम्ही कापले शिवसेनेचे नाक...
आंदोलकांची माणुसकी
चक्का जाम आंदोलन सुरु असताना जयसिंगपूरकडून सांगलीकडे जाण्यासाठी तीन रुग्णवहिका सायरन करीत आल्या. यावेळी आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट करुन देत माणुसकी जपली.
राजू शेट्टी म्हणाले
नोव्हेंबर महिन्यात राज्यात तीनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या
दररोज दहा शेतकऱ्यांचा गळफास
महाविकास आघाडीकडून कर्जमाफीची दिशाभूल
कर्जमाफीमुळे 31 हजार कोटी खर्ची पडणार सिध्द करावे
मंत्री जयंत पाटील, अजित पवारांची ही जबाबदारी
सध्याच्या कर्जमाफीमुळे सहा ते सात हजार कोटी खर्ची पडणार
|