विटा : महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाची फेररचना करण्याबाबत राज्य शासनाने प्रस्ताव तयार केला असून त्याअंतर्गत सांगलीत नव्याने सुरू होत असलेला लेखापरीक्षण (ऑडिट) विभाग सांगलीऐवजी कोल्हापूर जीएसटी कार्यालयात सुरू करावा व सांगली जिल्ह्यातील जीएसटी लेखापरीक्षणाची सर्व कामे कोल्हापूर कार्यालयात चालवावीत, असे प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जीएसटी करदात्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून जिल्ह्यातील सर्व औद्योगिक व व्यापारी संघटनांनी लेखापरीक्षण विभाग कोल्हापूरला न जोडता तो सांगलीतच असला पाहिजे, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे, अशी माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली.
या प्रस्तावामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची गैरसोय होणार आहे. शेजारच्या पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर याठिकाणी सहआयुक्तांच्या पोस्टच्या नवनिर्मितीच्या माध्यमातून ऑडिटची कामे त्या-त्या ठिकाणी चालणार असून केवळ सांगलीमधील लेखापरीक्षण काम कोल्हापूरला जोडण्याचे प्रस्तावित केल्याचे दिसून येत आहे.
याकामी सध्या सांगली जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेले २ उपायुक्त, ३ सहआयुक्त, ४ राज्यकर अधिकारी व ३२ राज्य कर तपासनीस अशा ४० ते ४५ कर्मचाऱ्यांच्या जागा सांगली कार्यालयातून संपुष्टात आणून त्या कोल्हापूर कार्यालयात कार्यरत करण्याबाबत शासन आदेश पारित करण्यात आला आहे.
वस्तुतः संपूर्ण कोल्हापूर जीएसटी विभागामध्ये जिल्ह्यातून सर्वाधिक जीएसटी संकलन होत असते व कोणत्याही जीएसटी लेखापरीक्षण सुनावणीमध्ये करदाता व करसल्लागार यांना सर्व हिशेबाचे दप्तर, वह्या घेऊन किमान चार-पाच वेळा जीएसटी कार्यालयात जावे लागत असते.
या बाबीचा विचार करता सांगलीचा जीएसटी कार्यालयाचा लेखापरीक्षण विभाग कोल्हापूरला स्थलांतरित करण्यामुळे विट्यासह जिल्ह्यातील सर्व करदात्यांची गैरसोय होऊन जिल्ह्यातील करदात्यांवर अन्याय होणार आहे. याचा विचार करून सांगली कार्यालयातील अन्य विभागांसह लेखापरीक्षण विभागही सांगलीतच सुरू राहिला पाहिजे, तसेच सध्या राज्य जीएसटीकडील अपिलाची कामे कोल्हापूरमध्ये चालतात,
मात्र केंद्रीय जीएसटीकडील अपिलासाठी सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील करदात्यांना पुणे जीएसटी कार्यलयात जावे लागते. यामुळे करदात्यांचा वेळ व पैसैही खूप खर्च होत असतात.
गैरसोय टाळण्यासाठी राज्य जीएसटी अपील विभागाबरोबरच केंद्रीय जीएसटी अपील विभागदेखील कोल्हापूर कार्यालयात सुरू करावा, अशी मागणी विटा यंत्रमाग संघासह विट्यातील किराणा, कापड, कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या संघटनेने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.