रात्र व्हायच्या आधी त्यांची एक प्रकारची ही कवायत असते, ज्यातून ते आपले संघटन शत्रूला दाखवून देतात. गरूड किंवा बहिरी ससाणा त्यांचा शत्रू असतो.
-शरद आपटे, पक्षितज्ज्ञ
सध्या हरिपूर संगम किंवा सांगलीत आयर्विन पूल (Irwin Bridge Sangli) परिसरात सायंकाळी किंवा पहाटे सहाच्या सुमारास गेलात, तर संपूर्ण आकाशव्यापी अशी पक्ष्यांची कवायत दिसते. हजारो पक्ष्यांचा हा थवा आकाशात विहार करतोय. एका लयीत लाटांवर लाटा याव्यात, तसा त्यांचा हा विहार पाहून थक्क व्हायला होते.
रस्त्यावर थोडी गर्दी झाली तर आपली एकमेकांस धक्काबुक्की होते. इथे हजारो पक्षी इतक्या जलद गतीने एकमेकांस खेटून, वाकडे-तिकडे उडत असतात; मात्र तरीही कोणताही गोंधळ नाही की पडापड नाही. हे पक्षी असतात साळुंखीच्या आकाराचे. त्यांना मराठीत ‘भोरड्या’ तर इंग्रजीत ‘रोझी स्टार्लिंग’ (Rosy Starling Bird) असं नाव आहे. त्यांच्याविषयी...
या ‘भोरड्या’ आपल्या भागात दिसतात त्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये. आपल्याकडे तेव्हा पाऊस संपून थंडी सुरू झालेली असते. त्या येतात युरोपमधून (Europe). २३ अंश सेल्सिअसखालील तापमान असलेल्या प्रदेशात त्या राहतात. तिकडे थंडीचा कडाका वाढू लागला की, कमी थंडीच्या भारतीय उपखंडात त्या येतात. सुरवातीच्या काळात किशोरवयीन पक्षी येतात. तेव्हा त्यांची जमिनीवरच किंवा कमी उंचीच्या झाडावर घरटी असतात. त्यांचे पालक त्यांना खाऊ-पिऊ घालून त्यांना तंदुरुस्त बनवून पुढे धाडतात. मागाहून पालक मंडळी येतात. इकडे उडून येण्याइतपत चरबीचा साठा त्या काळात त्यांच्याकडे कमी असतो.
बालक मंडळी इकडे पोहोचली की पाठोपाठ ज्येष्ठ पालक मंडळी निघतात. साधारण थंडीचे चार महिने इथे काढून एप्रिलमध्ये त्यांचा पुन्हा परतीचा युरोपप्रवास सुरू होतो. सध्या त्यांची आकाशात दिसणारी कवायत ही जायची तयारी असल्याचे लक्षण आहे. एरव्ही थंडीचे चार महिने ते विखरून राहतात. अन्नाचा शोधात पाणथळ जागी, हिरव्या शिवाराच्या आश्रयाला राहतात. अनेक प्रकारची पिके, फुलांतील मकरंद, जमिनीवरचे, झाडावरचे कीटक भक्षण करणारे असे ते मिश्राहारी आहेत.
साधारण चार महिने झाले की त्यांची जायची तयारी, म्हणजेच असं एकत्र येणे असते. एका ठराविक अन्नाची भरपूर सोय असलेल्या भागात एकत्र येतात. जिथे रात्री मुक्काम असतो, अशा भरगच्च झाडीच्या परिसरात एकोप्याने राहतात. रात्र व्हायच्या आधी त्यांची एक प्रकारची ही कवायत असते, ज्यातून ते आपले संघटन शत्रूला दाखवून देतात. गरूड किंवा बहिरी ससाणा त्यांचा शत्रू असतो. निवासस्थानाच्या परिसरात जाण्याआधी त्यांची त्या परिसरात गर्दी सुरू होते.
मग त्यांचे कवायतीद्वारे संघटन दिसून येते. हा काळ त्यांचा इथून निघून जायचा असतो. ते सायंकाळी एकत्र येतात, तेव्हा त्या परिसरात अन्न कोठे आहे, याची देवाणघेवाण करीत असतात. त्याआधारे ते जिकडे अन्न आहे, त्या दिशेने मोठ्या संख्येने पहाटे सहा-सातच्या सुमारास रवाना होतात. अशा कवायती करीत ते मजल-दरमजल करीत युरोपच्या दिशेने निघतात. एप्रिलअखेर त्यांनी भारतातील मुक्काम संपवलेला असतो आणि पुढच्या प्रजननासाठी ते युरोपमध्ये दाखल होतात.
इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येऊनही त्यांची पडापड कशी होत नाही, त्यांचे सूत्रसंचालन कसे होत असावे, असा प्रश्न पडतो. त्याचही अभ्यास झाला असून या हजारोंच्या थव्यांची वर्गवारी सहा जणांच्या एकत्र गटात केलेली असते. त्या सहाजणात एक गटप्रमुख असतो. त्याच्या इशाऱ्यावर या संपूर्ण कवायतीचे नियंत्रण होत असते. मध्यंतरी सांगली शिक्षण संस्थेच्या दहा हजार मुलांनी एकाचवेळी लेझीम खेळण्याचा विक्रम केला होता. ते करताना असेच छोटे-छोटे गट केले होते. तसेच हे मेकॅनिझम असते. एका थव्यात किती पक्षी असू शकतील, याचाही अंदाज बांधता येणे शक्य आहे. त्यासाठी या थव्याचा एक एन्लार्ज फोटो काढायचा. त्यावर एक चौरस इंचाचे चौकोन आखायचे. त्यातला एक चौकोन इन्लार्ज करून दिसणारे ठिपके मोजायचे. ती संख्या गुणिले एकूण चौकोन म्हणजे अंदाजे पक्षिसंख्या येते. आम्ही एकदा असा प्रयोग केला, तेव्हा २२ हजार पक्षी मोजले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.