सांगली : २१ कोटी निधी खर्चासाठी विकास आघाडी-राष्ट्रवादीची सहमती

रस्ता विकास निधी कुणी आणला याच्या श्रेयवादातून आज सुरू झालेल्या सभेचा नूर समारोपाअंती सहमतीकडे वळला.
Islampur Corporation
Islampur CorporationSakal
Updated on

इस्लामपूर (जि. सांगली) : रस्ता विकास निधी (Road Development Fund) कुणी आणला याच्या श्रेयवादातून आज सुरू झालेल्या सभेचा नूर समारोपाअंती सहमतीकडे वळला. दोन्ही गटनेत्यांच्या व प्रमुख नेत्यांच्या चर्चेतून शहराला आलेला निधी योग्य पद्धतीने विकासकामांसाठी खर्च करण्याचा सहमतीचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील नियोजन पालिका पदाधिकारी आणि प्रशासन एकत्रित येऊन करणार आहेत.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विशेष सभा झाली. सभेची सुरुवात अभिनंदनाचा ठरावावरून झाली. यात श्रेयवाद उफाळून आला. शिवसेनेने २१ कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगत विकास आघाडीचे नगरसेवक अमित ओसवाल यांनी शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यामुळे शहराला हा निधी उपलब्ध झाल्याचे सांगत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

Islampur Corporation
अकोला : मनपा निवडणुकीला ओबीसी आरक्षणाची बाधा!

त्यांना थांबवत आनंदराव पवार उठले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शहराला २१ कोटी मिळाले असे सांगून त्या दोघांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पुन्हा शहाजी पाटील यांनी उठून जयंत पाटील यांनीच हा निधी मिळवून दिल्याचे सांगत जयंत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. हा सगळा खेळ दोन्ही बाजूंनी सुरू असताना दोन्हीकडच्या नगरसेवकांनी बाक वाजवत दोघांनाही उत्साही प्रतिसाद दिला. नगराध्यक्ष हे शांतपणे पहात होते. नगरसेवक शकील सय्यद यांनी ल शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा ज्वलंत विषय असून विशेष रस्ता अनुदानाच्या निधीसाठी तातडीची बैठक बोलावली आहे, योग्य निर्णय होण्याची अपेक्षा मांडली. दरम्यान सुप्रिया पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केल्याने हा निधी मिळाल्याचे सांगत त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडला.

नगरसेवक खंडेराव जाधव यांनी हा निधी श्रेयवादासाठीचा नाही, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत. मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून जुन्या ११ कोटी रुपयांच्या स्थगितीचा विषय मार्गी लागला असून नव्याने १० कोटी रस्ते विकासासाठी मंजूर झाल्याचे सांगितले. त्यावर आनंदराव पवार यांनी टीका करत 'हा निधी जर त्यांनी आणला असता तर मागच्या तीन बैठकांना गैरहजर का राहिला? असा सवाल उपस्थित केला. त्यावर जाधव यांनी जे सन्माननीय सदस्य निधी आणल्याचे सांगत आहेत, त्यांनी शिफारस पत्र दिल्याचे पुरावे सादर करावेत असे आव्हान दिले. ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी यांनी शहराला एकाच वेळी रस्त्यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, शहराचे भाग्य उजळले आहे. कायद्याचा कोणताही कीस न पाडता एकाचवेळी २१ कोटी रुपये रस्त्यांसाठी खर्ची टाकावेत आणि हे श्रेय सगळ्या सभागृहाला द्यावे अशी सूचना केली आणि उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांनीही सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामांची निश्चिती करण्याची मागणी केली.

Islampur Corporation
बैलगाडा शर्यतीच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील म्हणतात; 'सर्वोच्च न्यायालयाच्या..'

दरम्यान या चर्चेच्या मधल्या काळात नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करत विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही बाजूच्या प्रमुखांना एकत्र बसवून मार्ग काढण्याची विनंती केली. यातून अर्ध्या तासाचा वेळ घेत झालेल्या चर्चेअंती समन्वयाने हा निधी शहराच्या विकासासाठी खर्च करायचे ठरले. १० व ११ कोटी असे ३१कोटींचे दोन अध्यादेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. १० कोटी रुपयांच्या निधीसोबत प्रस्तावित कामांची यादी आहे. त्यातील काही कामे झाली असण्याची किंवा त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाले असण्याची शक्यता आहे.

ती वगळून तसेच नगरपालिका फंडात या कामांच्या वर्क ऑर्डर तयार आहेत ती बाजूला ठेवून त्याच्याऐवजी नवीन कामे सुचवावीत व ती कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सर्व कामे आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. शेवटी बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचा अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()