Sangli News: ‘आलमट्टी’बाबत माहिती कर्नाटकने दडवली

न्यायालयीन पुराव्यांसाठी रुरकी आयआयटी समितीचा अहवाल महत्त्वपूर्ण
 Sangli Almatti Dam News
Sangli Almatti Dam Newssakal
Updated on

Sangli News : ‘कर्नाटकने आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरबाबत आमच्या समितीला दिलेली माहिती वस्तुनिष्ठ नव्हती. विश्‍वसनीय सूत्रांकडून आम्हाला नवी तथ्ये आणि माहिती समोर आल्यानेच आता नव्याने रुरकीच्या आयआयटी तज्ज्ञांमार्फत जलशास्त्रीय अभ्यासाची शिफारस केली आहे,’ असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिले.

सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील महापुराशी आलमट्टी धरणांच्या बॅकवॉटरचा संबंध नाही, असा निष्कर्ष कृष्णा खोऱ्यातील महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या नंदकमार वडनेरे समितीनेच मांडला होता. आता या समितीचे प्रमुख श्री. वडनेरे यांनी आपली नवी भूमिका मांडली असून हा नवा अहवाल महाराष्ट्राला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

याबाबत वडनेरे म्हणाले,‘‘सन २००५ च्या महापुरापासून आलमट्टी धरणाचा मुद्दा चर्चेत आहे. आमच्या समितीने २०१९ मध्ये अहवाल शासनाला सादर पडणारा जास्त पाऊस, नदी पात्रातील अतिक्रमणे, आदी विविध कारणे नमूद केली होती.

त्यावेळी आलमट्टी धरणाबाबत मांडलेली भूमिका ही कर्नाटक शासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे होती. त्या माहितीच्या आधारे आम्ही आलमट्टी धरणाचा परिणाम आणि महापुराबाबत निष्कर्ष व्यक्त केला होता.

तथापि कर्नाटकने समितीला दिलेली माहिती आणि वस्तुस्थिती वेगळी असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

अलमट्टी धरणाच्या वरील बाजूस म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूस एकूण चार बंधारे कर्नाटकने बांधले आहेत आणि त्यांची उंची वाढवताना त्यांनी महाराष्ट्र शासनाला योग्य माहिती दिलेली नाही. परस्पर त्यांनी उंची वाढवली आहे.

आम्हाला अनेक विश्‍वसनीय स्त्रोतांकडून ही माहिती मिळाल्याने आम्ही गेल्या पावसाळ्याआधी राज्य शासनाला याबाबत अवगत केले होते. तत्कालीन, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याही ही बाब आम्ही पत्राद्वारे निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री महोदयांनी विधीमंडळातील चर्चेत तेव्हा त्याचा उल्लेख केला होता.

आता त्या पत्राआधारे शासनाने रुरकी आयआयटीमधील तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय केला आहे. हा अभ्यास त्रयस्थ तज्ज्ञांमार्फत होईल ज्याचा आपल्याला लवाद तसेच न्यायालयीन बाबीत उपयोग होईल.’’

‘रुरकी’च का?

देशात जलशास्त्रीय अभ्यासाबाबत रुरकी आयआयटीमध्ये सर्वात अद्ययावत अशी यंत्रणा असून, त्यात तज्ज्ञ आहेत. त्यामुळेच त्यांची शिफारस वडणेरे समितीने केली आहे. हा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ प्रत्यक्ष फिल्डवर पाहणी करतील.

कदाचित येणाऱ्या पावसाळ्यात तसेच त्यानंतरही हा अभ्यास सुरू राहू शकतो. महाराष्ट्र हद्दीतील राजापूर बंधाऱ्यापासून आलमट्टी धरणापर्यंतच्या पात्रातील अडथळे, बंधारे यांचा अभ्यास व त्याची फुग नेमकी किती येते? हे अभ्यासांती सिध्द केले तरच आलमट्टीच्या वाढीव उंचीला महाराष्ट्र शासनाला आक्षेप घेता येणार आहे.

अलमट्टी धरणाची फूग हे सांगली-कोल्हापूरमधील महापुरास निमंत्रण देते हे आम्ही सखोल अभ्यासांती आधीच मांडले आहे. राज्य शासनालाही तो अहवाल दिला आहे. उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारेही आम्ही हा अभ्यास केला आहे. आता अद्ययावत यंत्रणेच्य आधारे अभ्यास होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. आमचा अहवालही मांडण्याची संधी द्यावी.

- विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार सदस्य, कृष्ण महापूर नियंत्रण समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.