सांगली : बेकायदेशीर पुतळा प्रकरणी ४० जणांवर गुन्हा

यू. टी. जाधव, अरुण बालटे यांचा प्रमुख समावेश
Crime
Crimesakal
Updated on

आटपाडी : येथील पंढरपूर ते कऱ्हाड राज्यमार्गावर आबानगर चौकात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा बेकायदेशीर पुतळा बसविल्याप्रकरणी आणि पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे काम केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष यू. टी. जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे आणि प्रमुख ११ जणांसह अनोळखी २५ ते ३० लोकांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी चार मोटरसायकली आणि एक चारचाकी गाडी ताब्यात घेतली असून, अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

मागील ११ आणि १२ मार्चला आटपाडीतील तरुणांनी एकत्र येऊन पंढरपूर ते कऱ्हाड राजमार्गावर आबानगर चौकात प्रशासकीय मंजुरी न घेता बेकायदेशीरपणे महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा प्रतिमासदृश पुतळा उभारला होता. हा पुतळा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी चबुतऱ्याचेही बांधकाम केले. महसूल आणि पोलिस प्रशासनाने तरुणांनापुतळा हटविण्याची विनंती केली होती. त्यावरून वातावरण तापले होते. प्रशासनाने सांगूनही पुतळा हटविला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सतीश बुरले यांनी प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष यू. टी. जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती भागवत माळी, रावसाहेब सागर, गणेश जाधव, पिनू माळी, बाबासो माळी, विजय बालटे, प्रशांत माळी, मनोज माळी, अमित फडतरे, सुधाकर माळी, संग्राम माळी यांच्यासह अनोळखी २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी चार मोटारसायकली आणि एक चारचाकी गाडीही ताब्यात घेतली आहे. गुन्हे दाखल झालेल्यांना अद्याप अटक केलेली नाही.

शहरात तणाव आणि निषेध

पुतळा उभारण्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शहरात अधिकच तणावाचे वातावरण बनले आहे. शहरातील माळी समाजातील सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील नेतेमंडळींनी तातडीने बैठक घेऊन गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणाचा निषेध केला.

पुतळ्यासाठी लढा उभारणार; तरुणांचा निर्धार

आटपाडी महात्मा फुले यांचा पुतळा बसविलेल्या तरुणांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेल्या पोलिस आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तसेच, पुतळा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी लढा उभा करण्याचा निर्णय माळी समाजातील तरुणांनी बैठकीत घेतला. येथील आबानगर चौकात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचे प्रकरण चिघळत चालले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ४० जणांवर गुन्हा दाखल करून पुतळा हटविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यामुळे संत सावता माळी सभागृहात सामाजातील तरुणांची बैठक घेण्यात आली.

याला मोठ्या संख्येने तरुण, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शासकीय सदस्य उत्तम बालटे, प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष यू. टी. जाधव, माजी उपसभापती भागवत माळी, ‘राष्ट्रवादी’चे सादिक खाटिक, ‘आरपीआय’चे राजेंद्र खरात, रणजित ऐवळे, रावसाहेब सागर, मापटेमळयाचे सरपंच रघुनाथ माळी, राजेश सातारकर, बाबासाहेब माळी, मधुकर माळी उपस्थित होते.

बैठकीत महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याची स्थापना करून अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल पुतळा उभारणाऱ्या तरुणांचे एकमताने अभिनंदन करण्यात आले. तसेच, पुतळा हटविण्यासाठी प्रशासनाकडून दबाव येत आहे. प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता तरुणांनी संघटित होऊन पुतळा हटविण्यास विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वेळप्रसंगी धरणे आंदोलन, मोर्चे आणि बंद पाळून प्रशासनाचा निषेध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.