सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत बारा वर्षांनी सत्तांतर झाले

जागृत सभासदांनी फिरवली भाकरी
 District Primary Teachers Bank
District Primary Teachers Banksakal
Updated on

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत बारा वर्षांनी सत्तांतर झाले. यंदा सभासदांनी सत्तेची भाकरी फिरवत पुरोगामी सेवा मंडळाच्या हाती सत्ता दिली. शिक्षक समितीचे प्रयत्न मात्र अपुरे पडले. आता वचननाम्याची पूर्तता करण्याचे आव्हान पुरोगामी सेवा मंडळासमोर आहे.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक चुरशीने झाली. गेली बारा वर्षे सत्तेत असणाऱ्या शिक्षक समितीला यंदा हॅट्‌ट्रिक साधता येणार का, याची उत्सुकता होती. त्यांच्यासमोर शिक्षक संघाच्या थोरात गटाच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या विविध १२ संघटनांचे आव्हान होते. शिक्षक बँकेचे नेते म्हणून दबदबा निर्माण केलेले शिवाजीराव पाटील ऊर्फ शि. द. पाटील यांच्या शिक्षक संघात फूट पडून त्याचे तीन तुकडे झालेत.

त्यापैकी सर्वात मोठा गट हा संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे, तर पुत्र माधवराव व नातू धैर्यशील यांचे गट निर्माण झाले आहेत. तरीही हे सगळे गट शिक्षक समितीच्या विरोधात उभे टाकतील, असा अंदाज होता. माधवराव पाटील यांनी शि. द. पाटील यांच्या नावाने पॅनेल करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे पॅनेल पूर्ण होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी विश्वनाथ मिरजकर यांच्या शिक्षक समितीला पाठिंबा दिला. वास्तवात मिरजकर आणि शि. द. पाटील हे कट्टर विरोधक होते.

मात्र या निवडणुकीत मिरजकर अण्णांनी शि. द. पाटील यांचे पुत्र माधवराव पाटील यांना सोबत घेतले. शि. द. अण्णा हे शिक्षकांचे मोठे नेते होते. त्यांनी बँक चांगल्या पद्धतीने चालवली होती, अशा शब्दांत कौतुकही करून त्यांच्या समर्थकांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही, असे आता निकालावरून दिसत आहे.

सत्तेच्या शेवटच्या टप्प्यात एका प्रकारच्या कर्जाचे व्याजदर एकअंकी केले, सोळा प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर एक टक्क्यापर्यंत कमी केले. गेल्या सात वर्षांत सहा वेळा व्याजदर कमी केले. शिवाय भविष्यातही सभासदांसाठी विविध योजना राबवण्याच्या घोषणा केल्या. किसन पाटील, सयाजी पाटील, शशिकांत भागवत, उत्तम जाधव आदी समितीच्या नेत्यांनी सभासदांना समोर बारा वर्षांतील लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभासदांवर त्या परिणाम करूशकल्या नाहीत.

याच्या उलट दीर्घकाळ सत्तेपासून दूर राहूनही शिक्षक संघाच्या थोरात गटाने निवडणुकीत आव्हान निर्माण करण्यात यश मिळवले. उर्दू शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, सोलापूर आदर्श शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना अशा बारा संघटना एकत्र करून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. त्यासाठी विनायक शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांना धैर्यशील पाटील, अमोल शिंदे, अविनाश गुरव, शशिकांत माणगावे आदींनी साथ दिली.

स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या नावाने हे सर्व एकत्र आले. प्रचारात त्यांनी शिक्षक बँकेचा लेखापरीक्षण अहवाल घेऊनच सत्ताधाऱ्यांच्या त्रुटी सभासदांसमोर मांडल्या. नोकर भरती, संगणक घोटाळा, बोनस पगार, स्टेशनरी खरेदी यावर उधळपट्टी झाल्याचे पटवून देण्यात ते यशस्वी झाले. त्याचा परिणाम दिसून आला.

नवे भिडू काय करणार, याकडे लक्ष...

शिक्षक बँकेचा इतिहास पाहता दर पाच वर्षांनी सत्तांतर होण्याची परंपरा आहे. परंतु शिक्षक समितीने गेले बारा वर्षे आपल्याकडे सत्ता राखण्यात यश मिळवले होते. आता त्यांचे लक्ष्य हॅट्‌ट्रिकचे होते. मात्र सभासदांनीच पुन्हा संस्थेची भाकरी फिरवून स्वाभिमानी शिक्षक मंडळाकडे बँकेच्या चाव्या दिल्या आहेत. आता पहिल्या टप्प्यात जे आरोप त्यांनी पुरोगामी सेवा मंडळावर केले होते, त्या चुका सुधारण्याचे काम त्यांना करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.