सांगली : वीज बिल फसवणुकीचा नवा फंडा

बनावट संदेश, कॉल, ॲप्सपासून सावधान
वीज बिल
वीज बिल टिम ई सकाळ
Updated on

सांगली : ‘सावधान….! तुमची वीज जोडणी तोडली जाऊ शकते,’ असे सांगणारा बनावट संदेश आला, कॉल आला किंवा ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले तर तुमच्या खात्यातील रक्कम लांबवण्याचा झटका बसू शकतो. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असून सांगलीत नुकतेच एका व्यापाऱ्याच्या खात्यातील एक लाख ८० हजार रुपये भामट्यांनी लांबवले. फसवणुकीच्या या नव्या फंड्यापासून सावध राहणे हाच यावर उपाय आहे.

ऑनलाइन फसवणुकीचे अनेक फंडे गेल्या दहा ते पंधरा वर्षांत पुढे येत आहेत. त्यामध्ये नव्या प्रकरणाची भर पडत आहे. फसवणूक करणारे भामटे वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षित माणसांना देखील फसवून जात आहेत. वीज जोडणी तोडण्याचा संदेश मोबाईलवर, व्हॉट्सॲपवर पाठवत आहेत. वीज बिल अपडेट झाले नसल्याचे संदेशात सांगितले जाते. त्यामुळे कनेक्शन तोडले जाऊ शकते, अशी भीती घातली जाते. हा प्रकार टाळण्यासाठी मोबाईल क्रमांक देऊन त्यावर कॉल करण्यास सांगितले जाते. संबंधित क्रमांकावर कॉल केल्यानंतर मोबाईलवर ॲप डाऊनलोड करण्यास सांगून किरकोळ रक्कम भरण्यास सांगितले जाते. हे ॲप डाऊनलोड करताच तुमचा मोबाइल हॅक करून बँक पासवर्ड शोधून तत्काळ खात्यावरील रक्कम काढून घेतली जाते. अशा प्रकारच्या ॲपमुळे मोबाइलवरील सर्व व्यवहार समोरच्या व्यक्तीला पाहता येतात.

फसवणुकीचा हा नवा फंडा राज्यात अनेक ठिकाणी वापरून लाखो रुपये बँक खात्यावरून काढून घेतल्याचे प्रकार घडले आहेत. अशिक्षित नव्हे, तर सुशिक्षित व्यक्तीही याला बळी पडत आहेत. त्यामुळे वीज जोडणी तोडण्याचे वैयक्तिक मोबाइलवरून संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्षित करावे, अन्यथा खात्यातील रक्कम गायब होण्याचा झटका बसू शकतो.

‘महावितरण’चे आवाहन

वीज बिल भरण्यासंदर्भात बनावट संदेश, व्हॉट्सॲप संदेश, कॉल आल्यास प्रतिसाद देऊ नका. ‘महावितरण’कडून वीज ग्राहकांना नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश पाठवले जातात. ते VM-MSEDCL /VK-MSEDCL /AM-MSEDCL /JM-MSEDCL या नावाने असतात. वैयक्तिक संपर्क साधण्यास कळविले जात नाही. वीज बिल भरण्यासाठी ‘लिंक’ पाठविल्यास ‘क्लिक’ करणे टाळा. ऑनलाइन पेमेंटवेळी मोबाइल किंवा ‘डेस्कटॉप स्क्रीन’ किंवा ‘ओटीपी’ शेअर करू नका. शंका व तक्रारीसाठी २४ तास सुरू असलेल्या १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा जवळच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे ‘महावितरण’ने आवाहन केले आहे.

हे लक्षात असू द्या...

महावितरण कंपनी थकबाकीसाठी वैयक्तिक संदेश पाठवत नाही. ‘महावितरण’चे संदेश अधिकृत ‘एमएसईडीसीएल’ या किंवा इतर अधिकृत नावाने येतात. अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या क्रमांकावर कॉल करू नका. माहीत नसलेल्या लिंक्स किंवा ॲप डाऊनलोड करायला नको. बनावट संदेशाची खात्री करण्यासाठी ‘महावितरण’शी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.