Sangli News: ‘सत्तेच्या व सुडाच्या प्रवासात पहिले निष्ठावंत संपवले जातात’, अशी फेसबुक पोस्ट करत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.
वाळवा ग्रामपंचायतीत ऐतिहासिक सत्ता मिळवल्यानंतर दिलीपतात्या चर्चेत आले होते. आता राजारामबापू साखर कारखान्याची निवडणूक सुरु असताना त्यांनी केलेल्या या पोस्टचा नेमका रोख कुणाकडे आहे, याची चर्चा सुरु झाली आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अत्यंत जवळचे युवा नेतृत्व म्हणून दिलीप पाटील यांची कारकीर्द सुरु झाली होती. बापूंच्या निधनानंतर जयंत पाटील सक्रिय राजकारणात आले, त्या प्रवासात दिलीपतात्या सोबत होते.
त्यांची बहुतांश कारकीर्द इस्लामपूर परिसरातच झाली, मात्र २०१५ ला झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयानंतर त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाली. ‘मला जिल्ह्याच्या ठिकाणी यायला तब्बल ४० वर्षे लागली’, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती.
एक वर्षासाठी अध्यक्ष झालेले दिलीपतात्या पुढे सहा वर्षे अध्यक्षपदावर कायम राहिले. त्यांच्याविरोधात अनेक वादळे आली, मात्र जयंत पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला.
जिल्हा बँकेत सक्रिय असतानाच दिलीपतात्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले होते. सांगली लोकसभा मतदारसंघ आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेल्यानंतर दिलीपतात्यांचे नाव चर्चेत आले होते.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यावर विचारही केला होता, मात्र त्यांचे नाव मागे पडले. जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाची कारकीर्द संपला, पुन्हा ते संचालक झाले. मात्र, जिल्हा आणि तालुक्याच्या राजकारणात त्यांचे स्थान थोडे अडगळीत पडल्याची त्यांच्या समर्थकांची भावना राहिली आहे.
त्यांनी मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्राकडे अधिक लक्ष देत राजकारणातून थोडी विश्रांती घेतली होती. वाळवा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा जोमाने सक्रिय झाले.
नेमका कोण निष्ठावंत संपवला जातोय आणि संपवणार कोण आहे, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
दिलीपतात्यांचा रोख ‘घरच्या राजकारणावर’ आहे की अन्य पक्षातील घडामोडींत ते डोकावत आहेत, याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीची त्याला किनार आहे का, याबाबतची लोक चर्चा करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.