Lumpy Skin Disease : जनावरांचा बाजार ‘लम्पी’ने बेजार

कोट्यवधींची उलाढाल ठप्प मिरज मार्केट समितीसह व्यापारी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान गेल्या तीन महिन्यांत ७ कोटींचा फटका
Lumpy skin Disease
Lumpy skin Diseasesakal
Updated on

मिरज : संपूर्ण राज्यातील दुभत्या जनावरांमध्ये फैलावत चाललेल्या ‘लम्पी’ साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा परिणाम मिरज येथील जनावरांच्या बाजारावर झाला आहे. प्रत्येक बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात अंदाजे ६० लाखांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. गेले तीन महिने बैल, गाय, म्हैस, रेडा, शेळ्या, मेंढ्या अशा सर्व जनावरांचे बाजार होऊ शकले नाहीत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत ७ कोटींचा फटका बसला आहे.

सांगली जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा फैलाव जनावरांमध्ये वेगाने झाला आहे. त्याचा परिणाम जनावरांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. खिलार, दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी मिरजेचा बाजार प्रसिद्ध आहे. बाजारात सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कर्नाटकातील जनावरे खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. जनावरांची खरेदी करणारे ग्राहकही मोठ्या संख्येने या बाजारास उपस्थिती लावतात. त्यामुळे दर बुधवारी किमान ६० लाखांची उलाढाल होते. शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारातही मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. लम्पी साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जनावरांचे बाजार, वाहतुकीवरही कडक निर्बंध आणले आहेत. मिरजेच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठीची येणारी जनावरेही चांगल्या दर्जाची असल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांचा इकडे ओढा आहे.

गोठ्यांची स्वच्छता गरजेची

लम्पी त्वचारोगाने पशुपालकांना चिंतेत टाकले आहे. हा रोग संसर्गजन्य असून बाधित एखादी गाय किंवा बैलास डास, गोचीड चावले किंवा मोठ्या माशा चावल्या आणि त्याच दुसऱ्या निरोगी जनावरांना चावल्या तर हा आजार पसरतो. त्यामुळे गोठेही स्वच्छ ठेवण्याच्या सूचना पशुधन अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत.

हातावर पोट असणारे अडचणीत

बाजारावर सजावटीचे साहित्य; तसेच कासरा-कंडे विक्रेते, जनावरांच्या पायात पत्र्या ठोकणारे, चहा, वडापाव विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, जनावरांची वाहतूक करणारे वाहनचालक; तसेच अन्य व्यवसाय चालतात. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश जास्त असतो. मात्र, लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळे या व्यावसायिकांच्या पोटावरही पाय आला आहे. जनावरांचे बाजारच पुढील काही दिवस बंद राहणार असल्याने त्यांचा व्यवसाय होणार नाहीत. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

बैल, बोकड खरेदीवर परिणाम

‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर शासनाने जनावरांच्या बाजारावर अमर्याद काळासाठी बंदी घातली आहे. याचा परिणाम बैल, बोकड खरेदीवर झाला आहे. बैलगाडी शर्यतींना परवानगीनंतर बैलांची खरेदी-विक्री होत होती. मात्र लम्पीमुळे तीही थंडावली आहे. तसेच बोकडांच्या खरेदी-विक्रीही परिणाम झाल्याने मटण मार्केटवरही परिणाम झाला आहे.

‘लम्पी’बाधित आकडा सात हजारांवर

गेल्या काही दिवसांत लम्पी त्वचारोगाचा फैलाव जनावरांमध्ये वेगाने होत आहे. दररोज दोनशेहून अधिक जनावरांना बाधा होत आहे. आजवरची एकूण बाधित जनावरे ७२२५ आहेत. सद्यःस्थितीत ३८५० जनावरांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने तीन लाख ३७ हजार ४१ जनावरांचे लसीकरण केले आहे.

दृष्टिक्षेपात बाजार...

मिरज येथील जनावरांचा बाजार तीन महिन्यांपासून बंद

मिरजेत दर बुधवारी भरतो जनावरांचा बाजार

आठवडा बाजारातील किमान ६० लाखांची उलाढाल ठप्प

खिलार, दुभत्या जनावरांची होते खरेदी-विक्री

कर्नाटक, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथून जनावरे विक्रीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.