इस्लामपूर - शेतकरी, शेतमजुरांच्या आंदोलनाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जाणाऱ्या १९७२ सालच्या मोर्चात चार तरुणांचा बळी जाण्याच्या घटनेला आज ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. ही घटना आजही वाळव्याच्या इतिहासातील भळभळती जखम आहे. प्रा. डॉ. एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सुरेशकुमार पाटील, राजेंद्र पाटील, रंगा गायकवाड, दिलीप निलाखे हे चार तरुण शहीद झाले होते.
१९ ऑक्टोबर १९७२ ला इस्लामपूर येथील तहसील कचेरीवर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुक्यातील दुष्काळग्रस्त, शेतकरी, शेतमजूर, बलुतेदार व विद्यार्थी यांचा मोर्चा निघाला होता. दिवंगत नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. दुष्काळाने भयानक व उग्र स्वरूप धारण केल्यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या हालअपेष्टा वाढत होत्या.
तालुक्यातील खरीपांची पिके करपून गेली होती. विहिरी आटल्या होत्या. ज्या थोड्या विहिरींना पाणी होते, त्याही फार काळ तग धरतील अशी परिस्थिती नव्हती. या पार्श्वभूमीवर एन. डी. पाटील यांनी हा मोर्चा आयोजित केला. वाळवा तालुका दुष्काळी भाग म्हणून जाहीर करा, मागेल त्याला काम मिळालेच पाहिजे, दुष्काळग्रस्त मजुरांना किमान रोज चार रुपये मजुरी मिळाली पाहिजे, दुष्काळी कामावरील मजुरांना सरकारी हत्यारे मिळावीत, समान कामाला समान दाम मिळाला पाहिजे, पगार आठवड्याला झाला पाहिजे, शेतसारा व कर्जवसुली तर खूप झाली पाहिजे, खुजगाव धरण झाले पाहिजे,
इस्लामपूरचा खडीतलाव, हत्तीतलाव, इतर लहान-मोठे तलाव व नागठाणे बंधारा यासारखी कामे ताबडतोब सुरू करावीत, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती खाली आणाव्यात, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दरमहा पन्नास रुपये भोजनभत्ता मिळावा, परीक्षेची फी सरकारने भरावी, दरमहा १२ किलो धान्य मिळावे अशा या मोर्चाच्या मागण्या होत्या.
मोर्चा तहसील कचरीकडे जात असताना काही अंतरावर त्यांना अडवण्यात आले. पोलीस पथकाची एक साखळी काही अंतरावर उभी होती. दुपारचे दोन वाजले होते. त्याठिकाणी एन. डी. पाटील यांचे भाषण झाले. अधिकाऱ्यांनी वाटाघाटीचा प्रयत्न केला; परंतु त्यातही दुर्लक्षाचीच भूमिका होती. बराच वेळ मोर्चेकऱ्यांना थांबवण्यात आले. साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता लाठीहल्ला चढवला. स्वतः एन. डी. पाटील यांच्यासह निरपराध, निष्पाप कार्यकर्त्यांवरही लाठीहल्ला झाला. सरकारी अधिकाऱ्यांचे हे थैमान पूर्वनियोजित कट असल्याचे नंतर उघडकीला आले.
यात अवघे सोळा-सतरा वर्षे वय असलेले दिलीप निलाखे, सुरेशकुमार पाटील, राजेंद्र पाटील व रंगा गायकवाड हे बळी पडले. या चौघांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील तहसील कार्यालयाच्या चौकात स्मृतीस्तंभ उभारला जावा, अशी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे; मात्र इस्लामपूर प्रशासनानेही गेले वर्षभर याकडे डोळेझाक केली आहे.
आज स्मृतिदिन!
वाळवा तालुका शेतकरी कामगार पक्ष, प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठान तसेच कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर यांनी एकत्रितरित्या गुरुवार (ता. १९) दुपारी एक वाजता स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आज ५१ वर्षांनी यातल्या हुतात्म्यांचे स्मरण राहिले नाही. आताच्या पिढीत जाणीव नाही. हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना हा इतिहास पुसायचा आहे, हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. किमान स्मृतिदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात उपक्रम झाल्यास हा त्याग जिवंत राहील आणि पुढच्या पिढीला त्यांचे महत्व वाटेल."
नितीन बारवडे, सामाजिक कार्यकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.