अंधांच्या जीवनात प्रकाश पसरवण्याची संधी नेत्रदानाच्या माध्यमातून मिळते. त्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध असूनही अंधांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. जिल्ह्यात साधारणत: ७-८ नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. फक्त नेत्रदानाचे अर्ज भरले की, जबाबदारी संपली असे न मानता, समाजात जास्तीत जास्त जागृतीची आवश्यकता आहे. अंधांचे जीवन प्रकाशमय करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे.
संगणक, मोबाईल क्रांतीमुळे दिवसातील निम्म्याहून अधिक वेळ टीव्ही, संगणक अथवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर असतो. डोळ्यांवरील ताण वाढताना दिसत आहे. त्यांची निगा राखण्यास थोडा वेळ हा प्रत्येकाने द्यावा, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी वारंवार केले. डोळ्यांची काळजी घेण्याबद्दल समाजात जागृतीही होऊ लागली. डोळा म्हणजे मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव. त्याची निगा राखणे प्रत्येकाची जबाबदारी असली तरी ज्यांनी डोळ्याअभावी जन्मल्यापासून जग पाहिले नाही, त्यांच्या जीवनात प्रकाश उजळवण्याची आणि सुंदर जग दाखवण्याची संधी नेत्रदानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ शकतो. मृत्यूनंतर नेत्रदानाच्या माध्यमातून अमर राहण्याची संधी मिळते. दरवर्षी १० जूनला डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टिदानदिन साजरा होतो. यंदा १० ते १६ जून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, वसंतदादा पाटील जिल्हा रुग्णालय आणि मिरजेतील शासकीय महाविद्यालयात नेत्रतपासणी सप्ताह होत आहे. त्यानिमित्त नेत्रदान चळवळ समाजात रुजवणे, मोतीबिंदू, काचबिंदू शिबिरे घेण्यात येणार आहेत.
त्याचा जास्ती जास्त लाभ घेऊन नेत्रदानाचा अर्ज भरण्यासोबत आकस्मित मृतांच्या नातेवाईकांत जनजागृती करून त्यांनाही नेत्रदानाविषयी जागृत केल्यास नक्कीच अंधांचे जग प्रकाशमय होण्यास मदत होणार आहे.
‘नेत्रदानाचे महत्त्व समाजात पटवून देणे हा डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टिदान दिनाचा मुख्य उद्देश आहे. तरुण, तरुणींनी नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे.’’
- डॉ. गायत्री वडगावे, जिल्हा व्यवस्थापक, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
‘‘नेत्रदानाची संकल्पना चळवळीत रूपांतरित करण्यासाठी युवकांनी सामाजिक बांधलकी म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. शिबिरांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
- जगन्नाथ बाबर, नोडल ऑफिसर, जिल्हा अंधत्व निवारण सोसायटी.
जिल्ह्यात २०१६-१७ दरम्यान ४१७ नेत्रबुबळांचे संकलन झाले. २०७ बुबळांचे प्रत्यारोपण होऊन अंधांना दृष्टी मिळाली. अजूनही १५० रुग्ण दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.
युवकांनी नेत्रदानासह अवयवदान जागृतीचे कार्य हाती घ्यावे. नेत्रदान चळवळ तळागाळापर्यंत पोहोचली आहे. शासकीय रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतात. त्याच पद्धतीने भविष्यात बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही होतील, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक, वसंतदादा शासकीय रुग्णालय, सांगली
नेत्रदानाविषयी फक्त अर्ज न भरता मृतांच्या नातेवाईकांत जनजागृतीची गरज आहे. मृत्यूनंतर सहा तासांत कोणालाही नेत्रदान करता येते. त्याची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. अनुराधा नेत्र रुग्णालयाच्या वतीने नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यात येते. तरुणांनी पुढाकार घेऊन लोकांना जागृत करावे. सर्वतोपरी सहकार्य करू.
- डॉ. शरण्णाप यशवंत रेवतगाव, दृष्टिदान आय बॅंक, अनुराधा नेत्र रुग्णालय, विश्रामबाग, सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.