माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी जयंत पाटील यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणला आहे.
इस्लामपूर : ‘‘प्रशासनाला हाताशी धरून वरचढ होणाऱ्या जिल्ह्यातील व तालुक्यातील राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कुटिल राजकारणास सामान्य जनतेच्या पाठबळावर धडा शिकवू,’’ असा गर्भित इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (BJP leader Nishikant Patil) यांनी पत्रकार बैठकीत दिला.
पाटील म्हणाले, ‘‘शांत व सुसंस्कृत असल्याचा मुखवटा परिधान केलेल्या जयंत पाटील यांचा खरा चेहरा माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह (Paramveer Singh) यांनी जनतेसमोर आणला आहे. कुटिल व सूडाचे राजकारण करून जिल्ह्यातील विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न जयंत पाटील कायम करत आले आहेत. तो त्यांचा इतिहास आहे. जयंत पाटील यांच्या दबावाखाली प्रकाश हॉस्पिटल व डॉक्टरांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात याचीका दाखल करणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्याला क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, जे. डी. बापू लाड, एन. डी. पाटील यांच्यासारख्या अनेक सुसंस्कृत व विकासाचे राजकारण करणार नेत्यांचा वारसा आहे. या नेत्यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही. वैचारिक मतभेद असले तरी ते निवडणुका झाल्या की संपून जायचे. विरोधकांच्या चांगल्या गोष्टींना वसंतदादांसारखे नेते पाठिंबाही द्यायचे. अशा सुसंस्कृत नेत्यांच्या जिल्ह्यात आमदार जयंत पाटील हे खुनशी वृत्तीचे राजकारण करीत आहेत. जिल्ह्यात आपल्याला विरोधकच राहू नये, ही त्यांची भावना आहे. जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्यांनी त्रास दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.’’
माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी जयंत पाटील यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणला आहे. विरोधकांनी कष्टातून उभा केलेल्या संस्था, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारा नेता वाळवा तालुक्यात जन्माला आला आहे, हे तालुक्याचे दुर्दैव आहे. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीने उभा केलेले आरोग्य संकुल व संस्था अडचणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोरोना काळात मंत्रिपदाचा गैरवापर करून माझ्या कुटुंबासह रुग्णालयातील डॉक्टर व संचालकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास त्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता. हे आता उघड झाले आहे.
त्यामुळे यापुढील काळात सामान्य जनतेने पाठबळ दिल्यास जयंत पाटील यांचे द्वेषाचे राजकारण मोडून काढेन. ही खलनायक, दृष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी तालुक्यातील जनतेने पाठिंबा द्यावा. जयंत पाटील यांच्या दबावामुळे आमच्या संस्थेवर व कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, धैर्यशील मोरे, अशोक खोत चंद्रकांत पाटील, अजित पाटील, राज थोरात, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.