कवठेमहांकाळ : राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्याच्या राजकारणात खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांची एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे, तर राष्ट्रवादीच्या एक्स्प्रेसला ब्रेक लागताना दिसत आहे.
एकीकडे, खासदार पाटील यांच्या गटात शहरातील राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यामुळे खासदार पाटील गटात इनकमिंग सुरू झाले चित्र आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झाले आहे. यातच सगरे गटालाही धक्का बसला आहे.
एकंदरीत, तालुक्याच्या राजकारणात धक्कातंत्राचे राजकारण सुरू झाले आहे. गत एक-दीड वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार सुमन पाटील, युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विरुद्ध खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, ‘महांकाली’च्या नेत्या अनिता सगरे, माजी सभापती गजानन कोठावळे यांच्यात सामना झाला होता.
यात राष्ट्रवादीने नगरपंचायतीच्या निवडणुकीत सतरापैकी दहा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. मात्र राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या राजीनाम्यानंतर अल्पावधीतच नगराध्यक्ष निवडीत समसमान मते पडली अन् खासदार पाटील गटाच्या सिंधूताई गावडे यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक खासदार संजय पाटील यांच्या गळाला लागले होते, हे सर्वश्रुत आहे.
खासदार पाटील गटाने शहरातील राजकारणात लक्ष घालत शहरासह तालुक्यात आपला गट प्रबळ केला आहे. काल तासगाव येथे झालेल्या सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने खासदार गटाची एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे. एकीकडे, खासदार गटात इन्कमिंग, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला गळती सुरू आहे.
माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेतली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत घोरपडे गट कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. आता या सर्व राजकीय घडामोडीत वीस ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन कोणता प्रयोग होणार, हे पाहणे आवश्यक आहे.
तासगाव येथे कवठेमहांकाळच्या नगरसेविका मीराबाई ईश्वर वनखडे, नगरसेवक संजय माने, ईश्वर वनखडे, लोणारी समाजाचे नेते रमेश खोत, बाळू खोत, विठूरायावाडीचे नेते मोहन खोत, धनाजी माळी, सोमनाथ ढोणे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.