Sangli : राजू शेट्टींच्या मतदारसंघात जयंत पाटलांच्या सुपुत्राला उमेदवारी ? वादळात दिवा लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

वेध लोकसभेचे तिरंगी लढतीच्या वादळात दिवा लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
sangli
sangli sakal
Updated on

इस्लामपूर - पश्‍चिम महाराष्ट्रात अतिशय संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ऊस, दूधदर व गेल्यावेळी जातीय समीकरणावर निवडणूक होऊन या ठिकाणी चळवळीत काम करणाऱ्या शेट्टींना मतदारांनी नाकारले. शेट्टींची या मतदारसंघातील ताकद पाहून गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत राष्ट्रवादीने आपला हक्क सोडून एकदा काँग्रेसला व नंतर शेट्टींना हा मतदारसंघ सोडून स्वतःला दूर ठेवले होते.

मात्र, आता खुद्द जयंत पाटलांचे सुपुत्र यांना उमेदवारी मागून राष्ट्रवादी यावेळी तिरंगी लढतीत वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न दिसत आहे. मात्र, अजित पवार यांच्या पार्थ पवारांप्रमाणे राजकारणाचा अत्यल्प अनुभव असणाऱ्या प्रतीक पाटील यांना या निवडणुकीत जयंत पाटील उतरवणार का? हे ही महत्त्वाचे आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शेतकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात यापूर्वी काँग्रेसने, राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले होते; मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या कळकळीचे प्रश्‍न घेऊन राजू शेट्टींनी चळवळ केली.

sangli
Sangli News : 'त्या' चौघांच्या बलिदानाला आज ५१ वर्षे झाली!

उसाचा बेल्ट असणाऱ्या या मतदारसंघातील सर्वच कारखानदारांना घाम फोडत हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला केला. सलग दोन वेळा शेट्टी खासदार झाले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लोकसभेत पोहोचलेल्या शेट्टींना त्यांच्या पारंपरिक विरोधक भुरळ पाडून आपलेसे करण्यात काही अंशी यशस्वी झाले. यातून इस्लामपूर येथील यल्लाम्मा चौकातील सभेत भाजपचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत शेट्टींनी चळवळ उजव्या विचारसरणीकडे झुकवत भाजपशी मैत्री केली. काही महिन्यांतच शेट्टी व भाजपच्या सरकारचे खटके उडाले. सत्तेतून बाहेर असलेल्या राष्ट्रवादीने त्यांना हवा दिली. शेट्टी परत एकदा भाजपचा हात सोडून राष्ट्रवादीकडे झुकले.

sangli
Sangli Crime : डोक्यात गॅस स्टोव्ह घालून तरूणाचा निर्घृण खून

इस्लामपूर येथील राजारामबापू दूध संघात हजेरी लावून जयंत पाटलांशी जुळते घेत दूध संघाचा पाहुणचार स्वीकारला. काही दिवसांतच शेट्टींनी राष्ट्रवादीशी आपले कोणतेही वैर नाही, असे म्हणत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काही कार्यक्रमात व्यासपीठावर जयंत पाटलांच्या मांडी लावून मांडी लावून बसणे पसंत केले. ही गोष्ट हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बहुतांश लोकांना पचली नाही. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शेट्टी यांना मतदारांनी पराभवाची चव चाखायला लावली.

शेट्टींनाही आपले नेमके चुकले काय हे समजले. त्यांनी परत एकदा चळवळीचा मुद्दा पुढे करत सर्वांचा नाद सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरचे आंदोलन सुरू केले आहे. काही महिन्यांतच लोकसभेच्या निवडणुका आहेत. राज्यात सत्तेची समीकरणे विचित्र पध्दतीने बदलली आहेत. इथे स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द भाजप, शिवसेना (शिंदे गट) अशी लढत होईल, हे नक्की आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीचेही अर्थात शरद पवार गटाचे चांगले प्राबल्य आहे. जयंत पाटलांचा असलेला जनसंपर्क ही गोष्ट लक्षात ठेवून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या ठिकाणी तिरंगी लढत घडवून वादळात दिवा लावू शकतात. यासाठी प्रतीक पाटील यांचे नाव पुढे येऊ लागले असावे. जयंत पाटीलसुध्दा प्रतीक पाटलांच्या रूपाने या मतदारसंघात आपले आव्हान उभे करू शकतात.

sangli
Sangli Police : सांगलीत कॉलर धरून, जातिवाचक शिव्या देत पोलिसाला मारहाण; विश्रामबाग पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष...

मात्र आताच राजकीय करिअरची सुरुवात झालेल्या आपल्या मुलाला संवेदनशील असलेल्या या मतदारसंघात जयंत पाटील उतरवणार का? हे ही पाहावे लागेल. कारण जशी घाई अजित पवारांनी पार्थ पवारांच्या बाबतीत केली, तशी घाई जयंत पाटील करतील, अशी शक्यता वाटत नाही, तरीही पवारांचा आग्रह राहिला तर जयंत पाटील यांनासुध्दा पर्याय राहणार नाही. ते आपल्या सुपुत्राला यात उतरवून वादळात दिवा लावतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.