सांगली : येथील रेल्वे स्थानकात नव्या लाइनवरील बहुचर्चित प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाचचे काम अखेर सुरू झाले आहे. हे काम या महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. ते आता साधारण दीड महिना उशिरा म्हणजे नोव्हेंबरअखेर मार्गी लागेल, असे रेल्वे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
या प्लॅटफॉर्ममुळे सांगली रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणे शक्य होईलच, शिवाय नव्या गाड्या सांगलीतून सुरू करणे आणि मिरज जंक्शनवरील ताण कमी करण्यासाठीही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. अर्थात, त्यासाठी रेल्वे विभागाने सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असून मुख्य शहर आहे, याचे भान ठेवणे अपेक्षित असल्याची भावना रेल्वे अभ्यासकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
पुणे ते लोंढा लोहमार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र प्लॅटफॉर्मच नसेल तर त्याचा सांगली स्थानकाला फायदा होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे समिती सदस्यांनी आग्रही भूमिका घेत नवीन लाइनवर प्लॅटफॉर्म, पादचारी उड्डाणपूल, पूर्व दिशेने प्रवेशद्वार अशा मागण्या केल्या.
त्यातून प्लॅटफॉर्मची मागणी मान्य झाली, मात्र काम वेळेत सुरू होत नव्हते. ते अखेर सुरू झाले आहे. पूर्व प्रवेशद्वार दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याआधी स्थानक ते चार-पाच नंबर प्लॅटफॉर्मला जोडणारा पादचारी उड्डाणपूल होईल.
...हा फायदा होणार
मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, राजस्थान येथून कर्नाटक, तमिळनाडू, केरळच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या थांबू शकतील.
मुंबई-कोल्हापूर, मुंबई-बेळगाव, हुबळी-पुणे या तीनही प्रस्तावित ‘वंदे भारत’ गाड्या थांबणे शक्य.
बंगळूर-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ही प्रस्तावित गाडी या प्लॅटफॉर्मवरून जाणार. ती थांबवणे शक्य
तेजस, दुरांतो, शताब्दी, जनशताब्दी या नवीन गाड्यांसाठी हा थांबा शक्य
वारकरी संप्रदायाची मागणी होती, की सांगली ते पंढरपूर, परळी-वैजनाथ गाड्या सुरू करा. तेही सांगलीतून शक्य.
नवीन प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर सांगलीपासून काही गाड्या थेट सुरू करता येतील. त्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनचा वापर शक्य.
मालगाड्यांसाठी दोन प्लॅटफॉर्म झाल्याने प्रवासी गाड्यांचा प्लॅटफॉर्म वापरणे थांबणार. तेथून सांगली ते कोल्हापूर लोकल गाड्या शक्य.
मिरज जंक्शनला फायदा होणार. काही गाड्या सांगलीतून गेल्यास मिरजेतील प्लॅटफॉर्मवरील ताण कमी.
मिरज इंदूर, अमृतसर, पाटणा, लखनौ गाड्या सुरू करणे शक्य.
नव्या लाइनवर प्लॅटफॉर्म झाल्याने सांगलीचा मोठा फायदा होईल आणि मिरजेवरील ताण कमी करून नव्या गाड्या सुरू करता येतील. त्यासमवेतच पूर्वेला प्रवेशद्वार आवश्यक आहे. त्यामुळे कुपवाड, संजयनगर, अभयनगर, औद्योगिक वसाहतींतून थेट रेल्वे स्थानकात येणे शक्य होईल. विश्रामबागचे महत्त्व अधिक वाढेल.
- उमेश शहा, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती
नवीन प्लॅटफॉर्मचा पाया भरला आहे. पुढील काम सुरू आहे. नोव्हेंबरअखेर ते पूर्ण होईल. पूर्वेला रेल्वे फाटकाचे काम पुढील टप्प्यात प्रस्तावित आहे. गत तीन वर्षांत रेल्वेची खूप गतीने विकासकामे सुरू आहेत. पुरेसा निधी आहे. कोणतेही काम थांबणार नाही.
- विवेक कुमार, रेल्वे स्टेशन मास्तर, सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.