आटपाडी : येथील प्रसिद्ध शेळ्या-मेंढ्यांच्या आठवडा बाजारात शेळ्या, मेंढ्या, बकरे व बोकडांची दहा-बारा ते चौदा हजार आवक होते. चार ते सहा हजारांवर खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. दरवेळी विक्रमी दोन ते अडीच लाख, तर वर्षात शंभर ते सव्वाशे कोटींची उलाढाल झाली. पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राज्यातील सर्वांत मोठा शेळ्या, मेंढ्या, बकरे व बोकडांचा बाजार म्हणून ख्याती आटपाडी बाजार समितीची आहे.
संपूर्ण माणदेश अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. अत्यंत कमी पाऊस, हजारो हेक्टर माळरान क्षेत्र, माळावर काटेरी झाडे- झुडपे उगवतात. त्याचाही सुज्ञ शेतकऱ्यांनी शेळी-मेंढीच्या संगोपनासाठी उपयोग करून घेतला आहे. माणदेशात माण, खटाव, सांगोला, मंगळवेढा, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे तालुके येतात.
या भागात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. तो पारंपरिक शेळ्या-मेंढ्या पालनाचा व्यवसाय करतो. पाण्याच्या टंचाईमुळे कोरडवाहू शेतीला जोड म्हणून अन्य शेतकरीही शेतीपूरक म्हणून पशुपालन करतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे सहज दोन-चार शेळ्या व मेंढ्या आढळतात. या आधी शनिवारचा आठवडा बाजार शुक ओढापात्रात भरत असे.
अलीकडे बाजार समितीच्या आवारात हा बाजार सुरू झाला आहे. संपूर्ण आवार शेळ्या-मेंढ्यांनी गच्च भरतो. प्रत्येक बाजारात दहा-बारा ते चौदा हजारापर्यंत आवक होते. त्यात पाच ते सहा हजार शेळ्या, मेंढ्या, बकरे व बोकडाचे व्यवहार होतात. दर आठवड्याला आटपाडीतून शंभरावर पिकअप व दहा ते पंधरा गाड्या भरून जनावरे बाहेर जातात. पिकअप गाडीत पन्नास ते साठ आणि मोठ्या टेम्पोमध्ये शंभरांवर जनावरे बसतात.
साधारण दहा ते बारा किलोच्या बोकडाला सहज दहा हजार रुपये मिळून जातात. दहा, बारा, पंधरा हजारांपासून ते २५, ५० हजारांपर्यंत दर्जेदार बकरे व बोकडांना भाव मिळतो. आठवडा बाजारात सरासरी दोन ते अडीच लाखांवर उलाढाल होते.
बाजार समितीच्या तीन एकर क्षेत्रात बाजार भरतो. संपूर्ण बाजार आवारात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीची यंत्रणा बसवली आहे. शेतकऱ्यांना निवासव्यवस्था केली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहांचीही सोय केली आहे. शेळ्या-मेंढ्याच्या उलाढालीतून बाजार समितीला दर आठवड्याला प्रत्येक नगामागे सरासरी दहा रुपयांप्रमाणे ४०-५० हजार रुपयांवर उत्पन्न मिळते.
आठवडा बाजारात होणारी आवक ः १० ते १२ हजार.
व्यवसाय ः चार ते सहा हजार नग.
शंभर पिकअप गाड्या व पंधरा गाड्या भरून माल बाहेर जातो.
उलाढाल ः दोन ते अडीच कोटी रुपये
माणदेशातील झाडपाला खाल्लेल्या शेळ्या, मेंढ्या, बकरी व बोकडाच्या मटणाला वेगळी चव येते. त्यामुळे राज्यभरातील खवैय्या शौकिनांतून आटपाडीच्या मटणाला पहिली पसंती दिली जाते. राज्यभरातून आटपाडीच्या मटणाला मोठी मागणी आहे. त्याच्या खरेदीसाठी कर्नाटक, कोल्हापूर, कोकण, गोवा, पुणे या भागातून व्यापारी व खाटीक मोठ्या संख्येने बाजारात येतात.
आटपाडीच्या शेळ्या, मेंढ्या, बकरे आणि बोकडाच्या बाजारात दिवसेंदिवस आवक, व्यवहार व उलाढाल वाढत चालली आहे. तीन वर्षांत ३० टक्के वाढ झाली आहे. बाहेरून तालुक्यात आठवड्याला दोन-अडीच कोटी रुपये येतात. बाजार समितीत शेतकऱ्यांना निवास, स्वच्छतागृह, पाणी या सुविधा देतो.
- संतोष पुजारी, सभापती, आटपाडी बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.