सांगली : महाराष्ट्रातील पर्यटनाच्या (Maharashtra Tourism)नकाशावर सांगली (Sangli) यायला हवी. तिला तिथे मानाचे स्थान मिळू शकते, एवढी क्षमता असलेली आपली सांगली खूप चांगली आहे. जिल्ह्यात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. ती जगापुढे नेण्याची गरज आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरवात केली, तर काही काळात सांगली हे चांगले पर्यटन केंद्र होऊ शकते. त्यासाठी अभ्यासपूर्ण बदलांची सुरवात आता करायला हवी.(sangli-Tourism-Mahamap-developed-update-marathi-news)
जगातील निसर्गसंपदा, तिथला इतिहास, जागतिक वारसास्थळे किंवा पर्यटकांना खुणावणारी स्थळे समोर आणली. हे करत असताना आपला सभोवताल मागे सुटतोय की काय, असे सतत वाटत राहते. जगातील पर्यटन केंद्रातील उत्तमोत्तम आपल्या लोकांना दाखविताना आपली संपत्ती दडून राहिली आहे.
सांगली जिल्ह्याचा विचार करताना इथे पर्यटन या एका विषयाला धरून खूप समृद्धी दिसते. इथली माती खूप सुपीक आहे आणि निसर्गानेही त्या मातीत हिरवाई पेरली आहे. कृष्णा नदीकाठापासून ते इथल्या शेतीतील समृद्ध परंपरेपर्यंत सारे काही पर्यटन विकासाला पूरक आहे. सांगलीची खरी समृद्धी आहे, ती कृष्णा नदी. असा एकसलग नदीकिनारा फार कमी शहरांना लाभला आहे. आपण समुद्राकाठी नाही, अशी खंत बाळगण्याचे कारण नाही.
समुद्रकिनारी पर्यटनाला जितक्या संधी असतात, तितक्या नदीकाठी नसल्या तरी विस्तीर्ण प्रवाह, त्याची खोली, सलगता, वारणा नदीशी झालेला संगम या गोष्टी पाहताना येथे पर्यटन विस्ताराला नक्कीच मोठी संधी आहे. लंडनची थेम्स, आपली साबरमती अशी काही नद्यांची उदाहरणे आहेत, जिथे जाणीवपूर्वक पर्यटन विकासाकडे लक्ष पुरवले गेले आहे. थेम्स नदी एकेकाळी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली होती. ती आज जगातील पर्यटकांना आकर्षित करते. कृष्णा नदीतील होड्यांच्या शर्यतीचे फोटो पाहिले, की या शर्यतींना पर्यटनाच्या नकाशावर नक्कीच स्थान आहे. त्या अधिक भव्य करताना त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांचा दर्जा दिल्यास पर्यटक आकर्षित होतील. महाराष्ट्रात हा खेळ तसा दुर्मिळ आहे. सांगलीची त्याअर्थाने ओळख बनू शकेल. कृष्णा-वारणा नदी संगम किंवा आयर्विन पुलाजवळ वॉटर स्पोर्टस्ची संकल्पना प्रभावीपणे राबवता येईल. पश्चिम महाराष्ट्रात ती एक लक्षवेधी असेल.
सांगलीची हळद जगभर प्रसिद्ध आहे. त्याचा पर्यटनासाठी म्हणून काही उपयोग करून घ्यावा, असे ठामपणे वाटते. हळद ही आरोग्यपूर्ण आहे. हळदीपासूनची पेये जगात लोकप्रिय आहेत. जिथे हळद पिकते तेथेच ती पेये मिळाली तर..
ही केवळ काही उदाहरणे झाली, जी भविष्यात करता येण्यासारखी आहेत. इथली द्राक्षे रसाळ आहेत, इथला गूळ प्रसिद्ध आहे. शेती समृद्ध आहे. मुंबई, ठाणे परिसरातील लोक कृषी पर्यटन करण्यासाठी एका दिवसाला अडीच ते पाच हजार रुपये मोजतात. आपल्याकडे खूपच समृद्ध असा शेतीचा वारसा आहे आणि इथले आधुनिक शेतीचे प्रयोग तर लक्ष वेधणारेच आहेत. ते पर्यटनाच्या नकाशावर गेले तर निश्चितपणे लोकांचे पाय इकडे वळायला लागतील.
हे झाले भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने; पण तत्काळ काही उपाययोजना केल्यास आपली पर्यटनस्थळे चर्चेत येऊ शकतील. त्यासाठी पर्यटन स्थळांविषयीची माहिती ठिकठिकाणी, महामार्गांलगत तत्काळ प्रसिद्ध करावी लागेल. त्या पर्यटन स्थळांना दर्शविणारे दिशादर्शक फलक लावावेत. इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन पर्यटनाच्या दृष्टीने आपले मार्केटिंग करावे. पर्यटकांना कशा सुविधा दिल्या जातील, याचे राज्य पातळीवर मार्केटिंग करावे. आकर्षक माहिती पत्रके तयार करून ती वितरित करावीत. आकर्षक लोगो तयार करून घ्यावा. आपल्या पर्यटनस्थळांचे सुंदर फोटो इंटरनेटच्या माध्यमातून सर्वदूर पोचवावेत. तरुण पिढीला त्यात सहभागी करून घ्यायला हरकत नाही. आपल्या जिल्ह्यातील लोकांनीच आधी आपल्या पर्यटन स्थळांना महत्त्व द्यावे. त्यासाठी निर्धारपूर्वक प्रयत्न करावे लागतील, तरच उद्याची सांगली ही पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवू शकेल.
सांगलीची हळद, कृष्णाकाठची वांगी, भंडग, हरिपूरची पेवं, कृष्णा-वारणा संगम, श्री गणरायाचे मंदिर, गुड्डापूरचे मंदिर, चांदोली व्याघ्र पकल्प, झोळंबी पठाण, धरण, सागरेश्वर, दंडोबा, शुकाचार्य, भिवघाड, चौरंगीनाथाचे डोंगर... यादी केली तर मोठी आहे. त्यात पर्यटनसंधीही प्रचंड आहे, मात्र गाडी खोळंबते ती महत्त्वांकाक्षा नाही म्हणून.
सांगली शहराला अत्यंत देखणा कृष्णाकाठ आहे. मात्र त्यात शेरीनाला मिसळून त्याचे वाटोळे केले आहे. कृष्णेत बोटिंग, लेसर शो, बाग, हरिपूर संगमावर भोजन आणि निवास व्यवस्था करणे फार अवघड नव्हते. ते झाले नाही. केरळमधील होड्यांच्या शर्यती जगभराचे लक्ष वेधतात. सांगलीत कृष्णाकाठीही अशा शर्यती होतात. त्या गावातून बाहेर पडून दॆश, जगभर प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. त्यावर काम झाले तर सांगलीचं नाव नक्कीच पर्यटन नकाशावर उठून दिसेल. आमराई आपली खास ओळख. तेथील वनराई जपली जात नाही. झाडे, पक्षी, छोट्या प्राण्यांची माहिती देणारे केंद्र व्हायला हवे होते. सरत्या वर्षात फुलपाखरू उद्यानाचा प्रयोग चांगला झाला. बाकी सुधारणेला मोठा वाव आहे. तीच अवस्था महावीर उद्यानाची आहे. तेथे पर्यटन रमतील, अशा गोष्टी वाढवल्या पाहिजेत. काळ्या खणीवर अजून किती काळ फक्त चर्चाच होणार आहेत?
चांदोली ही आपली मोठी संपत्ती आहे. धरण, जंगल, प्राणी, पक्षी, फुलांचे ताटवे... निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलीय. धरणातील बोटिंग बंदच पडलेय. व्याघ्र प्रकल्पात सकाळी लवकर प्राण्यांचे दर्शन होते, मात्र वाहनाची सोय नाही. उत्तम निवास, जेवण व्यवस्थाही नाही. स्थानिक नागरिक त्यासाठी पुढे याताहेत.
चांदोली-मणदूर इको अँड ऍग्रीकल्चर टुरिझम या नावाने घरगुती निवास व जेवण व्यवस्था सुरू केलीय. त्याला शासकीय बळ मिळायला हवे. सरकारकडे जागा नाही, जंगलात बांधकाम करता येत नाहीत. जुन्या कॉलनी, डाक बंगला मिळाले तर ते विकसित करता येतील, असा प्रस्ताव सरकारकडे प्रशासनाने पाठवला आहे. जिल्ह्यातून ताकद लागली नाही तर तो धूळखातच पडेल. झोळंबी पठारावर सप्टेंबरमध्ये फुलांचे ताटवे असतात. पण, तेथे प्रवेश बंद असतो. झोळंबीचे महत्त्व कासइतकेच वाढू शकते...
असे हवे पर्यटन...
माणूस हा पर्यावरणाचाच घटक
पर्यटन शॉर्ट टर्म नको, तर शाश्वत हवे
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर हवा
टूर ऑपरेटरचा उपयोग करावा
कचरा करण्याची प्रवृत्ती नको
स्थळाची मर्यादा विचारात घेऊन पर्यटकांना प्रवेश द्यावा
पार्किंग, रेस्टॉरंटची चांगली सोय हवी
प्रथमोपचार, डिसॅस्टर, रेस्क्यू ऑपरेशन टीम उपलब्ध असावी
सात्विक, सामाजिक आणि सांस्कृतिक भान हवे
स्थानिक नागरिकांविषयी आदर असावा
माफक शुल्क आकारून व्यवस्थापन करावे
sangli-Tourism-Mahamap-developed-update-marathi-news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.