Video : CoronaFighter एसपींची मूलगी का रडली ?

Video : CoronaFighter एसपींची मूलगी का रडली ?
Updated on

सातारा : पदाची शान आपण नेहमीच अनुभवतो. पण, आज सुरू असलेल्या कोरोनाच्या थैमानापुढं हरायचं नसेल तर सर्वांनी एक व्हायलाच हवं. अगदी घरातील स्त्री-पुरुषांनाही आपापल्या जबाबदाऱ्यांचं आदान-प्रदान करायला लावणारा हा कोरोना घराघरांच्या उंबरठ्यापर्यंत आला असला तरी, आपण त्याला निश्‍चितपणानं परतवून लावू, अशा निर्धारानं सर्वांनी लढायला हवं. नेमक्‍या याच भूमिकेतून गेले महिनाभर दिवस-रात्र रस्त्यांवर उभारलेल्या पोलिसांसह समाजाचेही मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यादेखील कोरोनाविरुद्धच्या लढाईत नावाला साजेशी "तेजस्वी' कामगिरी करताना दिसत आहेत. 

गेले महिनाभर संपूर्ण जिल्हा प्रशासन कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहे. त्यामध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याची, प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार कामकाजांचे संचलन चालले की नाही, हे पाहण्याची व त्यात गैरप्रकार करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे काम पोलिस दल पार पाडत आहे. त्यामुळे गेले महिनाभर पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर उभे आहेत. जिल्ह्यातील सर्व 22 सीमांवर ते तैनात आहेत. रात्रीचा दिवस करणाऱ्या पोलिसांना किमान 12 तासांच्या ड्युटीची मर्यादा आहे. परंतु, या सर्व पोलिस दलाचे नेतृत्व करणाऱ्या पोलिस अधीक्षकाला अशा आपत्कालीन परिस्थितीत रात्रंदिवस सजग राहावे लागते. महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये रात्री-अपरात्री कधीही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना कामाच्या वेळांचे कोणतेच बंधन नसते. अशाच पद्धतीने सध्या तेजस्वी सातपुते या जिल्हा पोलिस दलाचा कार्यभार सांभाळत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही त्यांनी पोलिसांच्या बळाच्या वापराचे समर्थन केले नाही. कायदेशीर पद्धतीनेच पोलिस दल जाईल, हे त्यांनी ठामपणे पाहिले. आपण हे सर्व करतोय, ते नागरिकांसाठी आणि त्यांनाच त्रास झाला तर काही उपयोग नाही. या जाणिवेतून त्या वाटचाल करीत आहेत. त्यामुळे हळूहळू कायदेशीर धाकानेच नागरिकांचे रस्त्यावर येणे कमी झाले. अशा प्रकारे रात्रंदिवस कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्या फ्रंटफूटवर काम करत आहेत.
 
सर्व जिल्ह्याला घरात बसा सांगण्याऱ्या अधीक्षकांना स्वत: मात्र, घरात थांबता येत नाही. त्यामुळे त्यांना घरातही सदस्यांपासून सामाजिक अंतर पाळावे लागत आहे. त्यांची सहा वर्षांची मुलगी आहे. तिलाही त्यांना जवळ घेता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण होणार याची जाणीव असल्यामुळे पती किशोर हेसुद्धा महिनाभरापासून आपले काम बाजूला ठेवून साताऱ्यात थांबले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका कामगार व त्यांनाही नको म्हणून घरातील सर्व कामगारही कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे घरातील अगदी सर्व कामांच्या आघाड्यांवर ते स्वत: कार्यरत आहेत. अगदी स्वयंपाकापासून ते झाडलोटीपर्यंतच्या कामात ते गुंतलेले आहेत. आईकडे जाता येत नसल्यामुळे मुलीचीही खाण्यापासूनची सर्व जबाबदारीही तेच पार पाडत आहेत. या माध्यमातून सातारकरांच्या सेवेसाठी झटणाऱ्या आपल्या पत्नीला दिली जाणारी त्यांची ही साथ सातारकरांसाठीही महत्त्वाची आहे. 

सातपुते दांपत्य "कोरोना फायटर्स' 

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते, असे म्हणतात. परंतु, एका यशस्वी पत्नीच्या मागेही एक खंबीर पुरुष महत्त्वाचा असतो, याची प्रचिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व त्यांचे पती किशोर या दांपत्याच्या जीवनातून येत आहे. कोरोनाच्या पातळीवर जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याच्या लढाईत अग्रेसर राहून काम करणाऱ्या तेजस्वी यांना कुटुंबातील जबाबदारी पेलण्यात किशोर यांची मोलाची मदत होत आहे. त्यामुळेच हे दोघेही जिल्ह्यातील कोरोना फायटर्स ठरत आहेत. 


पप्पा तिला डबाच द्या 

कोरोनामुळे संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे, वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करणे, जिल्ह्यातील अन्य विभागांचा समन्वय राखण्याच्या सर्व पातळ्यांवरील कामांमुळे तेजस्वी सातपुते यांना अनेकदा जेवणासाठीही वेळ मिळत नाही. काही दिवसांपूर्वी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्या जेवायला घरी गेल्या. तेही मुलीने तीन वेळा फोन केल्यानंतर. त्या घरी पोचतात ना पोचतात तेवढ्यात मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचा कॉल आला. त्यामुळे त्या तशाच माघारी फिरल्या. पप्पांच्या मागे किचनमध्ये असलेल्या मुलीला बाहेर आल्यावर त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे ती खूप रडली. तेव्हापासून ती चिमुरडीही आईची जबाबदारी ओळखून "पप्पा तिला रोज डबाच द्या,' असे म्हणून मागे लागते, ही देखील नव्या पिढीने "कोरोना'च्या लढाईत दिलेली लढतच नव्हे काय?

CoronaFighters : जिवाचा धोका पत्करूनही कोरोनासंगे युद्ध त्यांचे सुरूच 

Video : हारायचं न्हाय गड्या, रडायचं न्हाय...कोरोनाला हरवून टाकायचं हाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.