कऱ्हाड ः कऱ्हाड, पाटण तालुक्यांला वादळी पावसाने बुधवारी दुपारी झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या पावसाचा मोठा फटका कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसराला, तर पाटण तालुक्यातील तारळे विभागाला बसला. त्यामध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, शेती पिकांचे, आंबा, कलिंगड, केळीसह अन्य फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गंजी, काढणी झालेले धान्य भिजूनही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सातारा शहरासह परिसरात हलका पाऊस झाला, तर फलटण शहर परिसराला दहा मिनिटे मुसळधार पावसाने झोडपले.
कऱ्हाड शहरासह तालुक्याला बुधवारी दुपारी तिसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सुरू असलेली मशागतींची कामे ठप्प झाली. पावसापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले, तसेच आंबा, केळी, कलिंगडासह टोमॅटो, काकडीचेही मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके भिजूनही मोठे नुकसान झाले.
पाटण ः वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपून काढले. तासभर पडलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी केले. पावसापूर्वी वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहिले. अर्धा तास मुसळधार पाऊस पडल्यावर त्याचा जोर कमी झाला आणि हलक्या सरी पडत राहिल्या. लॉकडाउनमुळे बाजारपेठा ठप्प आहेत. खरिपाच्या पेरणीस अजून एक महिना अवधी असला, तरी महिनाभरात शेतकऱ्यांना नियोजन करावे लागणार आहे.
तारळे ः अचानक आलेल्या वादळी वारे व पावसाने विभागाला झोडपून काढले. तारळे गावात मात्र पावसाने तुरळक हजेरी लावली. जंगलवाडी, खडकवाडी, फडतरवाडी, घोट, ढोरोशी, मरळोशी, जळव, मुरूड, बांबवडे आदी गावांना मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसाने घोटच्या कोरड्या पडलेल्या बंधाऱ्यात पाणी साचून तो ओव्हरफ्लो झाला. सोसाट्याचा वाऱ्याने लोकही भयभीत झाले. आजच्या पावसात फडतरवाडी येथील स्मशानभूमीतील शेडचा पत्रा उडून गेला. विजेचे तीन पोल वाकले. येथील बाळकृष्ण साळुंखे यांची कौले, श्रीपती साळुंखे, दिलीप साळुंखे, गणपत साळुंखे, सुभाष साळुंखे यांच्या घराचे पत्रे उडाले. भाऊ साळुंखे यांची वैरणीची गंज भिजली. सुरेश साळुंखे यांच्या तालीचे नुकसान झाले. खडकवाडीतील श्रीरंग साळुंखे, राजाराम साळुंखे, खाशाबा साळुंखे, मधुकर साळुंखे, मारुती साळुंखे, सुलभा साळुंखे, सागर साळुंखे, शिवाजी साळुंखे, विठ्ठल साळुंखे आदीच्या घरांचे पत्रे उडाले.
घोट येथे वादळी वारे व पावसात मोठे नुकसान झाले. तासभराच्या पावसाने गावातील व शिवारातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अंकुश शिंदे, समाधान शिंदे, संपतराव शिंदे, यांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले, तसेच महादेव शिंदे, रमेश पवार, विकास शिंदे, शरद पवार, यांचे गोठ्यावरील पत्रे उडून गेले. संजय शिंदे यांची वैरणीची गंज भिजून नुकसान झाले. कृषी पंपाला वीजपुरवठा करणाऱ्या डीपीचा झाड पडून पोल तुटला आहे. मरळोशीमधील किसन भंडारे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. पावसाने पत्रे उडून गेल्यावर त्यांचा संसार उघड्यावर आला. शिवाय दादू भंडारे, वाल्मीक कदम, दत्तात्रय घाडगे, विलास कदम, प्रल्हाद घाडगे, श्रीरंग देशमुख, तर जांभेकरवाडीतील मोहन कदम, संपत कदम व संपत कदम आदींच्या घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. गोरेवाडी येथील विठ्ठल घाडगे यांच्या आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने विभागात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मसूर ः विभागात मसूरसह निगडी, किवळ, चिखली, हेळगाव, पाडळी भागात वादळी वाऱ्याच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला. निगडी, किवळला वादळी वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून आडवी पडली. वाऱ्याच्या तडाख्यात निगडीत उपसरपंच भीमराव घोलप यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातला आडसाली ऊस आडवा झाला. मालन घोलप, हणमंत देटके यांच्या घरावरचा पत्रा उडाला. वाऱ्यामुळे सहा घरावरच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या. वीज कर्मचारी सुहास काजळे यांनी तत्काळ उपाययोजना केली. वीजपुरवठा खंडित असल्याने अनर्थ टळला.
चाफळ ः चाफळ विभागातील डोंगरमाथ्यावरच्या सडादाढोली येथे दुपारी चारच्या सुमारास चक्रीवादळासह झालेल्या पावसाने जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रा 15 फूट उडून बाजूला पडला. सुदैवाने शाळेला सुटी असल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचबरोबर परिसरात शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
कोरोना इफेक्ट : सातारा शहरासह नऊ ग्रामपंचायतींचा परिसर सील
घरी रहा सुरक्षित रहा : सातारकरांसह कऱ्हाडकरांसाठी महत्वाची बातमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.