साताऱ्यात लॉकडाऊन जैसे थे: कारखानदार, बांधकम व्यावसायिकांसह मटण, चिकन, मासे विक्रेत्यांना दिलासा

साताऱ्यात लॉकडाऊन जैसे थे: कारखानदार, बांधकम व्यावसायिकांसह मटण, चिकन, मासे विक्रेत्यांना दिलासा
Updated on

सातारा : लॉकडाऊन जैसे थे ठेवताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेला थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शहरी व ग्रामीण भागातील बांधकामे काही अटी शर्तीवर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश पुढेही चालू राहणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन जैसे थे राहणार असून नागरीकांना घराबाहेर पडता येणार नाही. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरूच ठेवताना जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व कंपन्या काही अटीशर्तींवर सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. पण कंपनी सुरू करताना ऑनलाइन परवानगी घेण्यासोबतच यासाठी नियुक्त तालुक्‍यातील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच कंपनी सुरू करता येणार आहे. तसेच लॉकडाऊन संपेपर्यंत कंपनीतील कामगारांना घरी सोडता येणार नाही, त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था कंपनीच्या आवारातच करावी लागणार आहे. या अटीशर्तीचे पालन न केल्यास सदर कंपनीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातंर्गत उत्पादन, विक्री व जीएसटी परवाना रद्द केला जाणार आहे. तसेच केवळ जिल्ह्यातील कामगारांनाच कंपनीत कामावर येता येणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग सुरू असला तरी जिल्ह्यातील उद्योगाचे थांबलेले अर्थचक्र सुरू राहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज काही अटीशर्तींवर केवळ ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सध्या जिल्ह्यातील सात औद्योगिक वसाहतींसह विशेष आर्थिक क्षेत्रातील 150 उद्योग जे अत्यावश्‍यक वस्तूंची निर्मिती करतात. तेवढेच उद्योग सुरू आहेत. मात्र, उर्वरित उद्योग बंद राहिल्याने कामगारांचा पगार, विज, पाणी व इतर बिलांसह जीएसटी व घेतलेल्या कर्जाचे व्याज व हप्ते भरणे अवघड झाले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मंदीचा फटा सहन करावा लागणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी औद्योगिक अर्थचक्रम सुरू राहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी विविध दहा प्रकारच्या अटी व शर्ती लादल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक कंपन्या सुरू करणार का, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. या अटी शर्तींमध्ये उद्योग सुरू करताना त्यांना एमआयडीसीच्या वेबसाईटवर कंपनीची सर्व माहिती ऑनलाईन भरून स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. ही माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी भरल्यास संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. तसेच त्या त्या ठिकाणचे प्रांताधिकारी उद्योग सुरू करण्याबाबची परवानगी दिली जाणार आहे. तसेच ती नाकारण्याचा ही अधिकार असेल. कंपनी सुरू करताना ऑनलाइन माहिती भरल्यानुसार कामगारांची यादीही अंतिम करावी लागेल. कामगारांची एकदाच वाहतूक करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. सर्व कामगारांना कंपनीच्या वाहनातून कार्यस्थळी घेऊन गेल्यानंतर लॉकडाऊन संपेपर्यंत कंपनीतून घरी सोडता येणार नाही. कर्मचारी व कामगारांची राहण्याची, जेवण्याची सोय कंपनीच्या आवारातच करावी लागणार आहे. कंपनीत जिल्ह्यातीलच कामगार कामावर येऊ शकणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील कर्मचारी व कामगारांना परवानगी मिळणार नाही. 


कंपनीच्या मॅनेजमेंट स्टाफला केवळ कंपनीच्या बसमधून प्रवास करता येईल. तसेच त्यांना वेगळा वाहतूक परवाना घेता येईल. मात्र, त्यासाठी स्वतंत्र वाहतूक यंत्रणा कंपनीला उभी करावी लागेल. वैयक्तिक वाहनाने कोणत्याही सबबीवर मॅनेजमेंट स्टाफच्या व्यक्तीला प्रवास करता येणार नाही. कंपनीन कोणी कोराना बाधित सापडल्यास कंपनी तातडीने बंद करण्याचा अधिकार आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणास राहणार आहे. 


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्योग सुरू करण्यासाठी अटी शर्ती लागू केल्या आहेत. त्याचे पालन करणे लघु उद्योगांना परवडणारे नाही. सध्या जिल्ह्यात दोन कामगारांपासून 70 ते 80 कामगार संख्या असलेले उद्योग आहेत. मुळातच लोकांना काम करायला जागा कमी पडत असल्याने कामगारांना इतर सुविधा देताना अडचणीचे होणार आहे. त्यामुळे उद्योग सुरू करणे अडचणीचे होणार आहे. 

-राजेंद्र मोहिते (मासचे पदाधिकारी, सातारा) 

  • ओगलेवाडीसह, पालिका व नगरपरिषद क्षेत्रातील कंपन्यांना वगळले 
  • प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार 
  • कामगारांना मुक्कामी राहावे लागणार 
  • सोशल डिस्टसिंगचे पालन करावे लागणार 
    कामगारांची एकदाच वाहतूक करता येणार 


ग्रामीण व शहरी भागात बांधकामे चालू ठेवण्यासाठी अटी व शर्तींवर दिली जाणार परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

सातारा  : साथरोग प्रतिबंधात्माक कायदा 1897 मधील अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामीण व शहरी भागात बांधकामे चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शर्तींवर परवानगी दिली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रामधील वेळोवेळी निश्चित केलेली बाधित क्षेत्र वगळून चालू असलेल्या बांधकामास काम चालू करण्यासाठी अर्जदार यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील. नगरपालिका, शहरी क्षेत्रामध्ये पूर्वीपासून चालू असलेली बांधकामे पूर्ववत चालू ठेवण्यासाठी परवानगी राहील. या बांधकाम कामावरील कामगार त्याठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक आहे. क्षेत्राबाहेरील कोणताही कामगार आणता येणार नाही. याकामी संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी अहवाल संबंधित प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करावे.  त्यावर संबंधित प्रांताधिकारी यांनी परवानगी देण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.  ग्रामीण भागामधील चालू असलेली बांधकाम चालू करण्यासाठीच्या परवानगीसाठी अर्जदार यांच्या अर्जावरुन परवानगी देण्यात यावी. उपविभागीय अधिकारी यांनी फक्त कोरोना कालावधीसाठी चालू असलेल्या बांधकाम करण्यासाठीच परवानगी द्यावयाची आहे. बांधकामाच्या परवानगीबाबत अर्जदाराकडून 100 रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र घ्यावे व विनाविलंब चालू असलेल्या बांधकामास परवानगी द्यावी.

ब्रेकिंग : साताऱ्यात दाेन कोरोना संशयितांचा मृत्यू; ज्येष्ठ महिला, युवकाचा समावेश

ज्या नगरपालिका शहरी क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत बांधकामे चालू आहे अशा ठिकाणावरील कामगार हे कामाचे आवाराच्या बाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित ठेकेदार यांनी कामगार यांच्या खाण्या-पिण्याची सोय कामाच्या आवारातच करणे आवश्यक आहे. ठेकेदार यांनी बांधकामाचे ठिकाण 5 किंवा 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होणार नाही तसेच 5 पेक्षा जादा कामगारांची गर्दी होईल, असे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही याची दक्षता घ्यावी. परवानगी ही आजमितीस सातारा जिल्ह्यात रहिवास असलेल्या कामगार यांच्यासाठीच असून नव्याने परजिल्ह्यातील कामगार कामावर येणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी ठेकेदार यांची राहील. कामाच्या ठिकाणी आवश्यक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सींग तसेच सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

दारुबिरु सब कुछ झूठ रे बाबा; टेक केअर

  • हे सुरू राहणार...

  • सर्व शासकिय कार्यालये सुरू राहणार 

  • सर्व बॅंका, वित्तीय संस्था सुरू राहणार 

  • कृषी, औषधे, औजारे, उपकरणे दुकाने सुरू राहणार 

  • मटण, चिकन, मासे न शिजविता घरपोच देता येणार 

  • दवाखाने, वैद्यकिय केंद्रे व औषधे दुकाने 

  • पशुखाद्य निर्मिती कारखाने सुरू राहणार 
  • अत्यावश्‍यक वस्तू व मनुष्यबळ वाहणारी वाहने 

  • हे बंद राहणार 

  • दुय्यम निबंधक कार्यालये बंद राहणार 

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रूपये दंड 

  • सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार 

  • मास्क लावल्याशिवाय घरातून बाहेर पडता येणार नाही 

  • सायकल, दुचाकी, तीन चाकी, चारचाकी गाड्या बंद राहणार 

  • एसटी व खासगी बसेस बंद राहणार 
  • हॉटेल, धाबे आणि स्वीमार्ट बंद राहणार 
  •  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.