कऱ्हाड : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. येथे आजअखेर सहा कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवशी दोन-दोन रुग्ण सापडण्याची आजची ही दुसरी वेळ ठरली. त्यात कऱ्हाड शहराजवळच असलेल्या मलकापूरच्या आगाशिवनगरमध्ये रुग्ण सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहराच्या वेशीवरच कोरोना आल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान कऱ्हाड तालुका सध्या कोरोनासाठी हॉटस्पॉट बनला आहे.
वैद्यकीय सुविधांचे माहेरघर असतानाही कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनावर सध्या सर्वांनी आपल्या घरातच राहून मात करणे गरजेचे आहे. मात्र, तरीही तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने शहरातही खळबळ उडाली आहे. कऱ्हाड तालुक्यात पहिला रुग्ण तांबव्यात, तर दुसरा म्हारुगडेवाडीत आढळला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील अन्य एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचदरम्यान हजारमाचीत रेल्वेचा कर्मचारी बाधित म्हणून सापडला. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच काल चरेगाव आणि बाबरमाचीत दोन रुग्ण सापडले. तालुक्यात चार कोरोनाबाधित असल्याने तालुक्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच काल (मंगळवार) पुन्हा आणखी दोन रुग्ण सापडले. वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील दोघे रुग्ण बाबरमाची येथील बाधिताच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांच्या संपर्कातील कुटुंबीय आणि अन्य काही जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्याची कार्यवाही प्रशासन, आरोग्य विभागाने केली आहे. मलकापूरच्या आगाशिवनगर परिसरात रुग्ण सापडल्याने तो कऱ्हाड शहराच्या वेशीवरच सापडल्यासारखा झाला आहे. त्यामुळे शहरातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही साखळी नव्हे ना...
कऱ्हाड तालुक्यात यापूर्वी सापडलेल्या रुग्णांपैकी म्हारुगडेवाडी वगळता अन्य रुग्ण हे वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. मात्र, आज वनवासमाची आणि आगाशिवनगरला सापडलेल्या रुग्णांवरून आता तालुक्यात कोरोनाची साखळी तर सुरू झाली नाही ना, अशी चर्चा होऊ लागली आहे. संबंधित रुग्णांना बाबरमाचीतील रुग्णांमुळे लागण झाल्याचे सांगण्यात आल्याने आता या साखळीतून गुणाकार होऊन त्याची संख्या वाढण्याअगोदर ती साखळी तोडण्याची खबरदारी आरोग्य विभागासह नागरीकांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नागरीकांनी विनाकारण बाहेर पडले नाही पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.