दहा महिन्यांच्या बाळाच्या पॉझिटिव्ह रिपाेर्टमुळे मंत्रीही चिंतेत

दहा महिन्यांच्या बाळाच्या पॉझिटिव्ह रिपाेर्टमुळे मंत्रीही चिंतेत
Updated on

सातारा : सातारा जिल्हयामध्ये एकूण ११ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून एका रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. एका दिवसात चार लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये पाटण तालुक्यातील १० महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. ही बाब चिंताजनक असून संचारबंदी,जमावबंदी लपूनछपून लोक जिल्हयामध्ये येत आहेत. कोणत्याही परिस्थिती बाहेर जिलह्यातील नागरिक हा सातारा जिल्ह्यात येणार नाही यासाठी आणखीन कडकरित्या प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी,  अशा सूचना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथे गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची कोरोना प्रतिबंधासाठी  करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थिती होते.
  
देसाई उपस्थित अधिकारी यांच्याकडून सातारा जिल्हयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये सातारा जिल्हयात बाहेरुन आलेल्या ३८० व्यक्तींना सातारा जिल्हयातील १० ठिकाणच्या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. १० एप्रिलपर्यंत केवळ १२२ व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते आजतारखेला ३८० व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे एकूण ११ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यातील दोन मयत व एका व्यक्तीस घरी सोडून त्यास होम कॉरटाईंन करण्यात आले आहे.  नव्याने चार व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. असे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले. 
जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे.

या चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून सुमारे ५०० गुन्हे या काळात नोंद झाले आहेत एकावेळी एका गुन्हयामध्ये १०० ते १२५ व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.

गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यावेळी म्हणाले,बाहेरुन आलेल्या ३८० व्यक्तींना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे ही बाब चिंता वाढवणारी आहे.संचारबंदी,जमावबंदी असतानाही लोक जिल्हयात येत आहेत ही बाब गंभीर आहे यावर कडक प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. जिल्हयात एकूण दोन लाखाच्या वर लोक बाहेरगांवाहून आल्याची नोंद आहे.  

पाटण मतदारसंघात तर ६० ते ६३ हजार लोक बाहेर गांवाहून आले आहेत. १० महिन्यांच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ही बाब अतिशय गंभीर असून याबाबत आपण सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल,यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पाटण मतदारसंघातील कोयनानगर येथील प्रकल्पाचे रुग्णालय असून या रुग्णालयात दिवसाकाठी २०० ते २५० लोक उपचाराकरीता येत असतात याठिकाणी आवश्यक तो औषधसाठा देणे आवश्यक आहे त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी याच्याकडून आवश्यक असणाऱ्या औषधांची मागणी मागवून घेवून तो औषधसाठा दयावा, अशा सुचना देवून सातारा जिल्हयात कोरोनाचा धोका वाढू नये याकरीता प्रशासनाने संचारबंदीची व जमावबंदीची प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु करावी अशा सक्त सुचना केल्या.

२० एप्रिल नंतरच्या लॉकडाऊनसंदर्भातील जिल्ह्यातील लोकांना माहिती द्यावी
२० एप्रिल नंतर काही बाबींना लॉकडाऊनमधून शिथीलता मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. परंतू याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबतची माहिती जिल्ह्यातील लोकांना द्यावी. अनावश्यक गर्दी होणार नाही,याची दक्षता घ्यावी तसेच जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पाणी पुरवठा योजनांची कामे याबाबत सुद्धा नियोजन करावे, अशा सूचनाही श्री. देसाई यांनी शेवटी केल्या.

Video : CoronaFighter : कमाॅन मम्मा घरात बसू नकाेस

भावा आपला पालकमंत्री पायाला भिंगरी लावूनच आपली काळजी घेताेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.