सातारा : लॉकडाउनमुळे शिक्षणाचे सारेच चक्र थांबलेले असताना जावळी तालुका शिक्षण विभागाने या संकटाचे संधीत रूपांतर केले. त्यात तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी "झूम ऍप'च्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या शिक्षकांसाठी तीन आठवड्यांचा प्रेरणादायी, पथदर्शी असा "मिशन शिष्यवृत्ती जावळी' हा ऑनलाइन शैक्षणिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
जावळी हा जिल्ह्यातील आत्यंतिक दुर्गम तालुका. येथील शिक्षण विभागाने राबविलेला शिष्यवृत्तीचा जावळी पॅटर्न राज्यस्तरावर पोचला आहे. सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनमुळे सारेच व्यवहार ठप्प झाले. अशा स्थितीत गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यात तालुक्यातील निवडक तंत्रस्नेही शिक्षक व शिष्यवृत्तीचे तज्ज्ञ शिक्षकांची ऑनलाइन कॉन्फरन्स घेण्यात आली. त्यातूनच "मिशन शिष्यवृत्ती जावळी' ऑनलाइन मार्गदर्शन हा नवा उपक्रम आकारास आला. या तालुक्यात एकूण 18 शिक्षण केंद्रे आहेत. त्यातील निवडक 65 सदस्यांचा मिळून एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला. नंतरच्या काळात झूम ऍपच्या माध्यमातून तीन ते 24 मे या काळात रोज सकाळी 11 ते दुपारी साडेबारा या वेळेत शिष्यवृत्तीचे ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन अन् त्यानंतर अर्धा तास प्रशिक्षणासाठी ऑनलाइन उपस्थित असणाऱ्या शिक्षकांच्या शंका, समाधान व त्यावर चर्चा असे स्वरूप ठेवण्यात आले. सहभागी शिक्षकांडून दीड-दोनशे प्रश्नांची प्रश्नपेढी तयार करून घेण्यात आली.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिष्यवृत्तीचे राज्यस्तरीय तज्ज्ञ एन. डी. धनावडे, संपत शेलार, नामदेव जुनघरे, शामराव जुनघरे, रामदास गोळे, संदीप किर्वे, आर. के. जाधव, पी. टी. कदम, सुधाकर दुंदळे, तानाजी केमदारणे, मनीषा वाडकर, अशोक लकडे, विस्तार अधिकारी कल्पना तोरडमल यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तंत्रस्नेही शिक्षकांनी व्हॉट्सऍप ग्रुप तयार करणे, मार्गदर्शन वर्गाचे नियोजन करणे, झूम ऍपद्वारे व्हिडिओ कॉनफरन्स आयोजिणे, लिंक, प्रश्नपेढी बनविणे आदी कामांसाठी परिश्रम घेतले.
अधिकाऱ्यांचीही उपस्थिती
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर, (माध्यमिक) शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनीही "व्हीसी'मध्ये विशेष उपस्थिती दाखवून संवाद साधला. सध्या पुण्यात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे अमृत नाटेकर यांनीही मार्गदर्शन केले. सावलीचे अभियंता प्रदीप जुनघरे यांनीही तांत्रिक सहकार्य केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
काय साध्य झाले?
- लॉकडाउन काळाचा सदुपयोग
- शिक्षकांचा व्यावसायिक, व्यक्तिमत्त्व विकास
- लोकसहभागातून गुणवत्ता विकास
- दर्जेदार प्रश्ननिर्मिती अन् प्रश्नपेढी
- सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील शिक्षकांच्या विचारांचे अदान-प्रदान
- शैक्षणिक तंत्रज्ञानाची आवड वाढली
- शिक्षकांचा स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाढला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.