कोरेगाव (जि.सातारा) : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे पुन्हा विधीमंडळात जातीलच, याबाबतचा आत्मविश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करू लागल्याने ही संधी शिंदे यांना मिळणार का, याकडे आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या येत्या चार-पाच दिवसांतील राजकीय घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी येत्या ११ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून पाच ते सहा जागांवर दावा सांगितला जात असून, त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येतील, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्यांमध्ये नुकतेच निवृत्त झालेले हेमंत टकले, माजी मंत्री शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर, राजन पाटील, महेश तपासे, नजीब मुल्ला यांचा समावेश आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे या नावांचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कामगार नेते म्हणून राज्यात ओळख असलेले माजी मंत्री शिंदे यांना विधीमंडळातील कामकाजाचा तब्बल २० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी सुरवातीला जावळी मतदारसंघाचे दोन वेळा व त्यानंतर कोरेगावचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. आक्रमक नेता, अभ्यासपूर्ण शैलीत विविध प्रश्न मांडून ते सोडवून घेण्याची धमक ठेवणारा, प्रशासनाशी सौहार्दपूर्ण संबंध राखणारा प्रसंगी सार्वजनिक कामे करून घेण्यासाठी कठोरपणा दाखवणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच
पक्षाचे प्रवक्ते म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आतापर्यंत त्यांनी पक्ष संघटनेत देखील योगदान दिले आहे. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पक्षाचा कोणताही कार्यक्रम राबवण्यात त्यांचा हिरीरीने पुढाकार असतो, हे पक्षातील वरीष्ठांनाही माहित आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीआधी पक्षामध्ये पडझड सुरू झाली होती; परंतु 'माझ्या राजकीय कारकीर्दीचे काहीही होवो, मी शरद पवार यांना कदापीही सोडणार नाही', अशी खंबीर भूमिका त्यांनी प्रारंभीच घेतली होती. सातारा जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. तो अबाधित राखण्याची जबाबदारी श्री. शिंदे यांच्यावर आली होती. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिल्हाभर रान उठवले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा येथे भर पावसात झालेल्या सभेचे पूर्वनियोजन त्यांनी नेटके केले होते. परिणामी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. मात्र, निवडणुकीच्या धावपळीत स्वत:च्या कोरेगाव मतदारसंघात निर्णायक क्षणी लक्ष घालण्यास वेळ अपुरा पडल्याने त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाने सातारा जिल्ह्यात चांगली कामगिरी केल्याचे विशेषतः लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील विजयी झाल्याचे समजताच शरद पवार हे सातारा येथे जाण्यासाठी निघाले; परंतु शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याची बातमी थडकताच श्री. पवार यांनी सातारा भेटीचा निर्णय रद्द केला. 'पक्ष संघटनेसाठी अहोरात्र झटणारे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने सातारा येथे जाण्याचे मन होत नाही', अशा शब्दांत त्यावेळी श्री. पवार यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.
...म्हणून दुपारी तीनला पश्चिम महाराष्ट्र हादरला
दरम्यानच्या काळात शशिकांत शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होऊ लागली. त्यानंतरच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडी आणि गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. राष्ट्रवादी हा सत्ताधारी महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे विधानपरिषदेमध्ये विरोधकांचे हल्ले परतवून लावणाऱ्या व सरकारची बाजू भक्कमपणे उचलून धरणाऱ्या आक्रमक प्रतिनिधींची नितांत आवश्यकता आहे.
यापूर्वी धनंजय मुंडे विधानपरिषदेत राष्ट्रवादीच्या बाजूने गरजत होते, आता ते विधानसभेत गेले आहेत. त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांना निश्चितपणे संधी मिळेल, असा आत्मविश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यासाठीच दस्तुरखुद्द शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, श्रीनिवास पाटील यांच्याकडे शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी केल्याचे कोरेगाव मतदारसंघातील व सातारा जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सांगत आहेत.
लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष
...तर या विद्यार्थ्यांना मिळतील आकाशवाणी, दूरदर्शनवरून शिक्षणाचे धडे
कोरोनाने केला त्यांचा स्वप्नभंग
सातारा, कऱ्हाड कोरोनाच्या चक्रव्यूहात; दाेन वर्षीय मुलीचा समावेश
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.