सातारा : शहर वाहतूक शाखेचे हवालदार राजाराम जाधव, विनायक मानवी हे वाढे फाटा (ता. सातारा) येथे वाहतुकीचे नियमन करत असताना त्यांनी एक संशयित दुचाकी थांबविली. त्याच्याकडे कागदपत्रे मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोघांनी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. यावेळी चौकशीदरम्यान संशयित राहुल भरत शेडगे (वय 19, रा. कास रोड, आंबानी, ता. सातारा) याने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या.
पोलिसांनी राहुल शेडगे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने एका साथीदारासह सदरबझार येथून ही मोटारसायकल चोरली असल्याचे सांगितले. तसेच त्याने अजंठा चौक येथूनही आणखी एक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शेलार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एन. एस. कदम, सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. वाय. कदम, वाहतूक शाखेचे हवालदार राजेंद्र जाधव, नाईक शिवाजी भिसे, धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ, विनायक मानवी यांनी ही कारवाई केली.
दुचाकी चाेर पकडण्यासाठी पाेलिसांसमाेर नेहमीच आव्हान असते. यापुर्वी कराड येथून 90 दुचाकी चोऱ्यांचा केलेला तपास थक्क करणारा आहे.
कराड शहर परिसरातून वारंवार दुचाकी चोऱ्या होत होत्या. काय करावे पोलिसांनाही कळत नव्हते. सुमारे सात वर्षांपूर्वी पोलिसही त्या घटनांनी हडबडले होते. मात्र, पोलिसांचा खबरी आणि जागरूक नागरिकांमुळे दोन टोळ्या पोलिसांनी त्या वेळी गजाआड केल्या. त्यातील एका टोळीत केवळ एकटाच होता, तर दुसऱ्या टोळीत चौघांचा समावेश होता. दोघांकडून जवळपास 90 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. त्यात "वन मॅन आर्मी'सारख्या एकट्या चोरट्याकडून 56 दुचाकी जप्त केल्या होत्या. स्वतःला मुंबई पोलिसांचा खबरी म्हणून फिरणाऱ्या भामट्याने त्या चोऱ्या केल्या होत्या. अलीकडच्या दहा वर्षांत एवढ्या दुचाकी जप्त पोलिसांना यश आले होते. तो तपास आजही पोलिस खात्यात नावाजला जातो.
सहा महिन्यांत जवळपास 100 वर दुचाकी चोऱ्यांची नोंद
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोऱ्या होत होत्या. बस स्थानक, हॉस्पिटल, मुख्य बाजारपेठ अशा मोठ्या ठिकाणी जास्त प्रमाणात लागणाऱ्या दुचाकी चोरीला जात होत्या. सहा महिन्यांत जवळपास 100 वर दुचाकींच्या चोऱ्या झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली. काय करावे, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलिसांनी बाजारपेठेतील प्रत्येक व्यापाऱ्याला आणि प्रत्येक संस्थेला त्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले होते.
त्यात येथील सनबीम संस्थेच्या आवारातून दुचाकीची चोरी झाली. त्या वेळी पोलिसांनी त्या संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. त्यात एक सुटाबुटातील व्यक्ती एका वाहनाजवळ रेंगाळत होती. त्याने इन्शर्ट केला होता. त्याच्या हातात पेपरही होता. दुचाकी भोवती रेंगाळणाऱ्या व्यक्तीने कोणाला काहीही कळायच्या आत एका दुचाकी हॅन्डलचे लॉक पद्धतशीरपणे तोडले. त्याची कृती सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांकडे त्याची नोंद झाली. पोलिसांनी पुन्हा सनबीम संस्थेत तशा पद्धतीची व्यक्ती दिसली तर कळवा, असे सांगितले. सोबत आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनाही ते सीसीटीव्ही फुटेज दिले. त्यांनाही मदतीचे आवाहन केले. महिनाभरात त्याच पेहरावातील हुबेहूब व्यक्ती सनबीम संस्थेच्या आजूबाजूला फिरताना संस्थेतील कर्मचारी व समोरच्या व्यापाऱ्यांना दिसली. तोच पेहराव, त्याच पद्धतीचे फिरणे संशयास्पद वाटल्याने जागरूक नागरिक व व्यापाऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.
दुचाकी चोरीने आधीच त्रस्थ असलेले पोलिस त्वरित घटनास्थळावर पोचले. सीसीटीव्हीतील साधर्म्य दिसणाऱ्या व्यक्तीला त्यांनी ताब्यात घेतले. अत्यंत स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीने पोलिसांनाही गुंडाळण्याचे "प्लॅनिंग' केले होते. त्याने मुंबई पोलिसांचा मी खबरी आहे, असे सांगत मोठ्या गुन्हेगारांना पकडल्याची बतावणी करू लागला. मोठ्या अधिकाऱ्यांचे नावे सांगून पोलिसांवर प्रेशर पाडू लागला. मात्र, पोलिसांनी शांत डोक्याने त्याचे सगळे ऐकून घेतले. मात्र, त्याला काहीही त्रास न देता त्याच्याशी गप्पा मारल्या. दिवसभर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तब्बल 12 तासांने त्याने गुन्ह्याची कबुली देण्यास सुरवात केली.
नक्की वाचा - कऱ्हाड : महाविद्यालयीन मुलींच्या गटात राडा
त्यासाठी त्याने मटण आणि दारूची मागणी केली. पोलिसांनी तीही मागणी पूर्ण केली. रात्री आठ वाजता त्याने दहा दुचाकी कशा चोरल्या. त्याची ठिकाणे तर पोलिसांना सांगितलीच त्याशिवाय त्या कोणाला विकल्या याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनाही विश्वास बसला नाही. कारण त्याचे लेखी काहीही नव्हते. तो तोंडी सांगत होता. पोलिसांनी खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी चौकशी केली. त्या वेळी त्याने त्या दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले.
दुसऱ्या दिवशी स्वतंत्र पथक पाठवून पोलिसांनी त्या दुचाकी जप्त केल्या. अशा सहा टप्प्यांत त्याने 60 दुचाकींची माहिती दिली. त्या सगळ्याचे "रेकॉर्ड' त्याच्या तोंडपाठ होते. मुंबईतील गुन्हेगारांशीही संबंध होते. त्यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांचेही मोबाईल क्रमांक तोंडपाठ होते. पोलिसांनी खात्री केली, त्या वेळी ती व्यक्ती खरे बोलत होते. मात्र, त्यांनी पोलिसांना मदत करण्याचे काम बंद करून दहा वर्षे झाली होती. पूर्वीचा तो पोलिसांचा खबरी होता. मात्र, आता तो भामटा होता.
अवश्य वाचा - बाबा, मी शाळेत जाऊ कशी?
पोलिसांचा खबरी असल्याचा बनाव करून तो भामटेगिरी करत होता. कऱ्हाड तालुक्यातील येणपे त्याचे मूळ गाव आहे. तो नोकरीनिमित्त मुंबईस्थित होता, आजही तो मुंबईत असतो. इकडे येण्यास त्याला बंदी आहे.
पोलिसांचा खबरी असल्याची भामटेगिरी करणाऱ्या संशयिताचा पर्दाफाश झाला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत दुचाकी चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी शिताफीने गजाआड केले होते. त्यात कडेगाव, विटा भागातील ती टोळी होती. पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या "टिप्स'वरून पोलिसांनी कारवाई केली होती. हवालदार सज्जन जगताप यांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 30 दुचाकी जप्त केल्या होता.
त्या दुचाकी कऱ्हाड व विटा भागातून चोरल्या होत्या. दोन टोळ्यांकडून त्या काळात 90 दुचाकी जप्त झाल्या. दुसरी टोळी पोलिसांनी अत्यंत कसरत करत व आपला जीव पणाला लावून धरली होती. त्यासाठी गुन्हे अन्वेषण पथकाच्या पोलिसांना वेशांतर करून सापळा रचावा लागला. विटा भागातील चार जण दुचाकी चोरतात व त्या दुचाकी सुर्ली घाटात आणून लपवतात. नंतर त्या दुचाकी बाहेर काढून विकल्या जातात, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली होती.
हेही वाचा - ऑलिंपिकचे ध्येय गाठण्यासाठी पूर्वाला हवे मदतीचे बळ
त्या वेळी पोलिस निरीक्षक विकास धस हे गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख होते. त्यांच्यासह त्या पथकातील सहायक फौजदार चांगदेव आगवणे, सहायक पोलिस निरीक्षक ठाकूर, हवालदार जगताप, प्रकाश इंगळे, राजेंद्र थोरात, शशिकांत काळे, विजय बाबर यांच्या पथकाने कारवाई केली. सारे लोक सुर्ली घाटात वेगवेगळ्या वेशात थांबले. त्या वेळी ऍक्टिव्हा विक्रीस, तसेच तेथे लपविण्यास आणली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात स्प्लेंडर आली होती. त्या वेळी पोलिसांमधील एकाने चौकशी केली.
त्या वेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला सोडून देणार इतक्यात त्यामागून ऍक्टिव्हा आली व त्याने स्प्लेंडर चालकास हाक मारली. ती गोष्ट पोलिसांच्या नजरेने हेरली. त्यांनी दोघांनाही पकडले. त्या वेळी चौघांना अटक झाली. "ऑन दी स्पॉट' दोन व नंतर 30 दुचाक्या त्यांनी चोरल्याची कबुली दिली. त्याशिवाय त्या जेथे विकल्या त्यांचे पत्ते दिले. त्यामुळे पोलिसांना दोन टोळ्याकडून तब्बल 90 दुचाकी जप्त करण्यात यश आले होते.
आख्ख्या गावात चोरीच्या दुचाकी
मुंबई पोलिसांचा खबरी सांगणाऱ्या भामट्याने शिराळा तालुक्यातील एका गावात तब्बल 20 दुचाकी विकल्या होत्या. ती माहिती त्याने पोलिसांना सर्वात शेवटी दिली. दुचाकी विकल्यानंतर इसारत म्हणून चार ते पाच हजार रुपये तो भामटा घ्यायचा, उरलेले पैसे कागदपत्रे दिल्यावर द्या, असे सांगून निघून जायचा. असेच व्यवहार त्याने त्या गावात केले होते. त्या गावात पोलिस पोचले.
जरुर वाचा - कोसळलेलं आयुष्य पेलताना..!
त्या वेळी गावकऱ्यांना त्या दुचाकी चोरीच्या आहेत कळताच त्या ग्रामस्थांनी एकाच वेळी एका गल्लीतील मोकळ्या जागेत एका ओळीत त्या दुचाकी लावल्या होत्या. ते गाव छोटे होते. त्या छोटेखानी गावात तब्बल 20 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्या वेळी आख्ख्या गावात चोरीच्या दुचाकी आहेत की काय, असेच वाटत होते. त्यामुळे ती घटना पोलिसांना आजही स्मरणात राहिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.