क्षणात काॅन्स्टेबलच्या डोळ्यासमोरून स्वजीवनाचा "फ्लॅशबॅक' सरकला

क्षणात काॅन्स्टेबलच्या डोळ्यासमोरून स्वजीवनाचा "फ्लॅशबॅक' सरकला
Updated on

गोंदवले (जि.सातारा) : पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट उपसतच पोलिस भरती झाला आणि स्थिरावला सुद्धा; पण गरिबीची जाण ठेऊन सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत अडकून राहिलेल्या आंध्र प्रदेशातील एका कुटुंबाचे पालकत्व स्वीकारुन तो आधारदाताही झालाय. गोंदवल्याच्या प्रवीण उत्तम त्रिंबके याने तो कार्यरत असणाऱ्या देवगड (सिंधुदुर्ग) येथे दाखवलेल्या या दातृत्वाने मायभूमीतील लोकांचा ऊर अभिमानाने भरून आलाय.
 
गोंदवल्यातील ढोर समाजातील त्रिंबके कुटुंबीयांनी मोलमजुरी करतच हलाखीचे दिवस काढले. वडील उत्तम यांना कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी प्रवीणनेही शिक्षण घेत घेतच अगदी वेटबिगाराचेही काम केलं. जिद्दीला कष्टाची जोड देऊन तो पोलिस भरती झाला. सध्या प्रवीण त्रिंबके हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. 
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन झाला. अनेक कुटुंबे जिथल्या तिथंच अडकून पडली. देवगड मध्येही आंध्र प्रदेशमधील एक कुटुंब अडकून पडले आहे. टोपल्या विणून दोन लहानग्या लेकरांसह अनिल अन्नम दांपत्य गुजराण करते. देवगड- सातपायरी रस्त्यालगतच एका खोपटात वास्तव करून राहिलेलं हे अन्नम कुटुंबही लॉकडाउनच्या कचाट्यात अडकले. लॉकडाउनमुळे व्यवसायाचा आणि घरी जाण्याचा मार्गही बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती; परंतु "देव तारी त्याला कोण मारी' याप्रमाणेच देवगडचे पोलिस कर्मचारी प्रवीण त्रिंबके याच्या नजरेत अन्नम कुटुंबाची घालमेल आली. ड्युटीवर असताना त्याने अन्नम यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. क्षणभरात त्याच्या डोळ्यासमोरून स्वजीवनाचा "फ्लॅशबॅक' सरकला आणि मानवतेच्या जाणिवेतून या कुटुंबाला मदत करण्याची भूमिका त्याने घेतली.
 
आता लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढला आहे. त्यामुळे त्रिंबके याने लॉकडाउन संपून परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत या अन्नम कुटुंबाचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यालगत उघड्यावर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती लक्षात घेऊन त्यांनी या कुटुंबाला झोपडीतून उचलून एका खोलीत आश्रय दिला आहे. निवाऱ्याबरोबरच अन्न आणि वस्त्राची गरज पूर्ण करण्याचाही त्याने प्रयत्न चालवला आहे. आपत्ती काळात जीवनावश्‍यक बाबींची पूर्तता करून वर्दीतील अवलियाने दाखवलेल्या दातृत्वाचे कौतुक होत असताना, आपलंच पोर गावाचाही नावलौकिक वाढवत असल्याचे समजल्यावर त्रिंबके कुटुंबीयांसह गोंदवलेकरांचाही ऊर अभिमानाने भरून गेला आहे.

Video : 'या' गावातील पाच हजार कुटुंबाची चिंता वाढली 

Video : कोरोनाच्या लढाईत तुमच्या मदतीला मी स्वतः उतरीन

खाल्ले तर सारेजण खाऊ...नाहीतर सगळेच उपाशी मरु 

मोफत तांदळाचा भात शिजतोय कुठं ?

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शिकवणीतूनच या गरजू कुटुंबाला सहकार्य करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे. या कामामुळे खूप आत्मिक समाधान मिळत आहे. 
- प्रवीण त्रिंबके, पोलिस कर्मचारी, देवगड 

आमचे जगण्याचे सर्वच मार्ग संपत चालले असताना प्रवीण त्रिंबके यांनी दिलेला आधार आम्ही कधीच विसरू शकणार नाही. 
- अनिल अन्नम. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.