प्रसूतीनंतर ती एकटीच चालत निघाली गावाकडे

प्रसूतीनंतर ती एकटीच चालत निघाली गावाकडे
Updated on

ढेबेवाडी (जि.सातारा)  : लॉकडाउनमुळे पावला पावलांवर उभी राहणारी डोंगराएवढी संकटे आणि त्यातून मार्ग शोधताना जणू देवदूत बनून मदतीला धावणारे मदतीचे हात समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याची साक्ष देत आहेत. आज सकाळीही त्याचे प्रत्यंतर आले. अवघ्या चार तासांपूर्वी प्रसूती झालेली शेतमजूर महिला चिमुकल्या बाळाला हातात घेऊन कऱ्हाडहून तिच्या गावी जाण्यासाठी ढेबेवाडीच्या दिशेने चालत निघाली. मात्र, वाटेत भेटलेल्या एका वाटसरूने तिची विचारपूस करून आगशिवनगरला राहणाऱ्या गावाकडच्या कुटुंबाशी तिची भेट घडवत त्यांच्या मदतीने तिचा घरापर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर करून दिला.

त्याचे असे झाले. ढेबेवाडीजवळच असलेल्या एका गावातील महिलेला रात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्याने शेजारच्या एका महिलेला सोबत घेऊन ती येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. तिथे पहाटे चारच्या सुमारास प्रसूती होऊन तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतरही रक्तस्त्राव थांबत नसल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आल्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ उडाली. अशा परिस्थितीत शरीरातून अतिप्रमाणात रक्त निघून गेल्याने रुग्ण शॉकमध्ये जाऊन जीवलाही धोका निर्माण होण्याची भीती असते. त्यामुळे शरीरात रक्त चढवण्यासह अन्य अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयात हलविणे गरजेचे असल्याने तातडीने तिला कऱ्हाडला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला चालक नाही. त्यामुळे 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून घेण्यात आली. संबंधित महिला, बाळ आणि तिच्या सोबतच्या महिलेला घेऊन रुग्णालयातील डॉ. जयदीप पवार व त्यांचे सहकारी ए. एम. निकम तातडीने कऱ्हाडला निघाले. 108 वरील चालक शिवाजी पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 20 मिनिटांत त्या सर्वांना कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पोचवले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तेथे उपचारांवर मर्यादा असल्याने कृष्णा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. कृष्णा रुग्णालयात आवश्‍यक कागदपत्रे तयार केल्यावर ऍडमिट होण्याचा सल्ला तिला देण्यात आला. मात्र, समोर परिस्थिती दिसत असल्याने आणि दरम्यान रक्तस्त्रावही थांबल्याने तिने पुढील उपचाराऐवजी घरी जाण्याचा निर्णय घेत स्वतःच डिस्चार्ज घेतला. 

वाहतूक बंद असल्याने आणि सोडायला आलेली रुग्णवाहिका परत निघून गेल्याने 25 किलोमीटरवरील गाव गाठायचे कसे असा प्रश्न त्या दोघींपुढे आ वासून उभा राहिला. हळूहळू चालतच जाऊया, असा निर्धार करून सकाळी आठच्या सुमारास त्या दोघी तेथून निघाल्या. काही अंतर चालल्यावर कामानिमित्ताने तेथून निघालेल्या विलास चव्हाण यांनी त्यांना रस्त्यात थांबवून विचारपूस केल्यावर त्यांनी त्यांना घडलेला वृत्तांत सांगितला. ढेबेवाडी भागातील ही माणसे असल्याने त्यांनी तेथे राहण्यास असलेल्या व समाजकार्यात अग्रेसर राहणाऱ्या ढेबेवाडीच्या शंकरराव पवार यांच्या घरी त्यांना पोचवून गुदरलेला प्रसंग सांगितला. शंकर पवार व त्यांचे बंधू रोटरी क्‍लब ऑफ मलकापूरचे सदस्य विलास पवार यांनी बाळासह त्या महिलांना घरात नेले. पवार कुटुंबीयांनी त्यांना धीर देत चहा- नाष्टा, दूध व बाळाला कपडे दिले. त्यांना ढेबेवाडीस पोचविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य नानासाहेब साबळे यांच्याशी संपर्क साधला. श्री. साबळे यांनी खासगी चालक रमेश माने यांना ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घेऊन कऱ्हाडकडे पाठवत त्यांचा ढेबेवाडीत येण्याचा मार्ग सुकर करून दिला. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात आई व बाळाला ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. डोंगरे यांनी सांगितले. 


नुकतेच जन्मलेले बाळ हातात घेऊन रस्त्याने चालत निघालेली आई बघून काळीज पिळवटले. त्या सर्वांना सुखरूप घरी पोचवण्यासाठी अनेकांचे दरवाजे ठोठवायचा प्रयत्न केला; परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. समाजातील माणुसकीचा झरा आटत चाललाय की काय, असा प्रश्नही क्षणभर मनाला पडला होता. 

शंकरराव पवार, मदतकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.