कासेगाव टापूचा इतिहास सशस्त्र क्रांतिवीरांचा

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतिवीरांचे योगदान नेहमीच दुर्लक्षित राहिले
Babuji Patankar
Babuji Patankar
Updated on

- कॉ. जयंत निकम

सातारच्या प्रतिसरकारच्या कासेगाव गटाचे नेतृत्व क्रांतिवीर बर्डे गुरुजी आणि त्यांच्या अटकेनंतर बाबूजी पाटणकर यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतिवीरांचे योगदान नेहमीच दुर्लक्षित राहिले. ती उपेक्षा बाबूजींच्या वाट्यालाही आली. एक संवेदनशील, भावनाप्रधान आणि जनहिताची पुरेपूर बांधिलकी अंगी असलेल्या क्रांतिवीर बाबूजींनी स्वातंत्र्यानंतर देशउभारणीच्या कामी योगदान देण्यासाठी कासेगाव शिक्षण संस्थेच्या उभारणीचे स्वप्न पाहिले.

प्रतिसरकारच्या कासेगाव गटाचे नेतृत्व क्रांतिवीर बर्डे गुरुजी करीत होते. प्रतिसरकारच्या एकूण क्षेत्रापैकी सर्वांत मोठ्या क्षेत्रात या गटाचे काम सुरू होते. ‘फोडा आणि झोडा’ नीतीनुसार कुटिल ब्रिटिशांनी स्थानिक दरोडेखोराला हाताशी धरून या क्रांतिवीरांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांकडून प्रोत्साहन दिले जात होते. भूमिगत काँग्रेस क्रांतिकारकांच्या नावावर लूट करावी, यासाठी ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणा देत दरोडेखोरांकडून दरोडे टाकले जात होते. त्यामुळे क्रांतिकारकांना ब्रिटिशांचे पोलिस आणि त्या दरोडेखोरांच्याही बंदोबस्ताचा सामना करावा लागत होता.

संपूर्ण वाळवा तालुक्यात वाटेगाव, कासेगाव, पाचुंब्री, काळमवाडी, पेठ, टाकवे, बांबवडे, का. शिरंबे, बेलवडे अशी एक ना अनेक गावे होती. भूमिगतांच्या बाजूला बर्डे गुरुजी, बाबूजी पाटणकर, अहमदभाई, धोंडिराम माळी, शांतिनाथ पाटील, दत्तू सातारकर, विलास कासेगावकर वैद्य, नाथाजी लाड, शेख काका, जोशी काका यांसारखे मोहरे होते. दुसरीकडे, गावोगावचे टगे आणि दरोडेखोर अशी ती लढत होती. त्यांना सातारच्या असिस्टंट डी. एस. पी. गिलबर्ट यांच्याकडून त्यांना फूस होती. त्याने या दरोडेखोरांना रायफली पुरवल्या होत्या.

बाबूजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चकमकी जागोजागी सुरू होत्या. कऱ्हाड तालुक्यातील नांदगाव येथे न्यायनिवाड्यासाठी गेलेल्या बाबूजी, शेख काका, कासेगावकर वैद्य यांच्यावर दरोडेखोरांनी चाल केली. त्या चकमकीत सापडलेल्या गोळ्यांची टोपणे ‘३०३ रायफल’ची होती. या गोळ्या फक्त ब्रिटिश पोलिस खाते वापरत होते. त्यातून दरोडेखोर आणि पोलिस एकमेकांना सामील होते, हेच स्पष्ट झाले. तिथून ही चकमक स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुरूच राहिली.

बाबूजींच्या जीवनात अखंड धावपळ राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह देशउभारणीच्या कामासाठी स्वतःला झोकून देण्याचा संकल्प केला. देशकार्यात पडण्याआधी काही काळ शिक्षकी पेशा पत्करलेल्या बाबूजींनी गावासाठी शिक्षण संस्था स्थापनेचा संकल्प सोडला. मात्र स्वातंत्र्यलढ्यात त्यांना अनेक शत्रू झाले होते. त्यापैकी एकाने डाव साधला. २४ जानेवारी, १९५२ रोजी प्रजासत्ताक भारतात त्यांचा घात झाला.

जीवावर बेतणारा प्रसंग

जीवावर बेतणारा असाच एक प्रसंग वाटेगाव येथे घडला. सर्व भूमिगत शिराळा पेठ्यात होते, तर क्रांतिवीर बाबूजी आजारपणामुळे वाटेगावच्या पांडुरंग शिंदे (मामा) यांच्या मळ्यात विश्रांतीसाठी थांबले होते. एवढ्यात गावातील शंकरराव पाटील यांच्या वाड्यावर पेठेच्या महादू रामोशाने दरोडा टाकल्याची वार्ता आली. तो त्यांच्याकडे बंदुकीची मागणी करीत होता. पाटील थांगपत्ता लागू देत नव्हते. त्याने मारहाण सुरू केली. पतीच्या संरक्षणासाठी पाटलाच्या सौभाग्यवती मध्ये आल्या. दरोडेखोराने त्यांच्यावर भाला चालवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता बाबूजींना समजताच आजारी असूनही ते मदतीला धावले. मोठी चकमक झडली. या चकमकीत एक छरा बाबूजींच्या दंडात घुसला. जखमी अवस्थेतही त्यांनी गोळीबार थांबवला नाही.

क्रांतिवीर बाबूजींना जीवनात आणखी एका थरारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. क्रांतिवीर शेख काका, अंतुकाका बर्डे आदींसह सहा ते सातजण विंग, काले, कोळेवाडीमार्गे इंडोली (ता. कऱ्हाड) भागात असताना ती वार्ता कऱ्हाड पोलिसांना लागली. फौजदार वालावलकर फौजदार, शेख इन्स्पेक्टर हे फौजफाट्यासह विंग खिंडीत माग काढत आले. दूरहून येणारी पोलिसांची जीप शेख काकांनी हेरली. त्यांच्याकडे वडिलांची लांब पल्ल्याची बंदूक होती. त्यांचा नेमही चांगला होता. दूरूनच त्यांनी पोलिसांच्या धावत्या जीपचे टायर गोळीने टिपले. सारा फौजफाटा मोजक्या क्रांतिकारकांच्या पवित्र्यापुढे खिंडीतून जीप तिथेत टाकून पळत सुटला.

कासेगाव शिक्षण संस्थेचा रचला पाया...

स्वातंत्र्यांची चाहूल लागताच सर्व भूमिगत कार्यकर्त्यांना देशकार्यासाठी गोळा केलेला पैसा जमा करावा, असे आदेश काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी दिले. बाबूजींच्या गटाचा हिशेब त्या काळातील बी. कॉम. असणारे क्रांतिवीर डी. जी. देशपांडे ठेवायचे. बाबूजींनी दहा हजारांचा निधी शिल्लक असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी या बीजनिधीतून सध्याच्या कासेगाव शिक्षण संस्थेचा पाया घातला गेला. बाबूजींनी तसे नेत्यांना कळवले. बाबूजींनी बालमित्र जगालाल दोशी व सचिव म्हणून राजाराबापू पाटील यांच्याकडे त्या संस्थेची धुरा सोपवली. या संस्थेसाठी पैशांची चिंता करू नका, असा शब्द १९४६-४७ मध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांना दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.