सांगली जिल्ह्यात पर्यटकांना खुणावताहेत निसर्गरम्य स्थळे

सांगली जिल्ह्यात पर्यटकांना खुणावताहेत निसर्गरम्य स्थळे
Updated on

परीक्षांचा हंगाम संपून आता सुट्यांचा मौसम सुरू झाला आहे. त्यामुळे सुटीतील मनोरंजन आणि पर्यटनाचा  आनंद लुटण्यास सांगलीकरांना संधी आहे. निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ठरावीक ठिकाणे वगळता बहुतेक स्थळे ही धार्मिक-पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाबरोबरच देवदर्शनाचे समाधान असा स्वार्थ  परमार्थ योग साधता येतो. सांगलीपासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या परिघात ही क्षेत्रे असल्याने वन डे टुरिझमसाठी ही क्षेत्रे उत्तम आहेत. अशा काही स्थळांचा हा वेध..

रामलिंग बेट  
वाळवा तालुक्‍यात बोरगाव जवळ कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झालं आहे. इस्लामपूरहून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील हे ठिकाण. नदीवरील पुलाच्या उजव्या बाजूला रामलिंग पुरातन मंदिराचा परिसर तर डाव्या बाजूला कृष्णेचे विस्तीर्ण पात्र व शांत डोह पसरलेला दिसतो. शांत आणि रम्य परिसर मनाला उल्हासित करतो. याठिकाणी नौकाविहाराचीही सोय आहे. 

श्री गणपती मंदिर  
शहरातील गणपती मंदिर हे सांगलीचे इतिहासदत्त आकर्षण आहे. संस्थानचे पहिले अधिपती कै. अप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर १८४३ मध्ये बांधले. कृष्णा नदीच्या काठी हे मंदिर असून कल्पकतेने उभारले आहे. त्याच्या मागे नदीच्या काठावर माजी मुख्यमंत्री वसंतदादांची समाधी, स्वामी समर्थ मंदिर आहे. आयर्विन पुलास केलेली रोषणाई आणि नदीतील नौकाविहार हे अलीकडच्या काळात आकर्षण ठरत आहे.

सागरेश्वर अभयारण्य  
पलूस आणि कडेगाव तालुक्‍याच्या सीमेवर असलेले सागरेश्वरचे अभयारण्य प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक जातींची हरणे आहेत. अनेक प्रकारचे वृक्ष आणि प्राणीही येथे आढळतात. याच ठिकाणी सागरेश्वराचे प्राचिन मंदिर आहे. मुख्य  मंदिराच्या सभोवताली लहान-मोठी ४० ते ५० मंदिरे आहेत. मध्यभागी असणारे देऊळ सर्वांत प्राचीन  असून ते समुद्रेश्वराचे आहे. या भागास पूर्वी ‘कुंताड’ राष्ट्र म्हणत. देवळांची बांधणी हेमांडपंथी आहे.

हरिपूर  
सांगली शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेले हरिपूर कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम  प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संगमेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. नद्यांच्या संगमाचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी लोक येतात. तसेच नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी येथील चौकातील पारावर बसून ‘संगीत शारदा’ हे नाटक लिहिले. तो पार आजही येथे पहावयास मिळतो.

रेवणसिद्ध  
विटा-खानापूर रस्त्यावर रेणावी  गावाजवळ श्री रेवणसिद्धांचे स्वयंभू स्थान आहे. देवापुढे एक मोठा नंदी असून नंदीमागे पंचकलशाप्रमाणे प्रचार्य आहेत. हा रेणावी डोंगर पूर्वी पंच धातूचा म्हणजे सुवर्ण, तांबे, लोखंड वगैरे धातूंचा होता अशी आख्यायिका आहे. या डोंगरावर ८४ तिर्थे होती असा उल्लेख आहे.

औदुंबर  
पलूस तालुक्‍यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या काठावर रम्य वनश्रीमध्ये श्री दत्तात्रयांचे देवस्थान आहे. श्री ब्रह्मानंद स्वामी इ. एस. १८२६  मध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे आले. त्यांनी येथे तप केले. त्यांची समाधी येथेच आहे. नदी पलीकडे गर्दझाडीत श्री भुवनेश्वरीचे सुंदर देवालय आहे. एक जुनी शिल्पकला म्हणून देवळावरील गोपुर पहाण्यासारखे आहे.

चांदोली अभयारण्य  
शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम टोकास चांदोलीजवळ वारणा नदीवर ‘वारणा प्रकल्प’ हे ३४.२० टी.एम.सी क्षमतचे धरण बांधले आहे. धरणाचा बांध मातीचा आहे. धरण परिसराला लागूनच चांदोली अभयारण्य आहे. या ठिकाणी वाघांसह अनेक वन्यप्राणी आहेत. तसेच धरणापासून जवळच प्रचितगडावरही जाता येते.  

श्री शुक्राचार्य (पळशी) 
खानापूर-जत हमरस्त्याच्या उत्तरेस दोन किलोमीटरवर श्री शुक्राचार्याचे एक प्राचीन देवस्थान आहे. शुक्राचार्य हे एक महान योगी होते.  त्यांचे तप हरण करण्यासाठी इंद्राने रंभा नावाची अप्सरा पाठविली. शुक्राचार्य ब्रह्मचारी होते. स्त्री दर्शन नको म्हणून ते डोंगरावर अदृश्‍य झाले. ते ठिकाण म्हणजे आजचे शुक्राचार्य, अशी आख्यायिका सांगितली जाते.  निसर्ग सौंदर्य व गर्द झाडी पर्यटकांचे आकर्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.