'पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात केंद्रात २०१३ ला भूमी अधिग्रहण कायदा झाला. त्यात शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या तरतुदी होत्या.'
सांगली : ‘‘शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) हा ठेकेदारांच्या भल्यासाठी आहे; प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, पण हा महामार्ग होऊ देणार नाही,’’ असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला. राज्य सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात हा मेळावा झाला.
या वेळी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील (Pratik Patil), भाजपचे नेते व माजी आमदार दिनकर पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री शेट्टी म्हणाले, ‘‘राज्यात आता भरपूर महामार्ग झाले आहेत. आता नव्याने महामार्ग करण्याऐवजी या महामार्गांची इंटर कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. ते सध्याच्याच रस्त्यांच्या माध्यमातून शक्य आहे. देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी स्वतंत्र महामार्गाची गरज नाही. अशी कोणाची मागणीही नाही. मग अचानक गतीने महामार्गाचे गॅझेटही प्रसिद्ध होते.’’
‘‘पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात केंद्रात २०१३ ला भूमी अधिग्रहण कायदा झाला. त्यात शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या तरतुदी होत्या; पण त्यात नंतरच्या भाजप सरकारने बदल करीत तसे कायदे सर्व राज्यांना करण्यास भाग पाडले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनेही बदल करीत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भूसंपादन भरपाईचे निकष बदलले. त्याला तत्कालीन सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी विरोध केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फारच कमी भरपाई आता मिळणार आहे.
आमच्या विरोधामागे अनेक कारणे आहेत. ती शेतकऱ्यांनाही पटवून दिली पाहिजेत. एक निश्चित की, असा महामार्ग न करतानाही सर्व देवस्थानने जोडता येतात. साडेसहा हजार हेक्टर पिकाऊ शेती वाया घालवू देणार नाही,’’ असा विश्वास राजू शेट्टी यांनी दिला. या वेळी प्रभाकर तोडकर, शिवाजी मगदूम, माणिक पाटील या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. एम. एन. कदम यांनी प्रास्ताविक केले. सतीश साखळकर यांनी आभार मानले.
यावेळी यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, भगवान हारूगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, उदय पाटील, गुलाबराव गायकवाड, अतुल झांबरे, अक्षय जाधव, विष्णू पाटील, राजू एडके, विलास पाटील, प्रवीण पाटील, शरद पवार, प्रवीण पाटील, घनःश्याम नलवडे, भूषण गुरव, लखन पाटील, अजित धनवडे, हिंदुराव मगदूम आदींनी संयोजन केले. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे हजारांवर शेतकरी उपस्थित होते.
मंगळवारी (ता. २६) सामूहिक हरकती दाखल केल्या जातील. त्यासाठी मिरज प्रांत कार्यालयात सकाळी अकरा वाजता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावे. येत्या ८ एप्रिलला (सोमवारी) सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर आंदोलनाचे पुढचे टप्पे जाहीर केले जातील, असे सतीश साखळकर यांनी यावेळी जाहीर केले.
प्रतीक पाटील ः मोदी सरकारने शेतकऱ्यांना भरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. केवळ सांगली जिल्ह्यात दहा हजारांवर बाधित शेतकरी आहेत.
दिनकर पाटील ः ‘कृष्णा’काठच्या अनेक गावांना पुराचाही धोका संभवतो. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने या रस्त्याला विरोध करू.
महेश खराडे ः मागणीच नसताना केवळ ठेकेदारांची भर करण्यासाठी हा महामार्ग आहे. विरोधासाठी मंत्रालयावर धडक मारली जाईल.
उमेश देशमुख ः काँग्रेसकाळातील कायदे बदलल्याने पूर्वीप्रमाणे भूसंपादन भरपाई मिळणार नाही. अनेक भूमिहीन होतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.