नगर : जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये सदस्यसंख्येत आघाडी घेत आणि नगराध्यक्षपदासह भारतीय जनता पक्षाने वर्चस्व सिद्ध करीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साम्राज्याला धक्का दिला आहे. शिर्डी नगरपंचायतीत विखे पाटील यांचे बहुमत असले, तरी जिल्ह्यातील इतर निकाल पाहता त्यांचा गड असलेल्या जिल्ह्यात मात्र त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लागल्याचे सिद्ध झाले आहे.
विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्ह्यात दबदबा आहे. विखे यांनी शिर्डी, राहाता, पाथर्डी, देवळाली प्रवरा, कोपरगाव, राहुरी आदी ठिकाणी लक्ष केंद्रीत केले होते; परंतु मतदारांनी त्यांना दणका दिला.
शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सतरापैकी दहा जागांवर विजय मिळविला. कॉंग्रेसला नऊ व राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. इथे विखे यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले.
राहाता नगरपालिका हे विखे यांचे महत्वाचे सत्ताकेंद्र परंतु तेथेच विखे यांना गड राखता आला नाही. तेथे त्यांचे परंपरागत विरोधक असलेले भाजपचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या पत्नी ममता पिपाडा नगराध्यपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. शिवाय शिवसेना व भाजप युतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत त्यांनी पालिकेवर कब्जा मिळविला. राहाता नगरपालिकेवर मागील दहा वर्षांपासून विखे गटीची सत्ता होती. या सत्तेला तेथे हादरा बसला. नगरसेवकपदासाठी सतरापैकी नऊ जागा जिंकत महाआघाडीने बहुमत सिद्ध केले. कॉंग्रेसप्रणित विखे गटाला मात्र सात जागांवर समाधान मानावे लागले. येथील निकाल हा विखे गटाला मोठा धक्का देणारा ठरला. या निकालामुळे विखे पाटील यांचा एकमेव विरोधक म्हणून डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले.
राहुरी नगरपालिकेत विखे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशी आघाडी केली. मात्र याच नगरपालिकेत जनतेने त्यांना मोठा धक्का दिला. माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्त्वाखालील जनविकास आघाडीची सत्ता कायम राहात तेथे प्राजक्त तनपुरे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत 21 पैकी 15 जागांवर विजय मिळवित तनपुरे यांनी विखेंना चांगलाच धक्का देत ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांचे चाळीस वर्षांपासून असलेले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.
विखे यांचे खंदे समर्थक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेत बहुमत मिळविले असले, तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी राजश्री ससाणे यांचा पराभव होणे, हा मोठा धक्का ठरला. विखे व ससाणे यांचे
पूर्वाश्रमीचे राजकीय
विरोधक असलेले (कै.) गोविंदराव आदिक यांची कन्या अनुराधा आदिक (राष्ट्रवादी) यांनी मोठ्या मतांनी तिथे नगराध्यक्षपद मिळविले. राजश्री ससाणे यांचा तब्बल तीन हजार 432 मतांनी झालेला पराभव ससाणे यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. या नगरपालिकेत गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. नगरसेवक आपले असले, तरी स्वतःच्या पत्नीला निवडून आणता आले नसल्याची नामुष्की ससाणे यांच्यावर आली.
संगमनेरमध्ये कॉंग्रेसचे दुसरे नेते बाळासाहेब थोरात यांनी मात्र स्पष्ट बहुमत मिळवित संगमनेर नगरपालिकेत त्यांची बहिण दुर्गा तांबे यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी केले. नगरसेवकपदाच्या 28 जागांपैकी तब्बल 23 जागा जिंकून बहुमत सिद्ध केले. नगरपालिका व तालुक्यात आपलेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा थोरात यांनी दाखवून दिले. पाथर्डी नगर पालिकेत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. तेथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. आमदार मोनिका राजळे यांचे नियोजन तेथे महत्त्वाचे ठरले. विखे गटाचा या तालुक्यातला हस्तक्षेप लोकांना आवडली नाही.
देवळाली प्रवरा येथे शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला बहुमत मिळाले. येथे नगराध्यक्षपदासाठी सत्यजीत कदम यांनी बाजी मारली. अठरापैकी 16 जागा जिंकून विरोधकांचे येथे पानिपतच झाले. येथे कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही, हे विशेष. हा परिसर विखेंच्या कार्यक्षेत्रातील आहे. कॉंग्रेसला खातेही न उघडता येणे, हा विखे गटाचा मोठा पराभव मानला जातो.
कोपरगावमध्ये आमदार स्नेहलता कोल्हे व ज्येष्ठ नेते बिपिन कोल्हे यांनी भाजप-शिवसेनेकडे सत्ता खेचून आणली, तरी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक भाजपचे बंडखोर उमेदवार विजय वहाडणे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला. ज्येष्ठ दिवंगत नेते सूर्यभान वहाडणे यांचे ते चिरंजीव आहेत. वडिलांचा जनसंपर्क त्यांना कामी आला.
नगर कॉंगेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्यात संगमनेर नगरपालिकेत आपली बहिण दुर्गा तांबे हिला नगराध्यक्षपदी निवडून आणले, तांबे विजयी मिरवणुकीत मतदारांना अभिवादन करताना.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.