सोलापूर : राज्यात मागील चार वर्षांत एक लाख 31 हजार रस्ते अपघातात 49 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य परिवहन आयुक्तालयाच्या माहितीनुसार नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई शहरात मद्यपी वाहनचालकांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षांत प्रामुख्याने या चार शहरांतील एक लाख मद्यपी वाहनचालकांकडून 21 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचाच...हे लक्षात असू द्या...1 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक
राष्ट्रीय महामार्ग तथा राज्य मार्गांवरील वाहनांचा वेग आता वाढला आहे. अतिवेगाने वाहन चालवणे, विना हेल्मेट व विनासिटबेल्ट वाहन चालवणे, मोबाईल टॉकिंग, सिग्नल तोडणे, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन थांबवणे, मद्यपान करून वाहन चालवणे अशा बेशिस्त वाहनचालकांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. तत्पूर्वी, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, लातूर, हिंगोली, सोलापूर ग्रामीण, गोंदिया, रत्नागिरी, पिंपरी चिंचवड याठिकाणी सर्वांत कमी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येते. दरवर्षी राज्यात सरासरी 36 हजार रस्ते अपघातात सुमारे 13 हजार जणांचा मृत्यू होतो. तरीही दुचाकीस्वार विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, दरवर्षी प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक कोटी बेशिस्त वाहनचालकांकडून सुमारे 210 कोटींचा दंड वसूल केला जात असल्याचेही परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. 2018 मध्ये नागपूर, ठाणे, मुंबई व पुणे शहरातील 59 हजार मद्यपी वाहनचालकांकडून सुमारे 14 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. या वर्षी नोव्हेंबरअखेर या शहरांतील मद्यपी वाहनचालकांकडून सुमारे सात कोटी 30 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचाच...हेही माहिती असू द्या...महापरीक्षा पोर्टलचे लेक्षापरीक्षण सुरु
कारवाईची दोन वर्षांतील स्थिती
कारवाईचे स्वरूप बेशिस्त वाहनचालक दंड वसूल
मद्यपी 1.12 लाख 21.73 कोटी
अतिवेग 11.84 लाख 16.24 कोटी
नो पार्किंग 27.21 लाख 31.28 कोटी
विनाहेल्मेट 5.79 लाख 27.83 कोटी
मोबाईल टॉकिंग 4.19 लाख 6.17 कोटी
हेही वाचाच...अरेच्चा...घरफोडीसाठी जावई जायचा सासुरवाडीला
दरवर्षी 10 टक्के अपघात कमी होतील
बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे, अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) ठोस उपाययोजना करणे, तालुका स्तरावर पोलिस निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नियुक्त करून झालेल्या अपघातांची कारणमीमांसा शोधण्याच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 5.5 टक्क्यांनी अपघात अन् मृत्यू कमी झाले असून दरवर्षी किमान 10 टक्के अपघात व मृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.
- जितेंद्र पाटील, सहपरिवहन आयुक्त, मुंबई |
|
|