Shri Sagreshwar Temple : सह्याद्रीच्या डोंगररांगात ‘दक्षिण काशी’ ओळख असणारे सागरेश्वर देवस्थान परिसरात तब्बल ४७ मंदिरे आणि १०८ शिवलिंगे

देवराष्ट्रे येथील सागरेश्वरची श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थानची ‘दक्षिण काशी’ अशी ओळख आहे. येथील हेमाडपंती मंदिर व शिवलिंग लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
Shri Sagreshwar Temple
Shri Sagreshwar Templesakal
Updated on

देवराष्ट्रे - येथील सागरेश्वरची श्री क्षेत्र सागरेश्वर देवस्थानची ‘दक्षिण काशी’ अशी ओळख आहे. येथील हेमाडपंती मंदिर व शिवलिंग लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगात गर्द हिरव्यागार वनराईत देवस्थान परिसरात ४७ मंदिरे व १०८ शिवलिंगे आहेत. बारा ओवऱ्या आहेत. पाण्याच्या झऱ्याचे तीन कुंड आहेत. श्रावण महिन्यातील सोमवारी विशेष गर्दी असते.

सागरेश्वरपासून जवळच देशातील एकमेव असे मानवनिर्मित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य आहे. तेथे हरणांचा मुक्त विहार आहे. दुर्मीळ वृक्षांसह विविध वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचाही वावर आहे. किर्लोस्कर पॉईंटवरून दिसणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा परिसर, चंद्राकृती कृष्णा नदीचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते.

मंदिराविषयी आख्यायिका

देवस्थानला प्राचीन इतिहास आहे. मंदिराची स्थापना सत्तेश्वर नावाच्या राजाने इ. स. पूर्व काळात केल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या स्थापनेपूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. सत्तेश्वर राजा येथे शिकारीसाठी आला होता. दुपारच्या वेळेस राजा तहानेने व्याकुळ झाला होता. परिसरात दोन ऋषी तपश्चर्या करीत बसले होते.

राजाने ऋषी-मुनींना पाणी मिळेल का, असे विचारले. ऋषी-मुनी तपश्चर्या करत बसले होते. त्यामुळे ते बोलले नाहीत. राजाला राग आला. त्याने तिथेच पडलेली जळमटं त्यांच्या डोक्यावर ठेवली. ऋषी-मुनींची तपश्चर्या भंग झाली. ऋषी-मुनींनी राजाला शाप दिला, ‘तुझ्या अंगात किडे पडतील.’ शापवाणी ऐकताच राजा त्यांच्यापुढे नतमस्तक झाला. ‘मला उःशाप द्या,’ असे म्हणाला.

ऋषी-मुनींनी दया दाखवत राजाला ‘तुझ्या शरीरात केवळ रात्रीचेच किडे पडतील,’ असा उःशाप दिला. राजा काही दिवसांनी पुन्हा जंगलात शिकारीसाठी आला. त्याला तेथे एक झरा दिसला. त्या झऱ्यातील पाण्याने राजाने हातपाय धुतले. त्या रात्री राजाच्या हातापायाला किडे पडले नाहीत. राजा राणीला झऱ्यातील पाण्याचे महत्त्व कळल्यानंतर राजाने त्या झऱ्यातील पाण्याने अंघोळ केली.

त्या रात्रीपासून त्याच्या शरीरावर किडे पडणे बंद झाले. त्यामुळे राजा राणी आनंदित झाले. ऋषी-मुनींना विचारू लागले, ‘तुमच्यासाठी आम्ही काय करू?’ ऋषी-मुनींनी राजाला सांगितले, ‘या ठिकाणी तपश्चर्येतून एक शिवलिंग तयार झाले आहे. तेथे तू मंदिराची उभारणी कर.’ मग राजाने येथे मंदिर उभारले. येथे राहण्यासाठी भक्त निवास आहे. श्रावण शेवटच्या सोमवारी यात्रा असते.

दरम्यान, अभयारण्यात हरिण, काळविटांचा मुक्त विहार आहे, दुर्मीळ वृक्ष आहेत, विविध वन्यप्राण्यांचाही वावर आहे. भक्तिरंगात न्हाऊन निघालेला मंदिर परिसर पाहावा तर श्रावणातच, असे वातावरण असते.

इथे जाण्याचा मार्ग...

  • बस : सांगलीतून पलूस, कुंडल, ताकारी, देवराष्ट्रे, पलूस, कुंडल, कुंभारगाव, देवराष्ट्रे, सागरेश्वर असा मार्ग आहे.

  • रेल्वे : रेल्वेने सांगली व सातारहून ताकारी स्टेशन. तेथून सागरेश्वर देवस्थान व अभयारण्याकडे जाता येते.

  • कऱ्हाडहून कार्वे, वडगाव हवेली, शेणोली स्टेशन, रेठरे हरणाक्ष, भवानीनगर.

  • अंतर : सांगली-देवराष्ट्रे ५२ किलोमीटर. कऱ्हाडहून देवराष्ट्रे ३२ किलोमीटर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.