कोजागरीचं चांदणं साऱ्या जगभर एकसारखं. शीतल, प्रसन्न, आनंद देणारं. या साऱ्या जगाच्या नकाशावर सातारा नाही का? आहे ना. मग साताऱ्याच्या चांदण्यावर पडणारी सावली अशी का, असे प्रश्न सातारकरांच्या मनाला अस्वस्थ करू लागले आहेत. गेल्या वर्षी याच चांदण्यात झालेली धुमश्चक्री आठवणीत असताना यावर्षीही कोजागरीच्या आदल्या दिवशी भरदिवसा चांदण्यावर सावली पडली. धुमश्चक्री टळली. मात्र, तणाव मनामनांमध्ये उरून राहिला.
राज्याच्या विकासाला चालना देणारा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख. साताऱ्याचा चेहरा असाच असायला हवा, ही सर्वसामान्य सातारकरांची भावना. इथे विकासाची गती अपेक्षेपेक्षाही जास्त असायला हवी. मात्र, सातारकरांच्या वाट्याला काळवंडलेलेच चांदणे का यावे? सोमवारी शहराच्या भरवस्तीतील मंडईजवळ धुमश्चक्री टळली. कारण एका दारू दुकानाच्या जागेसाठी चाललेला संघर्ष हे होते. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन नेत्यांच्या गटांमधील संघर्षातून अलीकडील काळात टोकाची भूमिका व्यक्त होते आहे. हा संघर्ष सातारा शहर व जिल्ह्याच्याही हिताचा नाही, याचा विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे.
दोन्ही नेत्यांची ताकद खूप मोठी आहे. पुढील आणखी कितीतरी वर्षे या दोघांच्या प्रोत्साहनानुसारच सातारा पुढे जाणार आहे. हे खरेच आहे, तसेच आहे तर मग या दोन्ही गटांतील स्पर्धाही निकोप असायला हवी. संघर्षांचे अनेक प्रसंग साताऱ्याने यापूर्वीही पाहिले. मनोमिलनाचा पॅटर्नही साताऱ्याने अनुभवला. सर्वांगीण विकास अनुभवण्यासाठी आता योग्य वाटचालीची आवश्यकता आहे. त्यामुळे नेतृत्वाची स्पर्धा जरूर झाली पाहिजे. मात्र, या स्पर्धेतून सातारकरांना दिलासा मिळाला पाहिजे, हे निश्चित. रोजच्या जगण्यासाठी आवश्यक सोयीसुविधांसह अत्याधुनिक जगातील तंत्रज्ञानाची कवाडे सातारकरांसाठी सहज उपलब्ध झाली पाहिजेत.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यात सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी करणारे लोक आहेत. शेती, औद्योगिक विकास, व्यवसायाभिमुख शिक्षण, पर्यटन यासाठी पूरक वातावरणाचा लाभ आपण घेऊ शकतो. या साऱ्या चळवळींना बळ मिळून साताऱ्याचे वेगळेपण जगात उठावदारपणे दिसू शकते. हे सारे होऊही शकते. कारण या दोन्ही नेत्यांची प्रचंड ताकदच ही दिशा देऊ शकते. साताऱ्याचा चेहरामोहरा बदलू शकते. दोन्ही नेत्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यातही युवकांची संख्या लक्षणीय आहे. या ताकदीला हे दोन्ही नेते विधायक वळण देऊ शकतात. हे करण्याची वेळ आता आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.