सोलापूर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आमदार तानाजी सावंत यांना स्थान मिळावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. 1) सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे व्हॉट्सऍप मेसेजद्वारे बैठक आयोजिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षांतर केलेल्या नेत्यांच्या उमेदवारीसाठी तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांकडे हट्ट धरला, त्यांनीच या बैठकीला दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यात माजी आमदार दिलीप माने, दिलीप सोपल, नागनाथ क्षीरसागर, रश्मी बागल यांचा समावेश आहे.
आवश्य वाचाच...पुणे सलग पाचव्या वर्षी लाचखोरीत अव्वल
जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे पाच आमदार विजयी होतील, असा विश्वास पक्षप्रमुखांना दिला होता. त्यानुसार त्यांनी आटोकाट प्रयत्न करीत राष्ट्रवादीतून दिलीप सोपल व रश्मी बागल, कॉंग्रेसमधून दिलीप माने तर भाजपमधून नागनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेत घेतले. मात्र, पक्षातील नाराज मंडळींनी त्यांचे काम न केल्याने आणि मित्रपक्षाने दगाफटका केल्याने या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. आमदार सावंत यांचा निर्णय रास्तच होता, असा सूर या बैठकीत निघाला. तर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचीही तयारी दर्शविली. आपापल्या नेत्यांसाठी राज्यभर कार्यकर्ते, पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत असतानाच सोलापुरात मात्र, अन्य पक्षातून निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत डेरेदाखल झालेल्या नेत्यांनी सावंत यांच्या मंत्रिपदासाठी आयोजित बैठकीला पाठ फिरवली. आपल्याला निरोपच न मिळाल्याचे कारण काहींनी पुढे केले. माजी आमदार दिलीप माने यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही आवश्य वाचाच...खुषखबर...नववर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण !
मी कुटुंबियांसमवेत परगावी होतो
आमदार तानाजी सावंत हे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असून त्यांनी सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक बलाढ्यांना पक्षात घेऊन पक्ष वाढविला. परंतु, मित्रपक्षाकडून दगाफटका झाल्याने विजयी होणारे उमेदवार पराभूत झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंत यांना मंत्रिपद मिळणे आवश्यक वाटते. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहे. बैठक अचानक ठरली मात्र, मी कुटुंबीयांसमवेत परगावी असल्याने उपस्थित राहू शकलो नाही.
- गणेश वानकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.