Belgaum Smart City : स्मार्टसिटी योजनेला सहा महिने मुदतवाढ? बेळगावात पाच कामे अपूर्ण; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

स्मार्टसिटी योजनेतील सर्व कामे पुढील दोन आठवड्यांत पूर्ण होणे आवश्‍यक आहे, पण बेळगावातील पाच कामे अद्यापही अपूर्ण आहेत.
Belgaum Smart City
Belgaum Smart CitySakal
Updated on

बेळगाव : पाच कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने बेळगाव स्मार्टसिटी योजनेला आणखी सहा महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टसिटी विभागातील सूत्रांकडून ही माहिती मिळाली. देशातील ज्या शहरांत स्मार्टसिटी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे, तेथील कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३० जून २०२४ ही डेडलाईन दिली आहे.

त्यानुसार स्मार्टसिटी योजनेतील सर्व कामे पुढील दोन आठवड्यांत पूर्ण होणे आवश्‍यक आहे, पण बेळगावातील पाच कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे बेळगावमधील ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी आवश्‍यक आहे; पण मुदतवाढ द्यावी, की नाही, याचा निर्णय केंद्र शासनाकडूनच घेतला जाणार आहे. देशातील सर्वच स्मार्ट सिटी योजनांमधील कामे शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वांनाच मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

१२ जून रोजी महापालिकेत झालेल्या पावसाळा पूर्वतयारी बैठकीत स्मार्टसिटी योजनेतील निकृष्ट कामांबाबत सर्वाधिक चर्चा झाली आहे. स्मार्टसिटी योजनेतील कामांची देखभाल कोणी करावी? त्यासाठी निधी उपलब्ध आहे का? अशी विचारणाही केली.

स्मार्टसिटी योजनेतील कामे महापालिका व संबंधित विभागांकडे हस्तांतरित केली आहे. ज्या कामांचे हस्तांतरण वर्षभरापूर्वी झाले आहे, पण संबंधित विभागाने हस्तांतरण करून घेतले नाही, अशी कामे हस्तांतरित झाली असे गृहीत धरले जाणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालकांनी दिली.

३० जून रोजी स्मार्ट सिटी योजनाच बंद होणार असल्याचे ते म्हणाले; पण प्रत्यक्षात मात्र स्मार्टसिटी विभागाला त्याबाबतची अधिकृत सूचना आलेली नाही. गतवर्षी केंद्र शासनाकडून योजनेला एक वर्षाची म्हणजे ३० जून २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले होते; पण वर्षभरात कामे पूर्ण झाली नाहीत तर काय करावे, असा प्रश्‍न आहेच. त्यामुळे स्मार्ट सिटी विभागाला केंद्र शासनाच्या सूचनेची प्रतीक्षा आहे.

पहिल्या योजनेची कामे झाल्यावरच दुसऱ्या योजनेची अंमलबजावणी

स्मार्टसिटी योजनेतील कलामंदिर येथील बहुउद्देशीय व्यापारी संकुल. शहर बसस्थानक, तसेच व्हॅक्सीन डेपोतील आर्ट गॅलरी, एव्हीएशन गॅलरी व ग्रामीण लोकजीवन ही पाच कामे शिल्लक आहेत. यापैकी व्यापारी संकुल व बसस्थानकाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे; पण व्हॅक्सीन डेपोतील कामे गतवर्षी जून महिन्यात बंद झाली आहेत, ती सुरू झालेली नाहीत.

ती कामे सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली तरी व्हॅक्सीन डेपोतील कामांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होतोच. स्मार्टसिटी २ योजना बेळगावला मंजूर झाली आहे; पण पहिल्या योजनेतील कामे पूर्ण झाल्यावरच या दुसऱ्या योजनेची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्दे

  • स्मार्ट सिटी योजनेत बेळगावचा समावेश- जानेवारी २०१६

  • स्मार्ट सिटी योजनेचा प्रारंभ-२५ जून २०१६

  • स्मार्ट सिटी योजनेचा कार्यकाळ- ५ वर्षे

  • स्मार्ट सिटी योजनेची डेडलाईन-३० जून २०२४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com